घरताज्या घडामोडीनिवडणूक कामांसाठी गेलेल्या ८९९ कर्मचाऱ्यांना महापालिकेने परत बोलावले

निवडणूक कामांसाठी गेलेल्या ८९९ कर्मचाऱ्यांना महापालिकेने परत बोलावले

Subscribe

कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करा, महापालिकेची जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

आजवर सातत्याने निवडणूक कार्यालयात प्रतिनियुक्ती घेत मजा करणाऱ्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना अखेर महापालिकेने बोलावणे पाठवले. महापालिका प्रशासनाने निवडणूक ड्युटीसाठी पाठवलेल्या सर्वच कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी कार्यालयाला दिले आहेत. त्यामुळे निवडणूक कामासाठी कार्यरत असलेल्या महापालिकेच्या ८९९ कर्मचाऱ्यांना आता महापालिकेत परतावे लागणार आहे. मात्र, हे कर्मचारी कार्यमुक्त झाल्यानंतरही सेवेत न परतल्यास त्यांच्यावर, कर्मचाऱ्यांवर तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातून कार्यमुक्त न केल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ नुसार कारवाईचा इशाराही महापालिका प्रशासनाने दिला आहे.

मुंबई महापालिकेकडून निवडणूक कामासाठी पाठवण्यात आलेल्या कर्मचारी व अधिकारी वर्ग यांना तत्काळ निवडणूक कर्तव्यातून कार्यमुक्त करण्याबाबत जिल्हाधिकारी मुंबई शहर व जिल्हाधिकारी मुंबई उपनगरे यांना ३० एप्रिल रोजी महापालिका सामान्य प्रशासनाने कळवले आहे.

- Advertisement -

जिल्हाधिकारी शहर व जिल्हाधिकारी उपनगर यांना त्यांच्या मागणीनुसार मतदार केंद्रीय अधिकारी अर्थात बीएलओ म्हणून महापालिकेच्या विविध खात्यांतून कर्मचाऱ्यांना निवडणूक कामासाठी पाठवण्यात आले आहे. यामध्ये शहर जिल्हाधिकारी कार्यालयासाठी ४८२ कर्मचारी व मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयासाठी २३१ कर्मचारी पाठवण्यात आले आहेत. याशिवाय लोकसभा व विधानसभा २०१९ च्या निवडणुकीदरम्यान कार्यमुक्त न केलेले १८६ कर्मचारी हे बीएलओ म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये कार्यरत आहेत. त्यामुळे अशाप्रकारे एकूण ८९९ कर्मचारी निवडणूक कामकाजाकरता कार्यरत आहेत.


हेही वाचा – कोरोनाचे सावट महाराष्ट्र्र दिनावरही, शिवाजी पार्कवर संचलन नाही

- Advertisement -

मुंबईत सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे निवडणूक कर्तव्यार्थ पाठवलेल्या या सर्व कर्मचाऱ्यांना तत्काळ कार्यमुक्त करण्याबाबतचे परिपत्रक सामान्य प्रशासनाने जारी करत जिल्हाधिकारी कार्यालयांनाही बजावले आहे. निवडणूक कर्तव्यातून कर्मचारी व अधिकारी कार्यमुक्त होवून आल्यानंतर त्यांनी आपल्या विभागातील अलगीकरण कक्ष अर्थात क्वारंटाईन सेंटरमधील माहिती परिरक्षित करणे, संपर्क साधणे इत्यादी कामकाजाकरिता नियुक्ती करावे, असेही सामान्य प्रशासनाने स्पष्ट केले.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -