व्यसन, सकस आहाराच्या अभावामुळे मृत्यूच्या प्रमाणात वाढ, पालिका अन् जागतिक आरोग्य संघटनेचे सर्वेक्षण

मुंबई महापालिका आरोग्य विभाग, जागतिक आरोग्य संघटना यांनी शहर व उपनगरातील असंसर्गजन्य आजारांविषयक स्थिती जाणून घेण्यासाठी झोपडपट्टी, तत्सम वसाहतींमध्ये अलीकडेच निलसन आईक्यू इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या स्वतंत्र संशोधन संस्थेद्वारे आरोग्य संबंधित सर्वेक्षण करून डेटा संकलन करण्यात आला. त्यामध्ये, व्यसन, सकस आहाराचा अभाव व बेफिकिरी आदी कारणामुळे हृदयरोग, कर्करोग, मधुमेह व तीव्र श्वसनाचे विकार आदींसारखे आजार बळावत आहेत. ही सर्व कारणे नागरिकांच्या मृत्यूला प्रमुख कारणीभूत आहेत, असा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

तंबाखूचे वाढते प्रमाण, दारूचे व्यसन, रोजच्या आहारात फळ आणि भाज्यांचा अभाव, आहारात मिठाचा अतिवापर, चुकीची जीवनशैली आणि शारीरिक कसरतींचा अभाव यामुळे मधुमेह आणि उच्च रक्तदाब यासारख्या आजारांचे प्रमाण जगभरात वाढत आहे. मुंबईतील या सर्वेक्षणात, प्रामुख्याने १८ ते ६९ वर्षे वयोगटातील व्यक्तिंच्या असंसर्गजन्य आजार विषयक धोके जाणून घेण्यात आले. हे सर्वेक्षण मुंबईत ऑगस्ट ते डिसेंबर २०२१ या कालावधीत तीन टप्प्यांत राबविण्यात आले. यात प्रथम टप्प्यात सामाजिक-जनसांख्यिकीय आणि वर्तणूक संबंधित माहितीसाठी डेटा संकलन करण्यात आला.

दुसऱ्या टप्प्यात उंची, वजन आणि रक्तदाब यांचा डेटा संकलन करण्यात आला. तसेच तिसऱया टप्प्यात रक्तातील ग्लुकोज आणि कोलेस्टेरॉल पातळीचे मूल्यांकन करण्यासाठी बायोकेमिकल मोजमाप करण्यात आले. सर्वेक्षणासाठी संपर्क साधलेल्या ५ हजार ९५० प्रौढांपैकी ५ हजार १९९ प्रौढांनी सर्वेक्षणात भाग घेतला. यात २ हजार ६०१ पुरुष आणि २ हजार ५९८ महिलांचा सहभाग नोंदवण्यात आला आहे.

 सर्वेक्षणाचे प्रमुख निष्कर्ष – 

आहाराच्या सवयी :

सुदृढ आरोग्यासाठी, दररोज किमान ४०० ग्रॅम, फळे आणि भाज्यांचे सेवन केल्यास असंसर्गजन्य रोगाचा धोका कमी होतो. मात्र मुंबईत सुमारे ९४% नागरिक दररोज अपुरी फळे-भाज्या खात असल्याचे सर्वेक्षणात आढळले आहे, जे शिफरस केलेल्या प्रमाणापेक्षा ५० टक्क्यांनी कमी आहे.

 मिठाचा वापर :

जागतिक आरोग्य संघटनेच्या शिफारशीनुसार दैनंदिन जीवनात मीठ सेवन करण्याचे प्रमाण ५ ग्रॅम आवश्यक असताना ते जास्त म्हणजे ८.६ ग्रॅम इतके असल्याचे आढळून आले.

शारीरिक व्यायाम :

निरोगी आरोग्यासाठी, दर आठवड्याला १५० मिनिटांचा व्यायाम करणे आवश्यक आहे. मात्र तीन-चतुर्थांश (७४.३%) म्हणजेच (७/१० मुंबईकर) नागरिक त्यांच्या दैनंदिन दिनचर्यामध्ये शारीरिक हालचाली करत नसल्यासाज आढळून आले.

बॉडी मास इंडेक्स :

सुमारे ४६% नागरिकांचे वजन हे सरासरीपेक्षा अधिक असल्याचे, १२% मुंबईकर लठ्ठ असल्याचे आढळले विशेषतः महिलांमध्ये जास्त लठ्ठपणा आढळून आला.

 तंबाखूचा वापर :

खरे तर, तंबाखू सेवन केल्यामुळे दरवर्षी ७ दशलक्षाहून अधिक लोकांचा मृत्यू होतो. सर्वेक्षणानुसार एकूण तंबाखूच्या वापराचे प्रमाण १५% आहे. त्यापेकी १२% नागरिक दररोज तंबाखूचे सेवन करतात. विशेषतः पुरुषांमध्ये तंबाखू सेवन करण्याचे प्रमाण अधिक आहे. मौखिक तंबाखूच्या (मशेरी, गुटखा, पान मसाला, खैनी) वापराचे प्रमाण सुमारे ११% इतके असून ते खूप जास्त असल्याचे आढळून आले आहे.

वाढलेला रक्तदाब किंवा उच्च रक्तदाब :

मुंबईत, ३४% नागरिकांमध्ये रक्तदाब वाढल्याचे नोंदवले आहे. त्यापैकी ७२% नागरिक हे सार्वजनिक आणि खाजगी रुग्णालयात उपचार घेत असल्याचे आढळले आहे. जे उपचार घेत होते. त्यापैकी फक्त ४०% नागरिकांचा रक्तदाब नियंत्रणात असल्याचे आढळून आले आहे.

वाढलेली रक्तातील साखर किंवा मधुमेह :

मधुमेहाच्या रूग्णांमध्ये, टाइप २ हा जास्त प्रमाणात असून भारतातील वृद्ध लोकांना प्रभावित करतो. लठ्ठ आणि बैठे काम करणाऱया व्यक्तिंमध्ये टाइप २ मधुमेहाचा धोका अधिक असतो. मुंबई शहरात साधारणतः १८% मुंबईकरांचे उपाशीपोटी रक्तातील साखरेचे प्रमाण सामान्य प्रमाण पेक्षा अधिक आहे. ८२% व्यक्ती हे सार्वजनिक आणि खाजगी आरोग्य सुविधांमध्ये रक्तातील वाढलेल्या साखरेसाठी उपचार घेत आहेत. तसेच, जे उपचार घेत होते त्यापैकी फक्त ४२% व्यक्तिंना त्यांच्या रक्तातील साखर नियंत्रणात असल्याचे आढळून आले. तर, ८.३% व्यक्तींमध्ये उच्च रक्तदाब आणि मधुमेह या दोन्ही आजार आढळले.

वाढलेला कोलेस्टेरॉल :

या सर्वेक्षणात, सुमारे २१% व्यक्तिंना (५ पैकी १) एकूण कोलेस्ट्रॉल ≥ १९० mg/dl वाढलेले आढळले किंवा सध्या वाढलेल्या कोलेस्ट्रॉलसाठी औषधोपचार घेत आहेत.


हेही वाचा : कसबा मतदारसंघातील ज्येष्ठ शिवसैनिकाला मुख्यमंत्र्यांकडून मदतीचा हात