मुंबईतील छम-छमवर दहा महिन्यांत पोलिसांची धडक कारवाई

भाईंदर : मीरा-भाईंदर शहरात पोलीस आयुक्त सदानंद दाते यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या दहा महिन्यात जवळपास ३० डान्सबारवर कारवाई करण्यात आली असून डान्सबारमध्ये छुप्या रितीने सुरू असणाऱ्या छम-छमला आता आळा बसणार आहे.

मीरा-भाईंदर, वसई विरार पोलीस आयुक्तालय सुरू झाल्यानंतरही काही ठिकाणी डान्सबारमध्ये छुप्या रितीने ऑर्केस्ट्रा बार या आस्थापनेत महिला सिंगर या तोकडे आणि उत्तान कपडे परिधान करुन अर्धवट अंग उघडे ठेवून गिऱ्हाईकांशी विभत्स व अश्लिल नृत्य अंगविक्षेप करत असतात व सदर कृत्य करण्यास बार मालक, मैनेजर व ग्राहकही प्रोत्साहन देत असल्याची बाब पोलीस आयुक्त सदानंद दाते यांच्या निदर्शनास आली होती. त्यानंतर त्यांनी आयुक्तलयाच्या हद्दीतील डान्सबारमध्ये अश्लील चाळे, तोकडे कपडे घालून डान्स करत ग्राहकांना आकर्षित करणे, अश्लील डान्सवर पैश्यांची उधळण होणे, यांसारख्या गोष्टी होत असल्यास त्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

त्यानुसार मीरा-भाईंदर शहरातील अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष, परिमंडळ १, विशेष पथक, गुन्हे शाखा, स्थानिक पोलीस स्टेशन या सर्वांनी मिळून आयुक्त सदानंद दाते यांच्या मार्गदर्शनाखाली १ जानेवारी २०२२ ते ३१ नोव्हेंबर २०२२ या दहा महिन्यांच्या कालावधीत जवळपास ३० डान्सबारवर कारवाई केली आहे. परिमंडळ १ च्या हद्दीमध्ये भाईंदर, उत्तन, मिरारोड-७, काशिमीरा-२१, नवघर-२, नयानगर अश्या प्रकारे डान्सबारवर कारवाई करण्यात आली आहे. गुन्हे उघडकीस आणण्याची संख्या असो किंवा बारवरची कारवाई काश्मीरा पोलीस स्टेशन सर्वात पुढे आहे.

पोलीस आयुक्त सदानंद दाते यांनी शहरातील गुन्हेगारी प्रमाण कमी करण्यासाठी अनेक उपाययोजना राबवल्या असून त्यामूळे आयुक्तालयातील उघड गुन्ह्यांचे प्रमाण देखील ७५ टक्के झाले आहे. आयुक्तलयाच्या हद्दीतील सर्व डान्सबार मध्ये कोणत्याही प्रकारचे अश्लील डान्स अथवा अनुचित प्रकार घडू नये याकरता आता शहरातील प्रत्येक डान्सबार मध्ये पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. पोलीस कर्मचारी उपस्थित असून देखील अश्लील डान्स किंवा इतर काही प्रकार घडले तर त्या पोलीस कर्मचाऱ्यांवर देखील आयुक्त कारवाई करणार आहेत.


हेही वाचा : आदर्श घोटाळ्यामुळेच काँग्रेसच्या एका नेत्याची गच्छंती झालीय?, नरेश म्हस्केंचा पटोलेंना सवाल