Coronavirus : दहिसरमधील गणपत पाटील नगर झोपडपट्टीकडे महापालिकेचे विशेष लक्ष!

दहिसरच्या सहायक आयुक्त संध्या नांदेडकर यांनी सर्व लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने येथील कोरोनाच्या संसर्गाला आळा घालण्याचा प्रयत्न केला.

दहिसरमधील आर-उत्तर विभागा सुरुवातील कोरोनाचे चार पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्यामुळे मोठी चर्चा आणि भीतीचे वातावरण मुंबईत निर्माण झाले होते. परंतु दहिसरच्या सहायक आयुक्त संध्या नांदेडकर यांनी सर्व लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने येथील कोरोनाच्या संसर्गाला आळा घालण्याचा प्रयत्न केला. दहिसरमधील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या गणपत पाटील नगरमध्ये वैद्यकीय आरोग्य शिबिर राबवून रुग्णांचा शोध स्वत:च घेतानाच सर्व झोपडपट्टयांमधील सार्वजनिक शौचालयांमध्ये दररोज जंतूनाशक फवारणी करून ही संख्या अधिक वाढणार नाही, याची काळजी घेतली आहे. याचाच परिणाम म्हणून दहा दिवसांपूर्वी २१ व्या क्रमांकावर असलेला दहिसरचा आर-उत्तर विभाग १२ रुग्णांसह २२ व्या क्रमांकावरच आहे.

दहिसरमधील शैलेंद्र नगर व वाल्मिकी नगर अंबावाडी तसेच केतकीपाडा येथे प्रारंभी कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले . ४ एप्रिल रोजी दहिसरमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या ४ एवढी होती. त्यावेळी २४ विभागांमध्ये कोरोनाग्रस्तांच्या क्रमवारीत आर-उत्तर विभाग २१ व्या स्थानावर होता. विशेष म्हणजे शैलेंद्र नगर वगळल्यास अन्य रुग्ण हे झोपडपट्टी परिसरातच आढळून आले होते. त्यामुळे एक प्रकारचे संसर्ग रोखण्याचे मोठे आव्हान असताना या विभागाने ही संख्या अधिक वाढणार नाही याची विशेष काळजी घेतली. त्यामुळे दहा दिवसानंतर या विभागाची रुग्ण संख्या १२ वर पोहोचली असली तरी क कोरोनाग्रस्तांच्या क्रमवारीत हा विभाग २२ व्या क्रमांकावर आहे. त्यावेळी शेवटच्या तीन क्रमांकावर असलेले बी, एफ-दक्षिण व जी-उत्तर हे तिन्ही विभाग आता कोरोनाग्रस्तांच्या क्रमवारीत अनुक्रमे १८, १५ आणि ६ व्या क्रमांकावर आहेत.

आर-उत्तर विभागाच्या सहायक आयुक्त संध्या नांदेडकर यांच्या नेतृत्वाखाली विभागाचे सर्व अधिकारी, आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच स्थानिक नगरसेवक, आमदार व खासदार आदींच्या सहकार्याने कोरोना विरोधातील लढा एकत्र येवून  दिला जात आहे. दहिसरमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या वाढू नये, याची विशेष काळजी घेतली जात आहेत. या विभागात झोपडपट्टी परिसर अधिक प्रमाणात आहे. त्यामुळे सार्वजनिक शौचालयांमधून याचा संसर्ग होण्याची शक्यता लक्षात घेवून प्रत्येक दिवशी शौचालयांचा परिसरांमध्ये जंतूनाशकांची फवारणी करून निर्जंतुकीकरण केले जात आहे. जे बाधित क्षेत्र आहे त्याठिकाणी दिवसांतून दोनदा फवारणी केली जात असल्याचे संध्या नांदेडकर यांनी स्पष्ट केले.

दहिसरमध्ये प्रती धारावीची म्हणून गणपत पाटील नगर झोपडपट्टी ओळखली जाते.या झोपडपट्टीत सुमारे ४० ते ४५ हजार एवढी लोकसंख्या आहे.  त्यामुळे करोनाचा संसर्ग रोखण्याच्यादृष्टीकोनातून महापालिका आरोग्य विभागाच्या माध्यमातून वैद्यकीय तपासणी शिबिर राबवून रुग्णांचा शोध घेण्यात आले. यामध्ये आरोग्य सेविकांनी तापाचे रुग्ण शोधून काढले आहेत. परंतु त्यांच्यामध्ये करोनाची लक्षणे नसली तरी त्यांच्यावर विशेष लक्ष ठेवण्यात आला आहे.  यापुढे दुसरी टिम आता थर्मल गनद्वारे तपासणी करून स्क्रिनिंग केले जाईल. केवळ झोपडपट्टीच नाहीतर इमारतीच्या परिसरांमध्येही याच प्रकारे विशेष लक्ष वेधण्यात आला आहे. करोनाग्रस्त आपल्याकडे येण्यापूर्वीच आपणच त्याचा शोध घेवून इतरांना संसर्ग होण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला जातो.  परिमंडळ ७चे उपायुक्त विश्वास शंकरवार यांच्या मार्गदर्शनामुळे तसेच या विभागातील खासदार, आमदार आणि नगरसेवक तसेच सामाजिक स्वयंसेवी संस्था, मंडळे यांचे योगदान महत्वाचे आहे. त्यांच्यामुळेच या विभागात करोनावर मात करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचेही  स्पष्ट केले.