Homeमहाराष्ट्रMunde Vs V. Radha : पीएम मोदींसोबत नीती आयोगात काम केलेल्या व्ही....

Munde Vs V. Radha : पीएम मोदींसोबत नीती आयोगात काम केलेल्या व्ही. राधांची बदली करून मुंडेंनी केले होते रान मोकळे

Subscribe

गेल्यावर्षी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कृषी विभागाच्या प्रधान सचिव आयएएस व्ही. राधा यांची अवघ्या दोन महिन्यांत सामान्य प्रशासन विभागात तडकाफडकी बदली करण्यात आली. व्ही. राधा आणि तत्कालीन कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्यात अनेक मुद्द्यांवर मतभेद होते, असे सांगण्यात येते.

आपली बातमी… आतली बातमी…

मुंबई : बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात घेरले गेलेले अन्न आणि नागरी पुरवठामंत्री धनंजय मुंडे यांच्याभोवतीचा 250 कोटी रुपयांच्या कथित भ्रष्टाचारी कारभाराचा फासही आवळला जात आहे. सत्ताधारी भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी बनावट बिलांचा मुद्दा लावून धरलेला असतानाच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी, कृषिमंत्रिपदाच्या कारकिर्दीतील गैरव्यवहार समोर आणले आहेत. तर, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत, पीकविमा घोटाळ्याचा मुद्दा उपस्थित करून त्याची चौकशी सरकारकडून मान्य करून घेतली आहे. अशातच, शिस्तप्रिय समजल्या जाणाऱ्या नीती आयोगाच्या सदस्य व्ही. राधा यांना कृषी विभागाच्या प्रधान सचिवपदावरून तडकाफडकी हटवून या सर्व गैरप्रकारासाठी मुंडे यांनी रान मोकळे केल्याची कुजबूज सुरू झाली आहे. (Munde Vs V Radha : IAS V Radha transferred how it is beneficial to Dhananjay Munde)

पीकविमा घोटाळ्याची केंद्राकडून चौकशी

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात आमदार सुरेश धस यांनी परळीमधील पीकविमा पॅटर्नची पोलखोल केली. परळीतील पीकविमा पॅटर्नच्या माध्यमातून कोट्यवधींचा भ्रष्टाचार होत असल्याचे आरोप त्यांनी पुराव्यानिशी केला होता. परळीमधील नागरिक बीड, लातूर, परभणी अशा आसपासच्या जिल्ह्यात एक रुपयात पीकविमा भरुन विमा कंपनी आणि सरकारला कोट्यवधींचा गंडा घालत असल्याचा आरोप करून त्यांनी तत्कालीन कृषिमंत्री धनंजय मुंडे यांना लक्ष्य केले होते. याच अुषंगाने एनसीपी एसपीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मंगळवारी लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात, महाराष्ट्रातील पीकविमा घोटाळ्याची माहिती आहे का? असेल तर या घोटाळ्याचे चौकशीचे आदेश देणार का? असे प्रश्न केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांना केले. त्यावर, आमचे सरकार हे शेतकऱ्यांप्रती कटीबद्ध आहे. असा काही घोटाळा झाला असेल तर त्याची चौकशी केली जाईल आणि घोटाळा करणाऱ्यांना सोडणार नाही, असे आश्वासन शिवराजसिंह चौहान यांनी दिले आहे.

हेही वाचा – Supriya Sule : धनंजय मुंडेंचा पाय खोलात; पीकविमा घोटाळ्याची केंद्र सरकार चौकशी करणार, संसदेत आश्वासन

दमानियांनी भ्रष्टाचाराची दिली यादीच

या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन कृषिमंत्री असताना धनंजय मुंडे यांनी केलेल्या कथित भ्रष्टाचाराची जंत्रीच मांडली. नॅनो युरिया, नॅनो डीएपी आणि फवारणी पंपाच्या खरेदीत भ्रष्टाचार झाला आहे. 92 रुपयांची नॅनो युरियाची बॅग धनंजय मुंडे यांनी 220 रुपयांना घेतली. तर, 269 रुपयांना मिळणारी ‘नॅनो डीएपी’ची बाटली 590 रुपयांना खरेदी केली. नॅनो युरिया आणि नॅनो डीएपीचा या दोन्हींचा घोटाळा 88 कोटी रुपयांचा आहे, असा आरोप दमानिया यांनी केला आहे.

कापूस गोळा करण्यासाठी 577 रुपयांना मिळणारी बॅग धनंजय मुंडे यांनी 1250 रुपयांना खरेदी केली. बॅटरीचे फवारणी यंत्र 2450 रुपयांना घेऊन हेच ‘एमएआयडी’सीच्या संकेतस्थळावर 2946 रुपयांना विकले जात आहे. परंतु, तत्कालीन कृषीमंत्री मुंडे यांनी याची 3425 रुपयांना खरेदी केली होती. विशेष म्हणजे, या सर्व गोष्टींच्या कंत्राटासाठी निविदा निघण्यापूर्वीच संपूर्ण रक्कम दिली गेली, असा दावाही त्यांनी केला आहे.

व्ही. राधा यांनी लावला होता चाप

गेल्यावर्षी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कृषी विभागाच्या प्रधान सचिव आयएएस व्ही. राधा यांची अवघ्या दोन महिन्यांत सामान्य प्रशासन विभागात तडकाफडकी बदली करण्यात आली. बदली झाल्याने कोणत्याही विभागातील हा त्यांचा सर्वात कमी कार्यकाळ ठरला आहे. व्ही. राधा आणि तत्कालीन कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्यात अनेक मुद्द्यांवर मतभेद होते, असे सांगण्यात येते. नमो शेतकरी सन्मान शेतकरी योजनेतील 1 हजार 400 कोटी रुपयांचा निधी खतांच्या खरेदीसाठी वळविण्याच्या धनंजय मुंडे यांच्या प्रस्तावालाही व्ही. राधा यांनी विरोध केला होता. ‘पीएम प्रणाम’ योजनेतंर्गत मिळणारे अनुदान हे 250 कोटींपेक्षा जास्त नसल्याने खरेदी योजना तूर्तास राबवली जाऊ नये, असे मत राधा यांनी व्यक्त केले होते. तसेच या योजनेसाठी शेतकरी सन्मान योजनेचा निधीचा एक हफ्ता वळवण्यासही त्यांचा विरोध होता. मात्र, ही योजना ताबडतोब राबवली जावी असा मंत्री कार्यालयाचा आग्रह होता. प्रती हेक्टरला नॅनो युरिया आणि नॅनो डीएपीचे वाटप शेतकर्‍यांना केल्याने मोठ्या प्रमाणात कृषी उत्पादनात वाढ होणार असल्याचा दावा मुंडे यांनी केला होता, असे सूत्रांनी सांगितले.

हेही वाचा –Dhananjay Munde : अंजली बदनामीया म्हणत धनंजय मुंडेंचा संताप, घोटाळ्याच्या आरोपावरही भाष्य

कृषी फवारणी पंपाच्या खरेदीवर अनेक संस्थांनी आक्षेप घेतला होता. ‘या खरेदीत अनियमितता दिसत असून चौकशी करण्याची आवश्यकता’ असल्याचा शेरा राधा यांनी संबंधित फाईलवर मारल्याने कृषी मंत्री नाराज असल्याची चर्चा होती. म्हणूनच त्यांची बदली करण्यात आल्याचे सांगण्यात येते. याअनुषंगाने दमानिया यांनी केलेल्या आरोपांना यामुळे अप्रत्यक्षपणे पुष्टी मिळते, असे जाणकारांचे म्हणणे आहे.

याशिवाय, आधीच्या महायुती सरकारच्या काळात धनंजय मुंडे जवळपास 15 महिने कृषीमंत्री होते. मात्र, या कालावधीत तब्बल चार आयएएस अधिकारी कृषी विभागाचे सचिवपदी होते. कृषी मंत्रिपदाची सूत्रे मुंडे यांनी हाती घेतली तेव्हा, अनुप कुमार हे अतिरिक्त मुख्य सचिव होते, त्यांची बदली झाल्यावर कृषी विभागाच्या प्रभारी सचिव म्हणून शालेय शिक्षण विभागाच्या सचिव आय. ए. कुंदन यांनी काम पाहिले होते. नंतर त्यांचीही बदली करण्यात आली आणि त्या पदावर व्ही. राधा यांची नियुक्ती करण्यात आली. पण शिस्तप्रिय, नो-नॉन्सेन्स (no-nonsense) आणि नॉन-करप्ट (Non-corrupt) अशी ओळख असलेल्या व्ही. राधा यांना दोन महिन्यांतच हटविण्यात आले. पर्यटन विभागाच्या सचिव, तसेच महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक जयश्री भोज यांच्याकडे कृषी सचिवपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला.

एवढेच नव्हे तर, तत्कालीन कृषी आयुक्तही धनंजय मुंडे यांना अडचणीचे ठरले होते. कृषी आयुक्तालयातील कथित भ्रष्टाचाराला आळा घातल्यामुळे डॉ. प्रवीण गेडाम यांची  तडकाफडकी बदली करून रवींद्र बिनवडे यांची नियुक्ती करण्यात आली असे सांगण्यात येते. पण आयएएस अधिकारी व्ही. राधा यांच्या नियुक्तीमुळे या गैरप्रकाराला पुन्हा एकदा चाप बसला, असे जाणकार सांगतात.

हेही वाचा – Anjali Damania : मुंडेंना मी त्यांची जागा दाखवणार, प्रत्युत्तरात काय म्हणाल्या अंजली दमानिया?

कोण आहेत व्ही. राधा?

विज्ञान शाखेची पदवीधर असलेल्या व्ही. राधा यांच्याकडे एलएलबीची पदवी देखील आहे. 1994 तुकडीच्या आयएएस अधिकारी असलेल्या व्ही. राधा यांनी जानेवारी ते जून 2007पर्यंत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामध्ये स्पेशल ड्युटी अधिकारी म्हणून काम केले. त्यावेळी त्यांनी मुंबईतील टोल घोटाळा उघडकीस आणला आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या आदेशावरून त्यांची अचानक बदली करण्यात आली. त्या औरंगाबादल जिल्हाधिकारीही होत्या.

त्यांनी मुंबई महानगरपालिकेत सहआयुक्त म्हणूनही काम केले आहे. जकात विभागाच्या प्रभारी म्हणून, जून 2006 ते फेब्रुवारी 2009 या कालावधीत काम पाहात असताना त्यांनी भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई केली. कालांतराने सरकारने जकातपद्धती रद्द केली. त्यानंतर 2009 ते 2011 या काळात त्या आंतरराज्यीय प्रतिनियुक्तीवर आंध्र प्रदेशात होत्या. नंतर त्या पुन्हा महाराष्ट्राच्या उत्पादन शुल्क आयुक्त म्हणून परत आल्या. कालांतराने त्या केंद्रात नियुक्तीवर गेल्या. पतंप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी नीती आयोगाबरोबरच पाणीपुरवठा, स्वच्छता तसेच वाणिज्य आणि उद्योग यासारख्या मंत्रालयांमध्ये त्यांनी काम केले. त्यानंतर त्या पुन्हा एकदा महाराष्ट्रात परतल्या असतानाच त्यांना अल्पावधीतच बदलीला सामोरे जावे लागेल. त्या 2028मध्ये निवृत्त होणार आहेत.

अजित पवार यांच्या मर्जीतील, पण…

आयएएस अधिकारी व्ही. राधा या कडक शिस्तीच्या असल्याने त्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार यांच्या गुडबुकमध्ये होत्या, असे समजले जाते. राज्य शुल्क उत्पादन आयुक्त तसेच सिडकोच्या सहव्यवस्थापकीय संचालकपदही त्यांनी भूषविले आहे. मात्र, कृषी विभागातून त्यांच्या झालेल्या बदलीच्या वेळी अजित पवार यांनी आपल्या मंत्र्याची पाठराखण केली, असे चर्चाही रंगली होती.

संतोष देशमुख हत्याप्रकरणी मुंडे रडारवर

बीड जिल्ह्याच्या मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात परळी नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष वाल्मीक कराड याचाही कथित सहभाग असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. वाल्मीक कराड हा राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्ती म्हणून ओळखला जातो. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनी लावून धरली आहे. अशातच बीड जिल्ह्यातील बोगस बिलांचे प्रकरण भाजपा आमदार सुरेश धस यांनी समोर आणले. 2021 ते 2022 या काळात कुठलीही विकासकामे न करतात धनंजय मुंडे यांनी 73 कोटी रुपये लाटल्याचा आरोप सुरेश धस यांनी केला आहे. याबाबतच्या पक्षांतर्गत तसेच नियोजन विभागाकडून चौकशीचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत.

हेही वाचा – Damania VS Munde : धनंजय मुंडे आणि अंजली दमानिया यांच्यातील वाद आता न्यायालयात