माहुल व मोगरा पंपिंगचे काम झाल्यावर मुंबई पूरमुक्त होणार : महापालिका आयुक्त

महापालिकेनं यंदा पुरस्थितीपासून दिलासा देण्यासाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज ठेवली आहे. मात्र २ ते ३ वर्षात ८०० कोटी रुपये खर्चून माहुल व मोगरा पंपिंगचे काम पूर्ण झाल्यावर मुंबई खऱ्या अर्थानं पूरमुक्त होईल, असा विश्वास महापालिका आयुक्त इकबाल चहल यांनी व्यक्त केला आहे.

मुंबईतील लहान – मोठ्या नाल्यांची साफसफाई ३१ मे ऐवजी १५ मे पर्यंत जादा यंत्रणा वापरून पूर्ण करण्यात येईल. मुंबईची भौगोलिक स्थिती पाहता अतिवृष्टी झाल्यास व त्याचवेळी समुद्रात मोठी भरती असल्यास मुंबईतील सखल भागात पाणी साचतं. महापालिकेनं यंदा पुरस्थितीपासून दिलासा देण्यासाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज ठेवली आहे. मात्र २ ते ३ वर्षात ८०० कोटी रुपये खर्चून माहुल व मोगरा पंपिंगचे काम पूर्ण झाल्यावर मुंबई खऱ्या अर्थानं पूरमुक्त होईल, असा विश्वास महापालिका आयुक्त इकबाल चहल यांनी व्यक्त केला आहे.

मुंबईत सध्या नदी व नाले यांच्या सफाईचे काम सुरू आहे. गेल्या आठवड्याभरात भाजपनं नालेसफाईच्या कामांची झाडाझडती घेण्यासाठी पाहणी दौरा केला. मात्र अनेक नाल्यांची सफाई झालेली नसल्याने संताप व्यक्त केला. तसेच, वेळेत नालेसफाई न झाल्यास मुंबईची तुंबई होण्याची शक्यता व्यक्त करीत आयुक्तांकडे तक्रार केली होती. त्यानंतर पालिका आयुक्तांनी गुरुवारी नाल्यांची पाहणी केली.

महापालिका आयुक्त इकबाल चहल यांनी अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांच्यासह पश्चिम उपनगरातील वांद्रे येथील ‘बीकेसी कनेक्टर ब्रिज’ येथील मिठी नदीतील सफाई काम, उत्तर भारतीय संघ भवनाजवळील वाकोला नदीतील सफाईकाम, वांद्रे रेल्वे स्थानकनजीकचा नाला, धीरूभाई अंबानी शाळेजवळील मिठी नदीच्या पश्चिम बाजूला सुरू असलेल्या नालेसफाई कामांची पाहणी केली. यावेळी, उपायुक्त उल्हास महाले, विभास आचरेकर, जनसंपर्क अधिकारी तानाजी कांबळे, उप जनसंपर्क अधिकारी गणेश पुराणिक आदी अधिकारी उपस्थित होते.

पूरस्थिती रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना

यंदाच्या पावसाळ्यात नालेसफाईच्या कामाला मुंबई महापालिकेला १५ ते २० दिवस उशीर झाला आहे. गतवर्षी १७ मे रोजी मुंबईत आलेल्या ‘तौक्ते’ वादळामुळं नालेसफाईची कामे रखडली होती. मात्र आता परत त्याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी यंदा यंत्रणा दुप्पट करून १५ मे पूर्वीच नदी व नाले सफाईची कामं पूर्ण करण्यात येतील. पावसाळ्यात सखल भागात पाणी साचल्यास सहा मोठ्या पंपिंग स्टेशन, ४०० ठिकाणी लहान पंप बसवून पाण्याचा निचरा जलदपणे समुद्रात करण्यात येणार आहे.

हिंदमाता येथे साचणाऱ्या पाण्याचा निचरा करण्यासाठी दिवंगत प्रमोद महाजन गार्डन येथे व झेवीयर्स गार्डन या दोन ठिकाणी पावसाचे पाणी साठवण्यासाठी मोठ्या भूमीगत टाक्यांचं काम सुरू आहे. पाणी या टाकीत साचल्यानंतर पंपाच्या साहाय्यानं ते समुद्रात सोडण्यात येणार आहे. पावसाळयात साचणाऱ्या पाण्याचा निचरा करण्यासाठी टाटा मिलच्या जागेत जमिनीखालून पाईपलाईन टाकण्यात येत आहे. तसंच, परळ येथे दोन रॅम्प उभारण्यात येणार आहेत. त्यामुळं यंदा हिंदमाता येथे पावसाचे पाणी साचणार नाही. पूर्व द्रुतगती मार्गावरील वाहतूक पावसाळ्यात कुठेही थांबणार नाही. पावसाळ्यात पाण्याचा निचरा करण्यासाठी यंत्रणा कमी पडू देणार नाही, असा दावा आयुक्तांनी यावेळी केला.

नालेसफाई कामांवर लक्ष ठेवण्यासाठी भरारी पथके

नालेसफाईच्या कामांवर लक्ष ठेवण्यासाठी पालिकेने अधिकाऱ्यांची ‘भरारी पथके’ नेमल्याचे पालिका आयुक्त इकबाल चहल यांनी सांगितले. या भरारी पथकानं आठवड्यातून दोन वेळा आपला फीडबॅक देणे अपेक्षित आहे. कंत्राटदारांनी नदी व नाल्यातून गाळ काढल्यावर तो गाळ सुकल्यानंतर त्याच ठिकाणी त्या गाळाचे वजन करण्यात येईल. तसंच, तो गाळ नियोजित ठिकाणी टाकताना त्या ठिकाणीही त्या गाळाचे वजन करण्यात येते. या सर्व कामांचे चित्रीकरण करण्यात येते. तसेच, जीपीएस यंत्रणा वापरण्यात येणाऱर आहे. कोणी जर आक्षेप घेतल्यास त्यांना ते दाखविण्यात येईल. त्यामुळे नालेसफाईच्या कामात पारदर्शकता राखण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

मुंबईतील ३४० किमीच्या नाल्यांची साफसफाई करण्यासाठी व त्यातील गाळ काढून त्याची वाहतूक करून गाळाची विल्हेवाट लावण्यासाठी महापालिका यंदा १६० कोटी कोटी रुपये खर्च करणार आहे. तसंच, पावसाळयात सखल भागात साचणाऱ्या पाण्याचा निचरा करण्यासाठी महापालिका ३५० ऐवजी ४०० ठिकाणी कमी-अधिक क्षमतेचे पंप बसविणार आहे. या पंपिंगच्या व्यवस्थेवर किमान ८० – ९० कोटी रुपये असे एकूण २५० कोटींचा खर्च करणार असल्याचं अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू (प्रकल्प.) यांनी सांगितलं.


हेही वाचा –  Ola-Uber Fare Hike : सर्वसामान्यांना फटका, अॅप आधारीत टॅक्सीसेवेच्या भाड्यामध्ये १५ टक्क्यांपर्यत वाढ