घरमहाराष्ट्रमुंबई पोलिसांवर एटीएस पडले भारी!

मुंबई पोलिसांवर एटीएस पडले भारी!

Subscribe

दलातील १३, राज्यातील २ अधिकारी एटीएसमध्ये

आयपीएस अधिकार्‍यांमध्ये शीतयुद्ध असल्याचे आपण ऐकले आहे, काहींनी त्याचा अनुभवदेखील घेतला असेल. विद्यमान मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे आणि दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) प्रमुख देवेन भारती यांच्यात गेल्या काही दिवसात अधिकार्‍यांच्या बदल्यामध्ये मर्जीतील अधिकार्‍यांना आपल्याकडे वळवण्याच्या स्पर्धेत भारतींना यश आले.

त्यामुळे मुंबईत पोलीस आयुक्त मोठे कि एटीएस प्रमुख मोठे, या चढाओढीत पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांनी निर्णायक भूमिका घेत देवेन भारतींच्या बाजूने कौल दिला. त्यामुळे आयपीएस अधिकार्‍यांमधील ‘कोल्ड वॉर’ पुन्हा एकदा समोर आले आहे. मुंबई पोलीस आयुक्त बर्वे यांनी कारणे दाखवा नोटीस देऊनही मुंबई पोलीस दलातील 13 पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्या एटीएसमध्ये कऱण्यात आलेल्या आहे.

- Advertisement -

काही वर्षांपूर्वी मुंबई क्राईम ब्रँचच्या टॉपच्या अधिकार्‍यांना मुंबईतील पोलीस ठाण्यात बसवून क्राईम ब्रँच खिळखिळी करण्यात आली होती, असाच काहीसा प्रकार मुंबई पोलिसांच्या बाबतीत घडला आहे. मुंबई पोलीस दलातील टॉपचे समजले जाणारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तसेच पोलीस निरीक्षक पदावर असणार्‍या 13 अधिकार्‍यांच्या बदल्या दहशतवादी विरोधी पथकात करण्यात आलेल्या असून मुंबई पोलीस आयुक्तांना हि चपराक असल्याची चर्चा जेष्ठ अधिकार्‍यांमध्ये सुरु आहे. राज्याच्या पोलीस महासंचालक कार्यालयातून सोमवारी हे बदलीचे आदेश जारी कऱण्यात आल्यामुळे मुंबई पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

मुंबई पोलीस दलातील टॉपच्या 13 पोलीस अधिकार्‍यांकडून दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) मध्ये बदली करून घेण्यासाठी राज्याचे पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांच्याकडे या अधिकार्‍यांनी अर्ज केले होते. मात्र बाबतची सूचना मुंबई पोलीस आयुक्तांना नसल्यामुळे पोलीस आयुक्त संजय बर्वे यांनी परस्पर कऱण्यात आलेल्या अर्जावरून या अधिकार्‍यांना धारेवर धरत त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. पोलीस आयुक्त यांनी बजावलेल्या नोटिसीमुळे या अधिकार्‍यांची अवस्था कात्रीत सापडल्यासारखी झाली होती.

- Advertisement -

बदलीचे अर्ज दिल्यामुळे आयुक्तांच्या नाराजीला सामोरे जावे लागणार असल्यामुळे या अधिकार्‍याचे धाबे दणाणले असताना सोमवारी 15 अधिकार्‍यांच्या बदलीचे आदेश राज्य पोलीस महासंचालक कार्यालयांकडून काढण्यात आले. यात दोन अधिकारी हे मुंबई बाहेरचे असून या 15 अधिकार्‍यांची बदली राज्य दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) या ठिकाणी कऱण्यात आलेली आहे. या अधिकर्‍यांच्या बदल्या मुंबई पोलीस आयुक्तांना चपराक असल्याची चर्चा पोलीस दलातील जेष्ठ अधिकार्‍यांमध्ये सुरु आहे.

2015 साली मुंबई पोलीस दल आणि क्राईम ब्रँचमध्ये या प्रकारचा मोठा बदल दिसून आला होता. मुंबई पोलिसांचा कणा समजल्या जाणार्‍या क्राईम ब्रँचमध्ये असणार्‍या याच पोलीस अधिकार्‍यांना क्राईम ब्रँचमधून उचलून मुंबईतील पोलीस ठाण्यात त्यांची पोस्टिंग दाखवण्यात आली होती. त्यावेळी मुंबई पोलीस दलात सहपोलीस आयुक्त देवेन भारती यांच्याकडे कायदा व सुव्यवस्था विभाग होता.

क्राईम ब्रँचला महत्त्वाचे गुन्हे उकल करूनच द्यायचे नाही, असा चंगच या अधिकार्‍यांमार्फत त्यावेळी बांधण्यात आला होता. त्यामुळे काही वर्षे क्राईम ब्रँच बॅक फुटवर गेल्याची चर्चा पोलीस दलात सुरु होती. यावेळी सुद्धा हीच खेळी खेळली गेली असून आपल्या मर्जीतील अधिकार्‍यांना आपल्याकडे ओढण्यात एटीएस प्रमुख यांना यश आले होते.

मुंबई पोलीस दलात असे अनेक अधिकारी आहेत, जे अधिक चांगले काम करू शकतात. हे अधिकारी गेल्यामुळे मुंबई पोलीस दलाला कुठलेही नुकसान झालेले नाही. उलट त्या जागी चांगले अधिकारी येतील असे मुंबई पोलीस दलातील काही अधिकारी यांचे म्हणणे आहे.

हेच ते १५ अधिकारी
एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन अलुकनुरे, भायखळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश कदम, खार पोलीस ठाण्यातील पो. निरिक्षक नंदकुमार गोपाळे, पो.नि. ज्ञानेश्वर वाघ, सुधीर दळवी, संतोष भालेकर, लक्ष्मीकांत साळुंखे, दीप बने, विशाल गायकवाड, दीपाली कुलकर्णी, प्रवीण वांगे , विल्सन रॉड्रिक्स आणि अश्विनी कोळी हे 13 अधिकारी मुंबई पोलीस दलातील टॉप अधिकारी असून राजेश भुयार, सीआयडी, उमाकांत अडकी, नक्षलविरोधी अभियान नागपूर येथील आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -