अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची मुंबई भेट, ‘या’ मार्गांवर वाहतूक कोंडीची शक्यता

आज या मार्गांवरून प्रवास करताना मुंबईकरांनी वाहतूक कोंडीची माहिती घेऊनच प्रवासाला सुरुवात करावी, जेणेकरून मनस्तापाला सामोरे जावे लागणार नाही.

western express highway
प्रातिनिधिक छायाचित्र

मुंबई – आज सकाळी १०.३० ते ११.३० च्या दरम्यान सांताक्रूझ पश्चिम द्रुतगती मार्ग ते मलबार हिलपर्यंतची वाहतूक संथ गतीने होणार आहे. तीन अति महत्त्वाच्या व्यक्ती आज मुंबईत येणार असल्याने वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. तसेच, दुपारी १२.३० ते सायंकाळी सहाच्या दरम्यान मलबार हिल ते रिगल सर्कलपर्यंत वाहतुकीवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे आज या मार्गांवरून प्रवास करताना मुंबईकरांनी वाहतूक कोंडीची माहिती घेऊनच प्रवासाला सुरुवात करावी, जेणेकरून मनस्तापाला सामोरे जावे लागणार नाही.

हेही वाचा – महाराष्ट्रात राहताना मराठी भाषा शिकण्याचा प्रयत्न करा, वादग्रस्त विधानानंतर राज्यपालांची सारवासार

मुंबई ट्राफिक पोलिसांनी यासंदर्भात ट्विट करून माहिती दिली आहे. “अतिमहत्वाच्या व्यक्तीच्या पूर्वनियोजित भेटीमुळे ३ ऑगस्ट रोजी सकाळी १०:३० – ११:३० दरम्यान सांताक्रूझ विमानतळ, पश्चिम द्रुतगती मार्ग ते मलबार हिल आणि दुपारी १२:३० ते सायं. ६:०० दरम्यान मलबार हिल ते रिगल सर्कल येथे वाहतूक संथ राहील. नागरिकांनी यानुसार प्रवासाचे नियोजन करावे,” असं ट्विट करण्यात आलं आहे.

अतिमहत्त्वाचे व्यक्ती कोण?

दरम्यान, मालदीवचे राष्ट्रपती आज महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेण्यासाठी मुंबईत येणार आहेत. मलबार हिल येथील राजभवनात या दोघांची भेट होणार आहे. मालदीवचे राष्ट्रपती Ibrahim Mohamed Solih मुंबई भेटीला येणार असल्याने नियमानुसार त्यांच्या सुरक्षेकरता वाहतूक संथ गतीने होऊ शकते, अंस सांगण्यात येतंय. त्यामुळे या मार्गांवर प्रवास करण्याआधी मुंबईकरांनी वाहतूक परिस्थिती लक्षात घेऊनच बाहेर पडणे महत्त्वाचे ठरणार आहे.

हेही वाचा – ४ ऑगस्ट रोजी मुंबईतील काही भागात पाणीपुरवठा बंद; १५ टक्के पाणी कपात