Thursday, June 24, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर महाराष्ट्र मुंबई, ठाणे, कोकणात पुढचे ४ दिवस पावसाचे !

मुंबई, ठाणे, कोकणात पुढचे ४ दिवस पावसाचे !

-रस्ते, रेल्वे वाहतूक विस्कळीत ; प्रवाशांचे हाल -कुर्ला-सायन दरम्यान पाणी साचल्याने मध्य रेल्वे वाहतूक विस्कळीत -पूर्व-पश्चिम द्रुतगती मार्गांवर वाहतूक कोंडी -सखल भागात पाणी साचले -अत्यावश्यक सेवेवर परिणाम

Related Story

- Advertisement -

मान्सूनने आल्या आल्या आपले रंग दाखवायला सुरुवात केली असून मुंबईसह कोकण किनारपट्टीतही येत्या पाच दिवसांमध्ये विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. मान्सून आपले रौद्ररुप दाखवत असल्याने मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सर्व कोकण किनारपट्टीवरील जिल्ह्यांमध्ये रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

हवामान खात्याने याआधीच बुधवार 9 मार्चपासून मुंबईसह कोकणात अतिवृष्टीचा इशारा दिला होता. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून हवामान खात्याचा अंदाज अचूक निघत असून आपत्ती यंत्रणेला सज्ज होण्यास मदत मिळत आहे. मुंबई आणि कोकणसह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये मान्सूनचे आगमन झाले. अनेक ठिकाणी तर धुवाँधार पाऊस पडला. कोकण किनारपट्टीवर काही ठिकाणी बुधवारी रेड अलर्ट तर काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे. मुंबईत पुढच्या चार दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान खात्याच्याअधिकारी शुभांगी भुते यांनी या संदर्भातली माहिती दिली.

- Advertisement -

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात पावसाला जोर आला आहे. मंगळवार रात्रीपासून मुंबई आणि कोकणात पावसाला सुरुवात झाली आणि बुधवारी सकाळपासून जोरदार पाऊस कोसळायला सुरुवात झाली. पावसाचा जोर बहुतांशी ठिकाणी संध्याकाळपर्यंत कायम होता. तसेच 12 जूनपर्यंत राज्यात पावसाचा असाच जोर कायम राहणार आहे. त्यामुळे विनाकारण घराबाहेर न पडण्याचे आवाहन स्थानिक प्रशासन करत आहे.

मुख्यमंत्री कंट्रोल रुममध्ये
मुंबईतील पावसाचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे थेट मुंबई महापालिकेच्या कंट्रोल रूममध्ये पोहोचले आणि त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. आढावा घेतल्यानंतर योग्य त्या सूचना प्रशासनाला दिल्या.

नालेसफाईची पोलखोल ; कोट्यवधी रुपये कंत्राटदारांच्या खिशात

- Advertisement -

पहिल्याच मुसळधार पावसात मुंबईची तुंबई झाली. रस्ते, रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. मध्य व हार्बर रेल्वेची वाहतूक कुर्ला ते सीएसएमटी, वाशी दरम्यान ठप्प झाली. नागरिकांचे खूप हाल झाले. मिठी व इतर नद्या, नाले तुडुंब झाले. हिंदमाता, किंग्ज सर्कल आदी नेहमीच्या सखल भागात गुडघाभर पाणी साचले. त्यामुळे मुंबईतील नालेसफाईच्या कामांची पोलखोल झाली आहे.

मुंबई महापालिका दरवर्षी पावसाळ्यापूर्वी, पावसाळ्यात व पावसानंतर अशा तीन टप्प्यांत नालेसफाईची कामे करते. त्यासाठी दरवर्षी अंदाजे १०० कोटी रुपये खर्च करण्यात येतात. दरवर्षी एवढे कोट्यवधी रुपये खर्चूनही नागरिकांना जर पावसाळ्यात दिलासा मिळत नसेल तर हा पैसा जातो कोणाच्या खिशात, असा संतप्त सवाल विरोधक भाजप नेत्यांकडून आणि मुंबईकरांकडून करण्यात येत आहे.

