मुक्त विद्यापीठाचे माजी कुलसचिव कापडणीसांसह मुलाचा खून

झटपट श्रीमंतीसाठी मुक्त विद्यापीठाचे माजी कुलसचिव नानासाहेब कापडणीस आणि त्यांचा मुलगा अमित यांचा खून सोसायटीतीलच एकाने केल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. सरकारवाडा पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, न्यायालयाने त्यास १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. नानासाहेब रावजी कापडणीस (वय ७०, रा. दोघेही पंडित कॉलनी, नाशिक), अमित नानासाहेब कापडणीस (वय ३५) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. राहुल गौतम जगताप (रा. नाशिक) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, मुख्य आरोपी राहुल यानेच नानासाहेब आणि अमित कापडणीस यांचा गळा आवळून खून केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी त्याने नानासाहेबांचा मृतदेह अंबोली घाटात टाकून दिला होता. तर, अमितचा मृतदेह नगर जिल्ह्यातल्या राजूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत टाकला होता. डिसेंबर महिन्यात खूनाची घटना घडली होती. त्यानंतर तब्बल महिनाभराने कापडणीस यांच्या मुलीने दोघेही बेपत्ता असल्याची तक्रार सरकारवाडा पोलिसांत दिली होती. हा खून संपत्तीसाठी झाल्याचंही पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.