घर महाराष्ट्र मविआत एकी कायम, संभ्रम निर्माण करू नका; शरद पवारांची स्पष्ट भूमिका

मविआत एकी कायम, संभ्रम निर्माण करू नका; शरद पवारांची स्पष्ट भूमिका

Subscribe

शरद पवार यांनी माध्यमांसमोर येत अजित पवारांची भेट घेतल्याबद्दल मी आधीच स्पष्टीकरण दिलं होतं, असं सांगितलं. तसंच, मविआमध्ये कोणताही संभ्रम नाही, मविआ एकसंध आहे, असं शरद पवार यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.

शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीमुळे सध्या राजकीय वर्तुळात संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. मविआमध्ये या भेटीमुळे नाराजी असल्याचं बोललं जात आहे. त्यावर काल, रविवारी देखील शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली होती. आता पुन्हा एकदा शरद पवार यांनी माध्यमांसमोर येत अजित पवारांची भेट घेतल्याबद्दल मी आधीच स्पष्टीकरण दिलं होतं, असं सांगितलं. तसंच, मविआमध्ये कोणताही संभ्रम नाही, मविआ एकसंध आहे, असं शरद पवार यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे. ( MVA is united do not create confusion Explanation of Sharad Pawar on Ajit pawar met )

शरद पवार काय म्हणाले ?

अजित पवार हे माझे पुतणे आहेत. पवार कुटुंबात मी वडीलधारा माणूस आहे. त्यामुळे अजित पवार मला भेटायला आले यात गैर नाही. आमची बैठक ही गुप्त नाही. राष्ट्रवादी पक्ष भाजपसोबत जाणार नाही, हे मी स्पष्टपणे सांगतो. 31 तारखेला मुंबईमध्ये प्राथमिक अजेंडा ठरवण्याची बैठक आहे. या बैठकीला इंडियाचे नेते येणार आहेत. ही बैठक मी स्वत:, उद्धव ठाकरे आणि नाना पटोले आयोजित करणार आहोत. अनेक गोष्टींवर या बैठकीत चर्चा होणार आहे. बैठकीला सोनिया गांधी उपस्थित राहणार का? यावर शरद पवार म्हणाले की, अजून बैठकीला येणाऱ्या नेत्यांची यादी आलेली नाही, त्यामुळे त्या येणार की नाही हे सांगता येणार नाही.

- Advertisement -

राज्यात पाऊस कमी झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढावलं आहे. राज्य सरकारने याकडे गांभीर्यानं लक्ष देऊन योग्य ती पावले उचलावीत, असंही शरद पवार यावेळी म्हणाले.

तसंच, काल मी सोलापूरात होतो. लोकांचा प्रचंड प्रतिसाद आहे. उद्या मी औरंगाबादला जाऊन ना, धों, महानोर यांच्या कुटुंबियांची भेट घेणार आहे. तसंच, प्राध्यापक बोराडे यांच्या कुटुंबियांचीही भेट घेणार असल्याचं, शरद पवार म्हणाले. तसंच, बीडमध्ये जाहीर सभाही घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

- Advertisement -

नवाब मलिक यांना वैद्यकीय कारणासाठी सर्वोच्च न्यायालयानं जामीन मंजूर केला आहे. यावर प्रतिक्रिया देताना, शरद पवार म्हणाले की, मलिक यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न मी काल केला होता. आज त्यांना जेलमधून सोडण्याची शक्यता आहे. त्यामुळे मी ते जेलमधून बाहेर आल्यावर त्यांच्याशी संवाद साधणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातच एका सरकारी रुग्णालयात एकाच दिवशी 18 लोकांचा मृत्यू होणं ही चिंताजनक बाब असल्याचं शरद पवार म्हणाले. राज्य कोणत्या दिशेनं जात आहे, त्याचा हा उत्तम नमुना आहे, असं म्हणत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र डागलं. तसंच, जे रुग्ण दगावलेत त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे. आता जे घडलं ते चित्र दूर करण्यासाठी शासनानं कठोर पावलं उचलणं गरजेचं असल्याचंही शरद पवार यावेळी म्हणाले.

( हेही वाचा:  … तर कमळावर निवडणूक लढवू; शिंदे गटाच्या आमदाराचं मोठं विधान )

- Advertisment -