घरताज्या घडामोडीमुंबईतील पालिका शाळेत आपत्ती व्यवस्थापनाची ‘भूकंप’बाबत रंगीत तालीम

मुंबईतील पालिका शाळेत आपत्ती व्यवस्थापनाची ‘भूकंप’बाबत रंगीत तालीम

Subscribe

मुंबई: भूकंप प्रवण क्षेत्र असलेल्या मुंबईमधील सीएसएमटी रेल्वे स्थानकानजीक असलेल्या येथील मनोहरदास स्ट्रीट महापालिका शाळेमध्ये मंगळवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास तीव्र भूकंपाचे धक्के बसले. काही अवधीतच या शाळेची इमारत कोसळली. सुदैवाने आपत्तीनिवारण पथक, अग्निशमन दल, पोलीस, पालिका कर्मचारी, एनडीआरएफ आदी यंत्रणांनी तत्पूर्वीच शाळेतील ८२ विद्यार्थी, शिक्षक यांची सुखरूप सुटका केल्याने ते थोडक्यात बचावले. एवढेच नव्हे तर सदर इमारतीच्या ढिगाऱ्यात अडकलेल्या अन्य पाच शिक्षकांचीही जखमी सुटका करण्यात आली असून ते जखमी झाल्याने त्यांना तातडीने नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

यावेळी, पोलीस, अग्निशमन व एनडीआरएफ दल, वाहनांच्या रांगा, रुग्णवाहिका, डॉक्टरांची टीम, जखमी व्यक्ती, स्ट्रेचर, गर्दी, धावपळ, बचावकार्य, ढिगाऱ्याखाली अडकलेल्या माणसांचा शोध घेणारे कुत्रे, असा सर्व घटनाप्रकार पाहून रस्त्यावरील नागरिक क्षणभर संभ्रमित व काहीसे भयभीत झाले होते. त्यांना त्या शाळेत नेमके काय घडले आहे तेच समजले नव्हते.

- Advertisement -

मात्र मुंबई महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या प्रमुख पुढाकाराने व इतर यंत्रणांच्या सहकार्याने आयोजित केलेली भूकंपाची रंगीत तालीम असल्याचे आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक महेश नार्वेकर यांनी जाहीर केले आणि नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

अशी झाली भूकंपाची यशस्वी रंगीत तालीम

- Advertisement -

या भूकंपाच्या रंगीत तालमीच्या अंतर्गत, मंगळवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास महापालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षात एक तातडीचा दूरध्वनी संदेश आला. या संदेशानुसार दक्षिण मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जवळील मुख्य टपाल कार्यालयाच्या बृहन्मुंबई महापालिकेच्या मनोहरदास स्ट्रीट महानगरपालिका शाळेमध्ये भूकंपाचे धक्के जाणवत असल्याचे शिक्षण खात्यातील प्रशासकीय अधिकारी अश्फाक शेख यांनी कळविले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन खात्याने सदर शाळेतील शिक्षक व कर्मचा-यांशी संपर्क साधून त्यांना तातडीने सदर इमारत रिकामी करण्यास सांगितले.

तसेच इमारत रिकामी करताना यापूर्वी देण्यात आलेल्या प्रशिक्षणानुसारच टप्पेनिहाय पद्धतीने तातडीने कार्यवाही करण्यास सांगितले. त्याचवेळी आपत्कालीन व्यवस्थापन खात्याच्या नियंत्रण कक्षातील दुस-या चमुने भूकंपाचा सदर संदेश तात्काळ मुंबई अग्निशमन दल, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथक, पोलीस इत्यादींना त्वरित कळवित त्यांच्या पथकांना तातडीने घटनास्थळी पोहोचण्यास निर्देशित केले. त्याचबरोबर रुग्णवाहिका, रुग्णालये यासह विविध यंत्रणांना सुसज्ज राहण्यास देखील त्याचवेळी सांगण्यात आले.

मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन खात्याद्वारे देण्यात आलेल्या सुचनांनुसार सदर शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांद्वारे मनोहरदास शाळेची इमारत तात्काळ रिकामी करण्यात आली. या दरम्यान ६४ विद्यार्थी व १८ शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी, यानुसार एकूण ८२ व्यक्तिंना इमारतीतून सुखरुपपणे बाहेर काढण्यात आले. मात्र, त्यानंतर काही क्षणातच संपूर्ण इमारत भूकंपाच्या धक्क्यांनी कोसळली. त्यावेळी या इमारतीमध्ये ५ शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी अडकलेले होते. इमारतीच्या ढिगा-याखाली अडकलेल्या या व्यक्तिंचा शोध घेण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाच्या श्वानांची मदत घेण्यात आली. या श्वानांनी संकेत दिलेल्या ठिकाणी ५ व्यक्ती ढिगा-याखाली अडकल्याचे आढळून आले. या व्यक्तिंना काढण्याची कार्यवाही मुंबई अग्निशमन दलाद्वारे तात्काळ सुरु करण्यात आली.

या कार्यवाही दरम्यान ५ व्यक्तिंना ढिगा-याखालून बाहेर काढण्यात आले. तसेच या ढिगा-याखालून एका मांजरीची देखील सुटका करण्यात आली. त्यानंतर, सदर इमारतीच्या ढिगा-याखालून काढलेल्या जखमी व्यक्तिंना आवश्यक त्या वैद्यकीय उपचारांसाठी महापालिकेच्या नायर रुग्णालयात पाठविण्यात आले. यासाठी १०८ या क्रमांकाशी संबंधित रुग्णवाहिकेची मदत घेण्यात आली. याप्रसंगी धावत्या रुग्णवाहिकेत देखील डॉ. आशिष यादव यांनी जखमी व्यक्तिंवर उपचार केले. तर नायर रुग्णालयात जखमी व्यक्ती दाखल झाल्यानंतर डॉ. सारीका पाटील यांच्या मार्गदर्शनात संबंधित डॉक्टरांच्या चमुने रुग्णांवर उपचार करण्यास सुरुवात केली.

आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून अधूनमधून आपत्तीबाबत रंगीत तालीम

सरतेशेवटी, केंद्र शासनाच्या निर्देशांनुसार व सह आयुक्त (सामान्य प्रशासन) मिलिन सावंत यांच्या मार्गदर्शनानुसार, भूकंप विषयक रंगीत तालमीचा भाग असल्याचे संचालक (आपत्कालीन व्यवस्थापन) महेश नार्वेकर यांनी घोषित केले. तसेच या रंगीत तालमीत सहभागी व्यक्ती, इमारत आणि आसपासचा परिसर सुरक्षित असल्याची माहिती देतानाच सदर परिसरातील सर्व सेवा पूर्ववत सुरु करण्यात आल्या असल्याचीही माहितीही महेश नार्वेकर यांनी दिली.

या रंगीत तालमीत सहभागी झालेल्या कोणत्याही व्यक्तिला काहीही दुखापत झालेली नाही किंवा या सरावा दरम्यान कोणीही जखमी झालेले नाही. तसेच या धर्तीवर भविष्यात देखील विविध आपत्तींविषयीची रंगीत तालिम नियमितपणे घेण्यात येईल. जेणेकरुन, आपत्कालीन व्यवस्थापनाबाबत संबंधित यंत्रणांना आपत्ती प्रसंगी सुसमन्वय साधण्याचा सराव होईल, असेही नार्वेकर यांनी सांगितले.

आपत्कालीन व्यवस्थापन खात्याच्या प्रमुख अधिकारी रश्मी लोखंडे यांनी, भूकंप विषयक घटनेवर रंगीत तालीम सरावात, पालिका कर्मचारी, मुंबई अग्निशमन दल, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथक (NDRF), मुंबई पोलीस, पालिकेचा ‘ए’ विभाग साहाय्यक आयुक्त शिवदास गुरव व नागरी संरक्षण दल, ‘१०८’ रुग्णवाहिका सेवा आणि नायर सर्वोपचार रुग्णालय आदी यंत्रणांच्या ३०० कर्मचारी, अधिकारी आदी समाविष्ट करुन घेण्यात आले.


हेही वाचा : सत्ता गेल्याच्या वैफल्यातून भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न, नारायण राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -