Terror attack : मुंबईतल्या गल्लीबोळात रॅपिड एक्शन फोर्सचा रूट मार्च

Rapid action force

दहशतवादाचे मुंबई कनेक्शन हे धारावीतील जान मोहम्मद शेखच्या निमित्ताने दिल्ली पोलिसांच्या कारवाईतून दिसून आले आहे. त्यामुळेच मुंबई शहर हे दहशतवाद्यांच्या रडावर होते हे आतापर्यंतच्या कारवाईतून समोर आली आहे. जान मोहम्मदच्या अंडरवर्ल्ड डॉन दाऊद गॅंगशी कनेक्शन निघाल्यानेच मुंबईकरांच्या मनात पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशातच मुंबईकरांच्या मनात शहराबाबत सुरक्षिततेचे चित्र निर्माण व्हावे म्हणूनच आता मुंबई पोलिसांकडून पुढाकार घेण्यात आला आहे. त्याचाच भाग म्हणून आज गुरूवारी मुंबईतील गल्लीबोळात रॅपिड एक्शन फोर्सने रूट मार्च केला. (Mumbai police started route march along with Rapid action force in city )

दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या सहा अतिरेक्यांपैकी एक अतिरेकी मुंबईतील निघाल्यामुळे तसेच अतिरेक्यांच्या निशाण्यावर मुंबई शहर असल्याकारणामुळे मुंबईची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. बुधवारपासून मुंबईत शीघ्र कृती दलाच्या तुकड्या मुंबईत तैनात करण्यात आलेल्या असून मुंबईत रूट मार्च देखील काढण्यात येत आहे. सणासुदीच्या दिवसात कुठलेही विघ्न नको म्हणून राज्य सरकार तसेच मुंबई पोलिसांकडून विशेष काळजी घेतली जात आहे. मुंबईकरांच्या मनात एन सणासुदीच्या काळात विश्वास निर्माण व्हावा म्हणून मुंबई पोलिसांकडून मुंबईकरांच्या मनात विश्वास निर्माण करण्यासाठी रूट मार्च काढण्यात आला. पण अचानकपणे रॅपिड एक्शन फोर्सने मुंबईतल्या गल्लोगल्ली रूट मार्च सुरू केल्याने आश्चर्यही व्यक्त केले जात आहे.

मुंबईत एखाद्या घटनेनंतर प्रतिसाद देण्यासाठी विविध दलांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यामध्ये दंगल नियंत्रण पथकापासून ते क्विक रिस्पॉन्स टीमचाही समावेश आहे. पण थेट केंद्राच्या रॅपिड एक्शन फोर्सच्या रूट मार्चने मुंबईकरांमध्ये अनेक तर्क वितर्कांना उधाण आले आहे. मुंबईतल्या पोलिसांच्या यंत्रणेची टीम असतानाच केंद्राची टीम आता गल्लीबोळात उतरल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. वडाळा ट्रक टर्मिनल, संगम नगर पोलिस चौकीच्या हद्दीतच या रॅपिड एक्शन फोर्सने गल्लीबोळातून हा रूट मार्च केला. ”मुंबईकरांच्या मनात एक विश्वासाचे वातावरण निर्मिती करण्यासाठी आणि शहर सुरक्षित असल्याचा विश्वास देण्यासाठीच हा रूट मार्च काढण्यात आला”, अशी माहिती परिमंडळ ४ चे सहायक पोलिस आयुक्त विजय पाटील यांनी ‘आपल महानगर’ शी बोलताना सांगितले.

मुंबईत अल्पावधीतच घडलेल्या घटनांमुळे मुंबई शहराच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागला. सोशल मिडियावरही मुंबईतील सुरक्षिततेच्या बाबतीत अनेक पोस्ट व्हायरल होत आहेत. अशावेळीच मुंबई पोलिसांकडून शहरातील नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी हा रूट मार्च काढण्यात आला आहे. एन सणासुदीच्या कालावधीत दहशतवाद्यांचे मनसुबे उघडकीस आल्यानेच मुंबई पोलिस दल आता कामाला लागले आहे. दहशतवाद्यांच्या रडारवर मुंबई शहर असल्यानेच मुंबईकरांमध्ये अविश्वासाचे आणि भीतीचे वातावरण निर्माण होऊ नये म्हणूनच मुंबई शहरातील गल्लीबोळात हा लॉंग मार्च काढण्यात आला.