पोलीस भरती : मुंबईचे पोलीस आयुक्त फणसाळकर करणार शनिवारी उमेदवारांना मार्गदर्शन

मुंबई : राज्य सरकारने नोव्हेंबर 2020मध्ये केलेल्या घोषणेनुसार राज्यात जवळपास 20 हजार पोलिसांची भरती केली जाणार आहे. यासाठी सुमारे 12 लाखांहून अधिक अर्ज आले आहेत. या इच्छुक उमेदवारांना मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर येत्या शनिवारी मार्गदर्शन करणार आहेत. याबाबतचा ‘मी येतोय, तुम्ही येताय ना?’ अशा शीर्षकाचा व्हिडीओ पोलीस परिवार वेल्फेअर असोसिएशन वेल्फेअरकडून जारी करण्यात आला आहे.

कोरोना संसर्गामुळे आधीच तीन वर्षे लांबलेली पोलीस भरती प्रक्रियेत (Police Recruitment) सतराशे साठ विघ्न येत आहेत. 1 नोव्हेंबर 2022पासून ही भरतीप्रक्रिया सुरू होणार होती, मात्र प्रशासकीय कारणास्तव ती पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर लागलीच ही प्रक्रिया पुन्हा सुरू केल्यानंतर संकेतस्थळावर तांत्रिक अडचणी निर्माण होत असल्याने उमेदवारांना अर्ज भरताना अडचणी येत होत्या. त्यामुळे पोलीस भरतीसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवून द्यावी, अशी मागणी उमेदवारांबरोबरच काही राजकीय नेत्यांनी देखील केली. त्याची दखल घेत राज्य शासनाने पोलीस भरतीचा अर्ज भरण्यासाठी 15 दिवसांची मुदतवाढ दिली.

पोलीस भरतीला विलंब झाल्याने मागील तीन वर्षांपासून प्रयत्न करणाऱ्या अनेक उमेदवारांचे अर्ज करण्याचे वय उलटून गेले, त्यामुळे भरती प्रक्रियेतील वय वाढवून देण्याची मागणी देखील राज्य सरकारने मान्य केली. त्यानंतर ही भरती प्रक्रिया सुरू झाली आहे.

या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवारांनी पोलीस भरतीसाठी तयारी सुरू केली आहे. ही प्रक्रिया अधिक सुलभ आणि सुकर करण्याच्या दृष्टीने पोलीस परिवार वेल्फेअर असोसिएशन वेल्फेअर या संस्थेने पुढाकार घेतला आहे. या संस्थेच्या वतीने शनिवार, दि. 10 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 10 वाजता पोलीस भरतीसाठी इच्छुक उमेदवारांसाठी एक शिबीर आयोजित केले आहे. या शिबिरात मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर हे मार्गदर्शन करणार आहेत. यासंबंधीचा ‘मी येतोय, तुम्ही येताय ना?’ अशा शीर्षकाचा व्हिडीओ या संस्थेकडून जारी करण्यात आला असून त्यात पोलीस आयुक्त फणसाळकर यांनी या शिबिराचा लाभ घेण्याचे उमेदवारांना आवाहन केले आहे.