मुंबईसह १४ महापालिकांची आरक्षण सोडत जाहीर

प्रभागातील आरक्षणामुळे दिग्गजांना फटका, नव्याने करावी लागणार मोर्चेबांधणी, पहिल्यांदाच महिला-पुरुष उमेदवारांना समान संधी

MLA Raees Sheikh alleges that corruption is taking place in Mumbai Municipal Corporation

बहुप्रतिक्षित मुंबई महापालिकेसह १४ महापालिकांची आरक्षण सोडत मंगळवारी काढण्यात आली. यामध्ये नवी मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, वसई-विरार, पुणे, पिंपरी- चिंचवड, कोल्हापूर, अमरावती, नागपूर, अकोला, सोलापूर आणि नाशिक या महापालिकांचा समावेश आहे. जवळपास सर्वंच महापालिकांमध्ये एका प्रभागातून ३ नगरसेवक निवडून द्यायचे असल्याने अनेकांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे निश्चित झालेल्या आरक्षणानुसार अनेक उमेदवारांना ठरवून निवडणूक लढवता येईल. तर मुंबईतील सोडतीत अनेक प्रस्थापित माजी नगरसेवकांचे प्रभाग आरक्षित झाल्याने त्यांना फटका बसला आहे. त्यामुळे अशा माजी नगरसेवकांना आता शेजारच्या प्रभागात उडी मारावी लागणार आहे किंवा प्रभागाची नव्याने मोर्चेबांधणी करण्यासाठी जोर लावावा लागणार आहे. तसेच या आरक्षण सोडतीच्या माध्यमातून महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला व पुरुष उमेदवारांना समसमान संधी उपलब्ध झाली आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीविषयी प्रक्रिया सुरू केली आहे. राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील १४ महापालिकांना ३१ मेपर्यंत आरक्षण सोडत जाहीर करण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते ही सोडत काढण्यात आली. यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि महिला आरक्षणासाठी सोडत काढण्यात आली आहे. आरक्षित प्रभागांच्या सोडतीनंतर त्यावर ६ जूनपर्यंत सूचना-हरकती मागवण्यात येतील आणि त्यानंतर १३ जून रोजी अंतिम आरक्षण सोडत राजपत्रात प्रसिद्ध केली जाईल.

अंतिम आरक्षण सोडत राजपत्रात प्रसिद्ध होताच निवडणूक आयोगाकडून प्रभाग, बुथनुसार मतदार याद्या तयार केल्या जातील. ही संपूर्ण प्रक्रिया ऑगस्ट अखेर किंवा सप्टेंबर मध्यापर्यंत पूर्ण होण्याचा अंदाज आहे. त्यानंतर निवडणूक आयोगाकडून निवडणुकीची तारीख जाहीर होण्याची शक्यता आहे. ४५ दिवसांच्या आचारसंहितेचा कालावधी गृहित धरल्यास ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये महापालिका निवडणुका लागण्याची शक्यता आहे.

मुंबईत महिलांसाठी ११८ प्रभागांत आरक्षण
मुंबई महापालिकेच्या २३६ प्रभागातून महिलांसाठी ५० टक्के म्हणजे ११८ प्रभाग, अनुसूचित जातीसाठी १५ प्रभाग, अनुसूचित जमातीसाठी २ प्रभाग आरक्षित करण्यात आले आहेत. सोडतीत माजी महापौर किशोरी पेडणेकर यांचा प्रभाग खुला झाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे, तर अनेक माजी नागरसेवकांचे प्रभाग महिला, अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीसाठी आरक्षित झाल्याने त्यांना मोठा फटका बसला आहे. यामध्ये, महापालिकेतील स्थायी समितीचे माजी अध्यक्ष यशवंत जाधव, महापालिका विरोधी पक्षनेते रवी राजा, शिवसेनेचे अनिल कोकीळ, विश्वनाथ महाडेश्वर, भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे, विनोद मिश्रा, अमेय घोले, कमलेश यादव, अखिल भारतीय सेनेच्या गीता गवळी, समाजवादी पक्षाचे गटनेते व माजी नगरसेवक रईस शेख (रईस शेख हे सध्या आमदारही आहेत) आदी माजी नगरसेवकांचा समावेश आहे. त्यामुळे आरक्षणाचा फटका बसलेल्या नेत्यांना आजुबाजूच्या किंवा थोड्या दूरच्या पण सोयीच्या प्रभागात उडी मारून निवडणूक लढावी लागणार आहे.