पालिका प्रशासन व महापौर किशोरी पेडणेकर यांनी, यंदा नालेसफाईची कामे १०४% झाल्याचा दावा केला होता. मात्र, अवघ्या काही तासातच मुंबईत अतिवृष्टी झाली आणि हा दावा साचलेल्या पाण्याबरोबर वाहत वाहत समुद्राला मिळाला.

संपूर्ण वर्षभरात प्रमुख नाल्यांमधून तीन टप्प्यात सुमारे ४ लाख १३ हजार मेट्रिक टन गाळ काढणे अपेक्षित असते. पालिकेने कंत्राटदारांमार्फत यंदाच्या पावसाळापूर्व कामाअंतर्गत ३ लाख ११ हजार ३८१ मेट्रिक टन गाळ काढण्याचे निश्चित केले असताना प्रत्यक्षात ३१ मे अखेरीपर्यंत एकूण ३ लाख २४ हजार २८४ इतका गाळ पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून काढण्यात आला आहे. यामध्ये, शहर भागात ४३ हजार ७६६ मेट्रिक टन, पूर्व उपनगरात १ लाख ६ हजार २६० मेट्रिक टन, पश्चिम उपनगरांमध्ये १ लाख ८२ हजार २८५ मेट्रिक टन एवढा गाळ काढण्यात आला असून एकूण ११ हजार ४ इतक्या वाहनफेर्‍या करून १०४% गाळ वाहून नेण्यात आला आहे, असा दावा महापौरांनी कालच केला होता तो आता पोल ठरला आहे.

नालेफसफाई कामांची चौकशी झाल्यास कंत्राटदार व पालिका अधिकारी यांचे नालेसफाईच्या कामात संगनमत होते की नाही, नेमकी नालेसफाई झाली का, किती प्रमाणात झाली, गाळ कुठे टाकला, त्याचे पुरावे काय याबाबतची पोलखोल होणार आहे. दरवर्षी जर नालेसफाई कामावर कोट्यवधी रुपये खर्चूनही मुंबईची तुंबई होणार असेल तर हवी कशाला नालेसफाई असा संतप्त सवाल उद्या मुंबईकरांनी उपस्थित केला तर पालिका प्रशासन ,कंत्राटदार आणि सत्ताधारी यांची अडचण वाढणार आहे, हे निश्चित.

5 वर्षांत 1 हजार कोटीचा घोटाळा -पाणी तुंबल्याने शिवसेनेवर भाजपचे जोरदार टीकास्त्र 

हवामान खात्याने दिलेला अतिवृष्टीचा इशारा बुधवारी मुंबईसाठी खरा ठरला. रात्रीपासून कोसळणार्‍या मुसळधार पावसामुळे शहराच्या अनेक भागांत पाणी साचले. साठलेल्या पाण्याचा परिणाम वाहतुकीवर झाला. दिवसभर रस्ते वाहतूक संथगतीने सुरू होती तर मध्य आणि हार्बरच्या लोकल सेवेला ब्रेक लागला होता. पहिलीच पावसात मुंबई जलमय झाल्याने विरोधी पक्ष भाजपने शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला. कंत्राटदार, अधिकारी आणि सत्ताधारी यांची अभद्र युती महापालिकेत असून त्यांनी गेल्या पाच वर्षांत नालेसफाईच्या नावावर सुमारे एक हजार कोटींचा घोटाळा करून तिजोरीवर डल्ला मारल्याचा आरोप भाजप आमदार आशिष शेलार यांनी आज प्रसार माध्यमांशी बोलताना केला. मुंबईत दरवर्षीप्रमाणे पाणी तुंबले. नागरिकांच्या घरात पाणी घुसले. नालेसफाई कधी 107 टक्के तर कधी 104 टक्के झाल्याचे दावे केले गेले. पण पहिल्या पावसातच ‘कटकमिशन’चे सगळे व्यवहार उघडे पडले, अशी टीका शेलार यांनी केली.

