कोयत्याने वार करत वयोवृद्ध शेतकर्‍याचा खून

औरंगाबाद जिल्ह्यातील घटना

कन्नड : औरंगाबाद जिल्ह्यातील लोहगाव (ता. कन्नड) येथील वयोवृद्ध शेतकर्‍याचा अनोळखी व्यक्तीने धारदार कोयत्याने सपासप वार खून केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (दि.२८) रात्री ८.३० वाजेदरम्यान घडली. या घटनेमुळे औरंगाबाद जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. जगन्नाथ साळूबा मनगटे (वय ६०) असे खून झालेल्या शेतकर्‍याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जगन्नाथ मनगटे यांच्या भावकीतील कारभारी कौतिक मनगटे यांच्या मुलीचे लग्न लोहगावात होते. त्यासाठी जगन्नाथ मनगटे हे कुटुंबियांसह गावात आले होते. लग्न लावून ते एकटेच गावालगतच्या शेतातील घरी जात होते. ते लोहगाव- बरकतपूर रस्त्यावरून घराच्या दिशेने जात होते. त्यावेळी काही समजण्याच्या आतच अनोळखी व्यक्तीने त्यांच्यावर धारदार कोयत्याने हल्ला केला. त्यात ते गंभीर जखमी झाले.

दरम्यान, त्यांच्या पत्नी ध्रुपदाबाई मनगटे यांना शेताकडे जाणार्‍या रस्त्यावर पतीची रक्ताने माखलेली टोपी दिसली. त्यांना काहीतरी अघटित घडल्याची शंका आली. त्यांनी आजूबाजूला शोध घेतला असता त्यांना आपले पती रक्ताच्या थारोळ्यात खोल खड्ड्यात गंभीर जखमी अवस्थेत पडलेले दिसून आले. त्यांनी तात्काळ पतीला योगेश संजय मनगटे आणि मच्छिंद्र मनगटे यांच्या मदतीने सिल्लोड येथे उपचारासाठी दाखल केले. डॉक्टरांनी तपासणी करुन त्यांना मृत घोषित केले.

घटनेची माहिती मिळताच पिशोर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक कोमल शिंदे हे सहकार्‍यांसह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी शोध घेतला असता काहीच हाती लागले नाही. सकाळी श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. मात्र, आरोपीचा शोध लागू शकला नाही. याप्रकरणी पिशोर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक कोमल शिंदे करत आहेत.