मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग हा राज्यातील महामार्गांपैकी व्यस्त असा महामार्ग आहे. ज्यामुळे या मार्गावर नेहमीच विविध कारणांसाठी ब्लॉक घेण्यात येत असतो. आता पुन्हा एकदा या मार्गावर एका कामाकरिता तीन दिवसांचा विशेष ब्लॉक घेण्यात येत आहे. यामुळे प्रशासनाकडून प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना जारी करण्यात आली आहे. तर मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील कामामुळे 27 जानेवारी ते 29 जानेवारी या काळात दुपारी 12 ते 03 या वेळेत मार्ग बंद ठेवण्यात येणार आहे. परंतु, ब्लॉक काळात या मार्गावरील वाहतूक अन्य मार्गावरून वळविण्यात येणार आहे. (Mumbai Pune Expressway block for Three Days changes in traffic)
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील मिसिंग लिंकच्या कामासाठी डोंगरगाव ते कुसगाव हा अंडरपास तोडण्यात आला होता. त्यामुळे आता या भागात स्थानिक वाहतुकीसाठी फ्लायओव्हर्स उभारले जात आहेत. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ अर्थात एमएसआरडीसीकडून कुसगांव हद्दीतील किलोमीटर 58/500 जवळ पुलाचे गर्डर्स बसवण्यात येणार आहेत. त्यासाठी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर तीन दिवसांचा विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. 27 ते 29 जानेवारी या काळात हा विशेष ब्लॉक असले. हे तीन दिवस दुपारी 12 ते 3 या वेळेत ब्लॉक असल्याने वाहतूक वळवली जाईल. त्यानुसार पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक वळवण ते वरसोली टोलनाका येथून देहू रोडमार्गे वळविली जाईल. दुपारी तीन वाजल्यानंतर पुण्याच्या दिशेची वाहतूक पूर्ववत करून पुन्हा एक्स्प्रेस वेवरून सोडण्यात येईल.
हेही वाचा… ST Fare Hike : मिंधे मंडळाने कोणत्या प्रतापामुळे एसटी डबघाईस आली? ठाकरेंचा थेट सवाल
एमएसआरडीसीने दिलेल्या माहितीनुसार, या विशेष ब्लॉकदरम्यान दुपारी 12 ते 3 च्या दरम्यान वाळवण ते वरसोली टोलनाक्यापासून जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरुन पुण्याकडे जाऊ शकता. पुण्यावरून मुंबईकडे जाणारी वाहतूक ही पूर्णपणे सुरळीत असणार आहे. त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. काम पूर्ण झाल्यानंतर दुपारी तीन नंतर पुन्हा तुम्ही या महामार्गावरून आपला प्रवास करू शकता. ब्लॉक दरम्यान कुठलीही अडचण आल्यास मदतीसाठी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाच्या नियंत्रण कक्षाशी 9822498224 या क्रमांकावर किंवा महामार्ग पोलीस विभागाच्या 9833498334 या क्रमांकावर संपर्क साधून मदत मिळवू शकता.