मुंबईत सुमारे 252.74 किमी लांबीचे एकूण 170 मोठे नाले तर 438.9.कि.मी लांबीचे छोटे नाले आहेत. पेटीका नलिका, रस्त्याच्या बाजूची उघडी गटारे, पर्जन्यवाहिन्या यांच्या साफसफाईसाठी दरवर्षी सुमारे 150 कोटींपेक्षा जास्त निधी दिला जातो. दरवर्षी नालेसफाईच्या गाळाचे मोठमोठे आकडे दिले जातात. पण किती गाळ काढला त्याच्या वजनाच्या पावत्या, कुठे टाकला त्याचे सीसीटीव्ही फुटेज असे कोणतेही पुरावे मागूनही कधीच दिले जात नाहीत, असा आरोपही शेलार यांनी लगावला.

दरम्यान, महापौर किशोरी पेडणेकर आणि महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी आज हिंदमाता परिसराची पाहणी केली आहे. त्यानंतर प्रसारमाध्यमासोबत संवाद साधताना चहल यांनी पाणी तुंबण्याचे कारण सांगितले.

मुंबईत आतापर्यंत 140 ते 160 मिमी पाऊस, झाला आहे. अवघ्या तासाभरात 60 मिमी पाऊस झाला. साधारणपणे 24 तासात 165 मिमी पाऊस झाला तर अतिवृष्टी होते. एकट्या सायन-दादरमध्ये 155 मिमी पाऊस झाला, म्हणून मुंबईत पाणी तुंबल्याचे चहल यांनी सांगितले.

पाणी तुंबणार नाही असा दावा केला नव्हता ः महापौर
मुंबईत पाणी तुंबणार नाही असा दावा कधीच केला नाही. मात्र, चार तासात पाण्याचा निचरा झाला नाही तर मात्र आरोप योग्य म्हणता येतील, असे महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले. चार तासांच्यावर पाणी शहरात थांबत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पूर्व उपनगरात १२ तासात सर्वाधिक २१४.४४ मिमी पाऊस

हवामान खात्याने दिलेल्या पूर्व इशार्‍यानुसार मुंबईत बुधवारी अतिवृष्टी झाली. सकाळी ५ वाजल्यापासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत मुंबईतील पूर्व उपनगरात सर्वाधिक २१४.४४ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. त्यापाठोपाठ पश्चिम उपनगरात १९०.७८ मिमी आणि शहर भागात १३७.८२ मिमी इतक्या पावसाची नोंद करण्यात आली आहे.

विक्रोळीत सर्वात जास्त पाऊस
पूर्व उपनगरात विक्रोळी येथे सर्वात जास्त – २८५.९९ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. चेंबूर – २८०.५२ मिमी, मानखुर्द, गोवंडी – २४८.५२ मिमी, घाटकोपर – २१०२२ मिमी तर कुर्ला परिसरात २३१.४५ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे.

मरोळमध्ये २७२.१९ मिमी
पश्चिम उपनगरात मरोळ येथे सर्वात जास्त म्हणजे २७२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर,अंधेरी (पूर्व) – २७१.७६ मिमी, मालवणी – २५३.८८ मिमी, गोरेगाव – २१७.३६ मिमी, अंधेरी ( प.) – २१५.०३मिमी, दहिसर -२०८.२२ मिमी, सांताक्रूझ – २०७.६४ मिमी, वर्सोवा – २०७.४४ मिमी, वांद्रे – ८६.९९ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे.

शहर भागात कमी पाऊस
शहर भागात रावली कॅम्प परिसरात सर्वात जास्त म्हणजे २८२.६१ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. धारावी – २७६.९२ मिमी, दादर – २३७.९७ मिमी, माटुंगा – २३४.९३ मिमी, वरळी -१७३.९४ मिमी, मुंबई सेंट्रल – १४८.४९ मिमी, भायखळा – १२७.७४, मिमी, हाजीअली – १२४.१९ मिमी, नरिमन पॉईंट येथे ५३.२२ मिमी आणि कुलाबा येथे ५४.८५ मिमी इतक्या कमी पावसाची नोंद झाली आहे.

पहिल्याच पावसात मुंबई तुंबवून दाखवली

बुधवारी पहाटेपासून कोसळणार्‍या पहिल्याच मुसळधार पावसात मुंबईची तुंबई झाली. मुंबईतील कुर्ला-सायन रेल्वे मार्गावर पाणी साचल्याने मध्य रेल्वे व हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. कुर्ला ते सीएसएमटी आणि कुर्ला वाशी रेल्वे सेवा बंद पडली. तर हिंदमाता, किंग्ज सर्कल, अंधेरी सब-वे, सायन आदी सखल भागात वीतभर ते हातभर पाणी साचल्याने रस्त्यावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली. विशेष म्हणजे पहिल्याच पावसात पालिका व रेल्वे प्रशासन यांनी केलेल्या नालेसफाईच्या कामांची पोलखोल झाली आहे. एकूणच पहिल्याच पावसात मुंबईतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुंबईत रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू असताना पहिल्याच मुसळधार पावसामुळे अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी यांना रुग्णालये, कोविड जंबो सेंटर आदी ठिकाणी वेळेत पोहोचता न आल्याने त्याचा अत्यावश्यक सेवेवर काहीसा परिणाम झाल्याचे दिसून आले आहे. मंगळवारी रात्रीपासून रिमझीम कोसळणार्‍या पावसाने बुधवारी पहाटे 5 वाजल्यापासून चांगलाच जोर धरल्याने मध्य रेल्वेच्या कुर्ला-सायन रेल्वे मार्गावर गुडघाभर पाणी साचल्याने मध्य रेल्वे व हार्बर रेल्वेची वाहतूक सकाळी 9.50वाजल्यापासून बंद ठेवण्यात आली. त्यामुळे लोकल ट्रेनमध्ये अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी अडकून पडले. त्यांचे काही प्रमाणात हाल झाले. त्यामुळे अत्यावश्यक सेवेवर परिणाम झाला.

26 जुलै 2005 च्या आठवणी जाग्या झाल्या…
अतिवृष्टीच्या काळात जर समुद्रात मोठी भरती असेल आणि समुद्रात 4.50 मीटर उंचीच्या लाटा उसळणार असतील त्यावेळी बशीसारखा खोलगट आकार असलेल्या मुंबई शहरात सखल भागात पाणी साचते. शहरात पडणार्‍या पावसाचे साचलेले पाणी आणि सांडपाणी ज्यावेळी समुद्राला भरती नसते, त्यावेळी समुद्रात ज्या ठिकणी सोडले जाते तेथील फ्लडगेट बंद करण्यात येतात. ज्यामुळे शहरातून समुद्रात सोडण्यात येणारे पाणी समुद्री लाटांच्या जोरामुळे फ्लड गेट मार्गे शहरात उलट्या दिशेने शिरून भयाण पूरस्थिती निर्माण होऊ नये म्हणून हे फ्लडगेट बंद करण्यात येतात. अन्यथा पावसाचे पाणी आणि समुद्राचे शिरणारे पाणी यामुळे मुंबईची तुंबई होण्यास वेळ लागणार नाही.

नशीब म्हणजे समुद्राला मोठी भरती नसल्याने मुंबईत पूरस्थिती निर्माण झाली नाही. 26 जुलै 2005 रोजी मुंबईत अतिवृष्टी झाली होती. एकाच दिवसात 944 मिमी पावसाची नोंद झाली होती. त्याचवेळी समुद्राला मोठी भरती होती व साडेचार मीटर उंचीच्या लाटा उसळत होत्या. फ्लड गेट बंद केल्याने शहरातील पाणी समुद्रात जात नव्हते. तसेच, अतिवृष्टी झाल्याने मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने आणि मिठी नदीसह इतर नद्यांना पूर आल्याने आणि नाले तुंबल्याने मुंबईत पूरस्थिती निर्माण होऊन मोठी जीवित व वित्तीय हानी झाली होती. आजच्या पावसाने या आठवणी ताज्या झाल्या आणि मुंबईकरांच्या छातीत धडकी भरली.

रायगड, रत्नागिरीत ढगफुटीची शक्यता
मुंबईजवळील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात गुरुवार आणि शुक्रवारी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. या दोन जिल्ह्यांमध्ये ढगफुटी होण्याची शक्यताही हवमानखात्याकडून व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने येथील नागरिकांना सावधानतेचा इशारा देताना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नका, असे सांगितले आहे.

- Advertisement -