फेब्रुवारी अखेरपर्यंत मुंबई ‘अनलॉक’ महापालिका टास्क फोर्सला शिफारस करणार

मुंबईतील कोरोना संसर्गावर महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेने चांगलेच नियंत्रण मिळविले आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत सातत्याने घट होत आहे. पुढील दोन आठवड्यांमध्ये रुग्णसंख्या आणखीन कमी झाल्यास मुंबई ‘अनलॉक’ करण्याबाबत टास्क फोर्सला कळविण्यात येईल. टास्क फोर्स राज्य सरकारला याबाबत योग्य ती माहिती देईल. त्यानंतर राज्य सरकार निर्णय घेईल, अशी माहिती महापालिका अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी मंगळवारी दिली.

मुंबईत मार्च २०२० पासून कोविड संसर्गाने मुक्काम ठोकला आहे. मात्र, अत्यंत अवघड परिस्थितीत महापालिकेच्या आरोग्य विभागाने विविध उपाययोजना करत कोविडची पहिली व दुसरी लाट यशस्वीपणे परतावून लावली. कोविडच्या तिसर्‍या लाटेचाही महापालिकेची आरोग्य यंत्रणा नेटाने मुकाबला करीत आहे. ओमायक्रॉन व्हेरियंटमुळे अचानक वाढलेली रुग्णसंख्या आता कमी होत आहे. डिसेंबरनंतर रोज २१ हजारांवर आढळणारी रुग्णसंख्या सध्या ६०० वर आली आहे.

परिणामी महापालिकेने निर्बंधात काही प्रमाणात शिथिलता आणून शाळा, कॉलेज, मैदाने, पार्क, प्राणीसंग्रहालय पुन्हा खुले केले आहेत. सध्या केवळ सिनेमागृह, रेस्टॉरंट, पब या ठिकाणी ५० टक्के उपस्थिती बंधनकारक असून पुढील दोन ते तीन आठवड्यात रुग्णसंख्येत अशीच घट होत राहिली तर फेब्रुवारी अखेरपर्यंत अथवा फेब्रुवारीनंतर मुंबई ‘अनलॉक’ होईल, असा अंदाज काकाणी यांनी व्यक्त केला आहे.

कोरोनाच्या तिसर्‍या लाटेनंतर मुंबईने लसीकरणाच्या साथीने कोविडवर नियंत्रण मिळवले आहे. फेब्रुवारी अखेरपर्यंत मुंबईतील नागरिकांचे लसीकरण 100 टक्के पूर्ण होईल, अशी आशा आहे. त्यावेळी रुग्णसंख्या पूर्ण आटोक्यात आली, तर टास्क फोर्सला अहवाल देऊन हॉटेल-समारंभ पूर्ण क्षमतेने सुरू केले जाऊ शकतात.
-किशोरी पेडणेकर, महापौर, मुंबई महापालिका