नवी मुंबईत उमेदवारांचा हिरमोड
नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक प्रथम त्रिसदस्यीय पॅनल पद्धतीने होणार आहे. पालिकेच्या १२२ प्रभागांसाठी वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात लॉटरी पद्धतीने आरक्षण सोडत काढण्यात आली. ओबीसी आरक्षण नसल्याने सर्वच उमेदवारांचा हिरमोड झाला. त्यामुळे ११०० प्रेक्षक क्षमतेच्या सभागृहात अवघे १५० ते २०० कार्यकर्ते उपस्थित होते. अनुसूचित जातीच्या ६ प्रभागासाठी ११ प्रभागातून निवड करण्यात आली. यासाठी झालेल्या सोडतीमध्ये प्रभाग-२ (अ), प्रभाग ४ (अ), प्रभाग ५ (अ),प्रभाग ६(अ), प्रभाग १० (अ),प्रभाग २४ (अ) तर प्रभाग ११ (ब) अनुसूचित जमाती (महिला)साठी आरक्षित असणार आहेत. सर्वसाधारण महिला आरक्षित १४ प्रभागासाठी २८ प्रभागातून निवड करण्यात आली. यातून लॉटरी पद्धतीने प्रभाग ३ (ब), प्रभाग ७ (ब), प्रभाग ८(ब) व ९ (ब), प्रभाग १३ (ब) व १४ (ब) आणि १५ (ब), प्रभाग १७ (ब), प्रभाग २१(ब), प्रभाग २६ (ब), प्रभाग ३७ (ब), प्रभाग २८ (ब), प्रभाग ३३ (ब) आणि प्रभाग ३६ (ब) आरक्षित करण्यात आले आहेत.

ठामपा निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर

ठाणे महापालिकेच्या २०२२ मध्ये होणार्‍या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती (महिला) व सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण निश्चित करण्याकरिता डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे प्रशासक तथा महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. यामध्ये ५ अनुसूचित जाती, २ अनुसूचित जमाती, तर १७ सर्वसाधारण महिला जागांसाठी सोडत पद्धतीने आरक्षण जाहीर करण्यात आले. यामुळे महापालिका सभागृहात महिला आणि पुरुष सदस्यांचे संख्याबळ समान दिसणार आहे, तर बहुतांशी प्रस्थापितांना या आरक्षणाचा धक्का बसलेला नाही, तर घोडबंदर रोड, दिवा आणि मुंब्रा येथे महिलांना अधिक संधी मिळणार असल्याचे दिसत आहे.

ठाणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२२ करिता जनगणनेनुसार एकूण लोकसंख्या १८,४१,४८८ इतकी असून त्यामध्ये अनुसूचित जातींची लोकसंख्या १,२६,००३, अनुसूचित जमाती ४२,६९८ इतकी आहे. या निवडणुकीकरिता तीन सदस्यीय प्रभाग असे एकूण ४६ प्रभाग व चार सदस्यांचा १ असे एकूण ४७ प्रभाग अंतिम प्रभाग रचनेमध्ये प्रसिद्ध करण्यात आले आहेत.

केडीएमसीची आरक्षण सोडत
राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशावरून कल्याण डोंबिवली पालिकेने मंगळवारी आगामी पालिका निवडणुकीसाठी सोडत पद्धतीने महिलांचे आरक्षण जाहीर केले. ५० टक्के महिला आरक्षणाप्रमाणे १३३ नगरसेवकांमध्ये ६७ प्रभाग महिलांसाठी राखीव आहेत. ४२ प्रभागांमधील महिला आरक्षण आयोगाने जाहीर केले आहे. नऊ प्रभाग अनसूचित जाती, जमातीसाठी राखीव आहेत. उर्वरित १५ प्रभागांमध्ये सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण सोडत पद्धतीने जाहीर करण्यात आले. त्यात डोंबिवलीतील नऊ आणि कल्याणमधील सहा प्रभागांमध्ये महिलांचे आरक्षण जाहीर करण्यात आले.

वसई-विरार महापालिकेची आरक्षण सोडत जाहीर

वसई विरार महापालिकेची मुदत संपून २ वर्षे पूर्ण झाली असून मंगळवारी विरारमध्ये आरक्षण सोडत काढण्यात आली आहे. एकूण ४२ प्रभागातील १२६ जागांमधून आरक्षण काढण्यात आले. सर्वसाधारण वर्गासाठीच्या ११५ जागांपैकी ५७ जागा या महिलांसाठी आरक्षित आहेत. अनुसूचित जातीसाठी ५ जागा राखीव असून त्यापैकी महिलांसाठी तीन जागा राखीव आहेत, तर अनुसूचित जमातीसाठी ६ जागा राखीव असून महिलांसाठी ३ जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. या आरक्षणाबाबत १ जून ते ६ जूनपर्यंत हरकती आणि सूचना सादर करण्याची मुदत देण्यात आली आहे.

दरम्यान, ५० टक्के महिला आरक्षण असून १२६ पैकी ६३ महिला सभागृहात प्रतिनिधित्व करणार आहेत. या महिलांमध्ये ३ अनुसूचित जाती, ३ अनुसूचित जमाती आणि ५७ सर्वसाधारण प्रवर्गातील महिला असणार आहेत, तर ४२ प्रभागांपैकी ५ प्रभाग हे अनुसूचित जाती, ६ प्रभाग अनुसूचित जमाती आणि ११५ प्रभाग हे सर्वसाधारण असणार आहेत.