घरमहाराष्ट्रपरमबीर सिंह यांच नेमकं काय चुकलं?

परमबीर सिंह यांच नेमकं काय चुकलं?

Subscribe

मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची अखेर उचलबांगडी करण्यात आली असून हेमंत नगराळे यांची मुंबईचे नवे पोलीस आयुक्त म्हणून वर्णी लागली आहे. सचिन वाझे प्रकरणामुळे परमबीर सिंह अडचणीत आले होते.

मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची अखेर उचलबांगडी करण्यात आली असून हेमंत नगराळे यांची मुंबईचे नवे पोलीस आयुक्त म्हणून वर्णी लागली आहे. सचिन वाझे प्रकरणामुळे परमबीर सिंह अडचणीत आले होते. तसेच एनआयएच्या तपासातही वाझे हे एकटे नसून त्यांचे बोलविते धनी दुसरेच असल्याची माहिती समोर आली होती. यामुळे परमबीर सिंहही संशयाच्या फेऱ्यात अडकले होते. त्यांची गच्छंती करण्याची मागणी विरोधकांनीही लावून धरली होती. वाझे प्रकरणामुळे सरकारच्या प्रतिमेला हानी पोहचत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे देखील नाराज होते. त्यातच धागेदारे ज्यांच्यापर्यंत जातील त्यांच्यावर कारवाई करणार अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही दिली होती. यामुळे वाझेच नाही तर परमबीर सिंह यांचेही आयुक्तपद जाणार हे निश्चित होते. अखेर आज त्यावर शिक्कामोर्तब झाले असून परमबीर सिंह यांना मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरून पायउतार व्हावे लागले आहे.

तर वाझे प्रकरणात परमबीर सिंह यांचा काय संबंध असा प्रश्न अनेकांना पडला आहे. त्यामागे एक दोन नाही तर अनेक कारणे आहेत.

- Advertisement -

परमबीर सिंह हे १९८८ सालच्या बॅचचे सनदी अधिकारी आहेत. कडक शिस्त व कठोर निर्णय घेण्यासाठी सिंह यांना ओळखले जाते.

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणीही सिंह चर्चेत होते. याप्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या साध्वी प्रज्ञा ठाकूर यांना एटीएसने अटक केली होती. त्यावेळी हेमंत करकरे एटीएसप्रमुख होते. तर डीआयजी एटीएसपदी परमबीर सिंह होते.

- Advertisement -

पण त्याचबरोबर परमबीर सिंह यांचा अंडरवर्ल्डवरही सखोल अभ्यास आहे.

ममता कुलकर्णी या अभिनेत्रीचे व तिच्या पतीचे ड्रग्ज रॅकेट कनेक्शनही सिंह यांनीच समोर आणले होते.

ठाणे जिल्ह्याचे पोलीस आयुक्त असलेल्या परमबीर सिंह यांची २०२० साली मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती झाली .

पण बॉलीवूड स्टार सुशांत सिंह राजपूत यांच्या आत्महत्या प्रकरणामुळे ते चर्चेत आले.

सुशांत मृत्यूप्रकरणात पोलीस योग्य तपास करत नसल्याचा आरोप सुशांतच्या कुटुंबीयांनी केला होता.

त्यावेळीही मुंबई पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभारण्यात आले होते.

मात्र, यादरम्यान ख्वाजा युनूस मृत्यू प्रकरणी निलंबित झालेल्या सचिन वाझे यांना परमबीर सिंह यांनी २०२० साली पोलीस दलात सामावून घेतले होते.

तसेच वाझे यांनी शिवसेनेत प्रवेशही केला होता. पण ते राजकारणात मात्र सक्रीय नव्हते.

यादरम्यान, परमबीर सिंह यांनी अनेक महत्वाच्या केसेसच्या तपासाची मुख्य जबाबदारीही वाझे यांच्याकडे दिली होती.

यामुळे आयुक्तांचा हात डोक्यावर असल्याने वाझे यांची मजल व मनमानीही वाढली होती.

कोणाचीही रोखठोक नसल्याने वाझे देखील मस्तवाल झाले होते.

यामुळे इतर सनदी अधिकाऱ्यांमध्ये नाराजीही होती.

तशातच अँटालिया प्रकरणात सचिन वाझे यांना एनआयएने अटक केली असून अंबानी यांच्या घरासमोर स्फोटक असलेली स्कॉर्पियो आपणच ठेवल्याची वाझे यांनी कबुली दिली आहे.

तसेच या कारबरोबरच अनेक बाबींमध्ये पोलीस दलाचेही या प्रकरणाशी साटेलोटे असल्याचे समोर आले आहे. यामुळे वाझे यांच्याबरोबरच परमबीर सिंह आणि इतर पोलीस अधिकाऱ्यांचीही एनआयएकडून चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

यामुळे देशभरात मुंबई पोलीस दलाची नाचक्की झाली असती. याचा थेट परिणाम गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या पदावर होण्याची शक्यता असल्यानेच सिंह यांची उचलबांगडी करण्यात आली आहे.

तसेच सचिन वाझे प्रकरणामुळे सरकारचीही प्रतिमा मलिन होत आहे.

आत तर मोठ्या उद्योगपतींकडून खंडणी गोळा करण्याचे काम वाझे करत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.

तसेच वाझे हे प्यादे असून त्यांचा खरा बोलविता धनी वेगळा असल्याचे सांगत विरोधकांनी परमबीर सिंहानाच फ्रेम केलंय.

Kavita Joshi - Lakhehttps://www.mymahanagar.com/author/lkavita/
गेली १३ वर्ष पत्रकारितेत. सामाजिक विषयांवर लिखाण. ब्लॉग्जवरही लेखन. प्रिंट, डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -