मुंबई-ठाण्यात धुवाँधार, अवकाळी पावसामुळे नोकरदारांची तारांबळ; रेल्वेची स्थिती काय?

mumbai rain

Unseasonal Rain in Mumbai | मुंबई – ऐन उन्हाळ्यात मुंबई आणि परिसरात पावसाच्या धुवाँधार सरी कोसळत आहेत. कामासाठी घराबाहेर निघण्यावेळीच पावसाने एन्ट्री घेतल्याने नोकरदारांची छत्री शोधण्यापासून तारांबळ उडाली. दरम्यान, अवकाळी पाऊस सुरू झाला असला तरीही पश्चिम, मध्यच्या सर्व लोकल व्यवस्थित धावत आहेत. तर, हार्बर मार्गावर लोकलसेवा उशिराने धावत आहे.


गेल्या काही दिवसांपासून राज्यातील हवामानचक्र बिघडले आहे. जागतिक हवामानाचा हा परिणाम असून यामुळे प्रदुषणातही वाढ झाली आहे. त्यामुळे येत्या काळात अवकाळी पावसाचा इशारा हवामान खात्याने आधीच वर्तवला होता. उन्हाळ्याच्या चटक्यांनी फेब्रुवारीच्या दुसऱ्याच आठवड्यात एन्ट्री घेतल्याने यंदाचा उन्हाळा अधिक कडक असेल असं वर्तवलं जात आहे. मात्र, कडक उन्हाळा सुरू होण्याआधी राज्यात अवकाळी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. त्यानुसार, गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध भागात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात हाल झाले आहेत. हातातोंडाशी आलेले पीक गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. दरम्यान या काळात मुंबई आणि परिसरात तुरळक सरी कोसळत होत्या.

रविवारी मध्यरात्री ठाणे आणि आजूबाजूच्या परिसरात तुफान पाऊस झाला. मात्र, सोमवारी सकाळी आभाळ मोकळे झाले. परंतु, आज मंगळवारी पहाटेच पावणेपाच वाजल्यापासून मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात तुफान पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे ठाणे, विरारहून मुंबई गाठण्याऱ्या नोकरदारवर्गाची दाणादाण उडाली. दरम्यान, अवकाळी पाऊस सुरू झाला असला तरीही मुंबईची लाईफलाईन व्यवस्थित सुरू असल्याची माहिती रेल्वे विभागाचे जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांच्याकडून कळवण्यात आलं आहे. परंतु, हार्बर मार्गावर वाहतूक अल्पकाळासाठी विस्कळीत झाली असल्याची माहिती समाजमाध्यमातून समोर येत आहे.


तसंच, येत्या ३-४ तासांत मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्यांतील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि ताशी ३०-४० किमी वेगाने वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने वर्तवले आहे.