मुंबई : “प्रत्येकाच्या आयुष्यात सुंदर, प्रशस्त घर असावे हे स्वप्न असते. मुंबईकरांनीही हेच स्वप्न उराशी बाळगले आहे. घराच्या समस्येमुळे मुंबईकर मुंबईच्या बाहेर गेला आहे. अशा मुंबईकरांना पुन्हा मुंबईत परत आणून शासन सामूहिक पुनर्विकासाच्या माध्यमातून त्याच्या प्रशस्त घराचे स्वप्न पूर्ण करणार आहे,” अशी ग्वाही गुरुवारी (30 जानेवारी) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. (Mumbaikars dream of spacious homes will be fulfilled through collective redevelopment said DCM Eknath Shinde)
हेही वाचा : DPDC Meeting : मुंबई डीपीडीसी बैठकीत आदित्य ठाकरेंची चर्चा, कारण काय?
काही विकासक विकास करण्यासाठी घेतलेल्या इमारती सोडून गेले, त्यांनी रहिवाशांना भाडेही अदा केले नाही. अशा विकासकांना काढून टाकणार असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “सामान्यांना परवडणारे तसेच प्रशस्त असे घर देण्यासाठी वेळ पडल्यास नियम, कायद्यात बदल करावयाच्या असल्यास तेही करण्यात येणार आहेत. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून मंत्रिमंडळासमोर असे निर्णय आणले जाणार आहेत. रखडलेल्या पुनर्विकासाच्या कामांना सामूहिक पुनर्विकासाच्या माध्यमातून गती देण्यात येणार आहे. ठाण्यामध्येही अशा पद्धतीने सामूहिक पुनर्विकास योजना सुरू झालेली आहे. सामूहिक पुनर्विकास योजना राबविताना येत असलेल्या सर्व अडचणी दूर करण्यात येणार आहे.” असे त्यांनी सांगितले.
“एसआरए, म्हाडा, एमआयडीसी, एमएमआरडीए, सिडको तसेच बीएमसी या सर्व यंत्रणांच्या समन्वयाने सामूहिक पुनर्विकासाची योजना राबविण्यात येणार आहे. सामान्य मुंबईकरला प्रशस्त घर देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. या सामूहिक पुनर्विकासाच्या माध्यमातून प्राथमिक सोयी सुविधांची उपलब्धता करून देण्यात येईल. यामध्ये बगीचा, आरोग्याच्या सुविधा, खुले मैदान आदींचा समावेश असेल. शासन लवकरच गृहनिर्माण धोरण आणत आहे. यामध्ये म्हाडाच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, काम करणाऱ्या महिला, गिरणी कामगार यांच्यासाठी घरांची उपलब्धता आणि परवडणारी घरे, परवडणारी भाड्याची घरे उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असणार आहे,” असेही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
श्री सिद्धिविनायक मंदिरासाठी विकास आराखडा
“श्री सिद्धिविनायक मंदिरासाठी विकास आराखडा राबविण्यात येणार आहे. यासाठी 500 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या विकास आराखड्याच्या माध्यमातून गणेश भक्तांना सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. त्यामुळे गणेश भक्तांची होणारी गैरसोय दूर होईल,” असा विश्वास उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला. सुरुवातीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्री सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. त्यानंतर प्रभादेवी येथील 6 समुह पुनर्विकास प्रकल्पांची पाहणी केली. पाहणीनंतर दादर, माहिम आणि प्रभादेवी विभागातील प्रलंबित पुनर्विकास संदर्भात आढावा कार्यक्रम उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह, शिवाजी पार्क, दादर येथे पार पडला. व्यासपीठावर श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासचे अध्यक्ष सदा सरवणकर, उपाध्यक्ष जैस्वाल, एसआरएचे मिलिंद शंभरकर, श्री कल्याणकर इत्यादीसह लोकप्रतिनिधी उपस्थित आहेत.