Homeमहाराष्ट्रMunde Vs Opposition : धनंजय मुंडेंभोवतीची राष्ट्रवादीची तटबंदी मजबूत, राजीनामा घेण्याची शक्यता...

Munde Vs Opposition : धनंजय मुंडेंभोवतीची राष्ट्रवादीची तटबंदी मजबूत, राजीनामा घेण्याची शक्यता कमीच

Subscribe

धनंजय मुंडे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असले तरी ते आता मंत्री आहेत. एका अर्थाने मुंडे यांच्यावर जी आरोपांची चिखलफेक केली जात आहे, त्याचे शिंतोडे केवळ राष्ट्रवादी काँग्रेसवर उडत नाहीत तर, फडणवीस मंत्रिमंडळावरही उडत आहेत, असा युक्तिवाद एनसीपीच्या ज्येष्ठ नेत्यांनी केला आहे.

(Munde Vs Opposition) मुंबई : बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणावरून वातावरण तापले आहे. यामध्ये परळी नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष वाल्मीक कराड याचाही कथित सहभाग असल्याचा आरोप करण्यात येत आहे. वाल्मिक कराड हा राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती म्हणून ओळखला जातो. त्यामुळे सर्वपक्षीय निशाण्यावर धनंजय मुंडे असून त्यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी लावून धरली आहे. मात्र, धनंजय मुंडे यांच्याभोवती राष्ट्रवादी काँग्रेसची मजबूत तटबंदी असून त्यांच्याकडून राजीनामा घेण्याची शक्यता तूर्तास तरी दिसत नाही. केवळ आरोपांवरून राजीनामा घेण्यास सुरुवात झाली तर राष्ट्रवादी काँग्रेससह बहुतांश पक्षांमध्ये नेतेच उरणार नाहीत, असा युक्तिवाद राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांनी केला आहे. (Dhananjay Munde’s support from NCP)

केज तालुक्यात मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून खून करण्यात आला. पवनचक्कीच्या वादातून हा खून करण्यात आल्याचे सांगण्यात येते. याप्रकरणात वाल्मिक कराड याचाही सहभाग असल्याचा आरोप असून सध्या तो तुरुंगात आहे. मात्र, यावरून विरोधक धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी आग्रही आहेत. विशेष म्हणजे, याप्रकरणी भाजपा आमदार सुरेश धस तसेच स्वपक्षीय राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके यांनीही मुंडे यांच्याविरोधात आघाडी उघडली आहे.

हेही वाचा – BEED : बस करा टोलवाटोलवी अन् मुंडेंचा राजीनामा घ्या; फडणवीसांच्या वक्तव्यावर अंजली दमानियांचा संताप

असे असले तरी, अन्न आणि नागरी पुरवठामंत्री धनंजय मुंडे राजीनामा देण्याची शक्यता नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रसेच प्रमुख अजित पवार यांना मी दोषी वाटत असेल तर त्यांनी माझा राजीनामा मागावा, मी द्यायला तयार आहे. पण सर्व गोष्टी स्पष्ट झाल्या पाहिजेत, असे धनंजय मुंडे यांनी बुधवारी नवी दिल्लीत सांगितले. तर, फडणवीस आणि अजित पवार याबाबतीत एकमेकांकडे बोट दाखवत आहेत. अजित पवार जो निर्णय घेतील तो मान्य असेल, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. तर, मुख्यमंत्री जो निर्णय घेतील तो मान्य असेल, असे अजित पवार यांनी म्हटले आहे. यावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी संताप व्यक्त करताना ‘बस करा ही टोलवाटोलवी,’ असे त्यांनी दोघांना सुनावले आहे.

एकीकडे हे राजकारण रंगलेले असत्ना, राष्ट्रवादी काँग्रेसने मुंडे यांच्याभोवती भक्कम तटबंदी उभी केली आहे. धनंजय मुंडे यांनी राजीनामा काय द्यायचा, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी केला आहे. राजकारण्यांवर आरोप तर होत असतात. आरोपांना उत्तर म्हूणून नैतिक जबाबदारी घेऊन राजीनामा देत गेले तर, राजकारणात फारसे कोणी उरणार नाहीत. त्यामुळे आरोप झाले तरी, त्याची पाठराखण करण्याची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसने घेतली आहे.

शिवाय, धनंजय मुंडे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असले तरी ते आता मंत्री आहेत. एका अर्थाने मुंडे यांच्यावर जी आरोपांची चिखलफेक केली जात आहे, त्याचे शिंतोडे केवळ राष्ट्रवादी काँग्रेसवर उडत नाहीत तर, फडणवीस मंत्रिमंडळावरही उडत आहेत, असा युक्तिवाद या ज्येष्ठ नेत्यांनी केला आहे. याचाच अर्थ हा विषय केवळ राष्ट्रवादी काँग्रेसचा नसून भाजपा आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचाही आहे, हे त्यांनी अधोरेखित केले.

मुंडेंचे भवितव्य काय?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात मंगळवारी बंद दाराआड चर्चा झाल्याचे समजते. त्यांनी याबाबतचा निर्णय भाजपा पक्षश्रेष्ठींकडे सोपविल्याचे समजते. राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन महिभरानंतर म्हणजेच 3 मार्चपासून सुरू होणार आहे. त्यामुळे या अधिवेशनाच्या आधी धनंजय मुंडे यांना क्लीनचिट मिळते की, राजीनामा घेतला जातो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Munde Vs Opposition: Dhananjay Munde’s support from NCP)

हेही वाचा – Suresh Dhas : ‘डीपीडीसी’ बैठकीत मुंडेंसोबत बाचाबाची झाली? सुरेश धस म्हणाले, आमचे भांडण…