मनपा निवडणूक : पत्ते कट झालेल्या इच्छूक उमेदवारांमध्ये आनंदी-आनंद

नाशिक : ओबीसीसह महिला आरक्षणामुळे राजकीय अस्तित्वच धोक्यात आलेल्या नाशिकमधील १५हून अधिक दिग्गज माजी नगरसेवकांना प्रभागरचना रद्दच्या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. २०१७प्रमाणे चार सदस्यीय प्रभागरचना राहिल्यास या माजी नगरसेवकांना निवडणूक लढविण्याची पुन्हा संधी मिळणार आहे.

आगामी महापालिका निवडणुकांसाठी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने चित्रसदस्यीय प्रभागरचनेचा निर्णय घेतला होता. २०२१च्या जनगणनेचा अहवाल नसल्याने लोकसंख्यावाढीचे निकष लावत आघाडी सरकारने नगरसेवकसंख्येत ११ने वाढ करत १२२ वरून १३३ नगरसेवकसंख्या निश्चित केली होती. या आरक्षण सोडतीत भाजपचे माजी सभागृहनेता सतीश सोनवणे व कमलेश बोडके या दोघांचेही प्रभाग अनुक्रमे ३९ व ७ याठिकाणी सर्वसाधारण महिला आरक्षण निघाले होते. प्रभाग २२ व २७ येथे अनुसूचित जाती व सर्वसाधारण अशा जागांवर महिला आरक्षण आल्यामुळे राहुल दिवे व प्रशांत दिवे या दोन्ही भावांचाही निवडणूक लढविण्याचा मार्ग बंद झाला होता. अनुसूचित जाती महिला आरक्षणामुळे भाजपाचे माजी नगरसेवक भगवान दोंदे यांची झाली असून त्यांना पत्नीला संधी द्यावे लागणार होती.

प्रभाग ४४ मध्ये विद्यमान नगरसेवक शिवसेनेचे सुदाम डेमसे यांची अडचण झाली होती. नाशिकरोडला विशाल संगमनेरे यांचीही कोंडी झाली होती. प्रभाग क्रमांक २ मध्ये दोन सर्वसाधारण जागेपैकी एक जागा महिला आरक्षित झाल्यामुळे माजी सभागृहनेता अरूण पवार किंवा स्थायी समितीचे सलग दोनदा सभापती राहीलेले गणेश गिते यांच्यापैकी कोण हा प्रश्न होता. सातपूरला प्रभाग क्रमांक १४ मध्ये सलीम शेख विरूद्ध शशिकांत जाधव असा सरळ सामना झाल्यास त्यांच्यापैकी एकाचा मार्ग बंद होणार होता. आता शिंदे-फडणवीस सरकारने वाढीव नगरसेवकसंख्या रद्द केल्याने त्रिसदस्यीय प्रभागरचना आणि त्यावर आधारीत आरक्षणही रद्द झाले आहे. आता २०१७ प्रमाणे चार सदस्यीय प्रभागरचना अस्तित्वात येणार असल्याने आरक्षणामुळे बाद झालेल्यांना निवडणूक लढविण्याची संधी मिळू शकणार आहे.

दीग्गजांच्या लढतीही टळल्या

त्रिसदस्यीय प्रभागरचना आणि आरक्षण सोडतीमुळे अनेक दिग्गजांना समोरासमोर निवडणूक लढविण्याची नामुष्की ओढवली होती. जुन्या नाशकातील प्रभाग क्रमांक १८, १९ व २० मधील आरक्षणाने राजकीय समीकरणे बदलली होती. प्रभाग १८ मध्ये दोन महिला व एक सर्वसाधारण आरक्षणामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक सुफी जीन यांच्यासमोर एकमेव खुल्या जागेवर माजी महापौर विनायक पांडे, अ‍ॅड. यतिन वाघ, गजानन शेलार, राजेंद्र बागूल असा सामना होणार होता. प्रभाग १९ मध्ये दोन महिला व एक जागा खुल्या प्रवगार्साठी राखीव झाल्याने काँग्रेस गटनेते शाहू खैरे यांच्यासह भाजपचे गणेश मोरे तसेच, गजानन शेलार, पांडे यांच्यात लढत होती. शिंदे सरकारच्या निर्णयामुळे ही लढत टळली आहे.