घरमहाराष्ट्रRain Update : मिरा भाईंदर, वसई, विरारमध्ये पावसाचा हाहाकार, अनेक रस्ते पाण्याखाली

Rain Update : मिरा भाईंदर, वसई, विरारमध्ये पावसाचा हाहाकार, अनेक रस्ते पाण्याखाली

Subscribe

मुंबई शहर- उपनगरात शनिवारी रात्रीपासूनच पावसाचा कहर पाहायला मिळाला. पावसाचा जोर सतत वाढत असल्याने अनेक सखल भागांत पाणी साचयला सुरुवात झाली आहे. वसई , विरार, मिरा भाईंदर, नालासोपारासह अनेक भागांतही मध्यरात्रीपासून मुसळधार पावसाने हाहाकार उडवून दिला. नालासोपारा, वसईतील अनेक झोपडपट्ट्यांमधील घरांमध्ये पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे. तसेच परिसरातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. सकाळच्या सुमारास पावसाने विश्रांती घेतली तरीही सर्व परिसर जलमय झाला आहे.

यात विरार पूर्वेकडील कण्हेर फाटा येथील जाधव पाड्यात अडकलेल्या ८० नागरिकांना सुऱक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. तर विरार पूर्व विवा जहांगीड, मनवेलपाडा, विरार पश्चिम विवा जहांगीड, एम बी इस्टेट, नालासोपारा पूर्व सेंट्रल पार्क, नगीनदासपाडा, आचोले रोड, संतोषभूवन, वसई एव्हरशाईन, वसंतनागरी या परिसरातील रस्ते अक्ष:शा पाण्याखाली गेले आहेत. यामुळे नागरिकांना रस्त्यावरून चालताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. जवळपास ४ ते ६ तासांपासून पावसाने झोडपून काढले आहे.

- Advertisement -

मध्यरात्री अचानक मुसळधार पावसाला सुरुवात झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. वसईतील कनेर फाटा जाधव नगर येथील बाजूचा नाला तुडुंब भरुन सर्व पाणी चाळीतील घरात शिरले होते. यामुळे नागरिकांचे मोठे नुकसान झाले. हा मुसळधार पाऊस केव्हा विश्रांती घेईल या चिंतेत नागरिकांनी पूर्ण रात्र जागवून काढली. यावेळी मध्यरात्री वसई विरार अग्निशमन दलाने तीनच्या सुमारास घटनास्थळी धाव घेत ८० नागरिकांना सुखरुप सुरक्षित स्थळी हलवले.

वसई, विरार परिसरात पाणीच पाणी

वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन जवानांनी अनेक भागांत अडकलेल्या नागरिकांना सुखरुपरित्या बाहेर काढले आहे. आज पहाटे ५ वाजेपर्यंत हे बचावकार्य सुरु होते. अग्निशमन दलाच्या जवानांच्या मदत कार्यामुळे मोठी जीवितहानी टळली. वसई फाट्याच्या दिशेने जाणारा मुख्य रस्ता पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. तर अनेक भागांतील मुख्य रस्त्यांवर गुडघाभार पाणी साचल्याने वाहनांना मार्ग काढणे अवघड जात आहे. अनेक वाहने रस्त्यांतच बंद पडली आहे. वसईतील एव्हरशाईन सिग्नल, वसंत नागरी सिग्नल, सर्व पाण्याखाली गेले आहे.

- Advertisement -

पालघरमधील जनजीवन विस्कळीत

यात पालघर जिल्ह्यालाही मुसळधार पावसाने झोडपून काढले. तर पुढील २४ तासात मुंबई, पालघर, डहाणू येथे अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील तीन ते चार तासात काही ठिकाणी ढगांचा कडकडाट, वीज कोसळणे आणि जोरदार वारे वाहू शकतात, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. सफाळे पालघर बोईसर डहाणू तलासरी तालुक्यातील अनेक भागांत रस्ते जलमय झाले आहेत. यामुळे बोईसर पालघर डहाणू भागातील अनेक रस्ते बंद झाले असून शहरांशी संपर्क तुटला आहे. तर डहाणू मध्ये बस डेपो पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. इराणी रोड सागर नाका येथील रस्त्यांवर ती मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. याबरोबर तलासरी तालुक्यातील कुर्झे धरण पूर्ण भरल्याने गुजरातमधील काही गावांत पाणी शिरले आहे.

 

लांबपलल्ल्याच्या रेल्वे गाड्यांवर परिणाम

मुंबईसह उपनगरात मुसळधार पावसामुळे रेल्वे प्रशासनाने अनेक गाड्या रद्द केल्या आहेत. याचा परिणाम आता रेल्वे प्रवाशांना सहन करावा लागणार आहे. मुसळधार पाऊस बरसत असल्याने अनेक रेल्वे गाड्या विविध रेल्वे स्टेशनवर थांबविण्यात आल्या होत्या. नाशिक जिल्ह्यातील मनमाड रेल्वेस्थानकावर दोन नाशिक 1 लासलगाव 1 देवळाली एक याप्रमाणे गाड्या प्रवाशांसह उभ्या असल्याने प्रवाशांना पुढे मुंबईत प्रवास करण्यासाठी अडचणी येत आहेत. जिल्हा प्रशासनाने एसटी महामंडळ आणि रेल्वेची संपर्क करून पुढील व्यवस्था केलेली आहे.

मध्य रेल्वेची वाहतूक पूर्ववत

कुर्ला, सायन दरम्यान ट्रॅकवर पाणी साचल्याने मध्य रेल्वे ठप्प झाली होती. मात्र पाऊस थांबल्याने पाणी ओसरत असून ट्रॅक मोकळे झाले आहेत. त्यामुळे वाहतूक पुन्हा सुरू झाली आहे. मात्र हार्बर मार्ग अजूनही बंद असून केवळ मानखुर्द ते पनवेल वाहतूक सुरू आहे.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -