घरमहाराष्ट्रमहामोर्चासाठी मविआच्या नेत्यांची रणनीती, पूर्वतयारीसाठी बैठकांचा सिलसिला

महामोर्चासाठी मविआच्या नेत्यांची रणनीती, पूर्वतयारीसाठी बैठकांचा सिलसिला

Subscribe

Mahamorcha | भायखळा येथील राणी बाग येथून महामोर्चाला सुरुवात होणार असल्याने रविवारीही महाविकास आघाडीचे नेते आमदार सुनील प्रभू, अनिल परब, मिलिंद नार्वेकर, सचिन अहिर, काँग्रेसचे नसीम खान, राष्ट्रवादीचे हेमंत टकले, समाजवादीचे आमदार रईस शेख आदींनी पूर्व तयारींच्या दृष्टीने एक बैठक घेतली होती.

मुंबई – राज्यातील सत्ताधारी शिंदे – फडणवीस यांच्या सरकारविरोधात १७ डिसेंबर रोजी मुंबईत राणी बाग येथून मंत्रालयावर (आझाद मैदान) महामोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाच्या पूर्वतयारीसाठी महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेले शिवसेना उद्धव ठाकरे गट, काँग्रेस, राष्ट्रवादी आदी पक्ष आतापासूनच कामाला लागले आहे. या मोर्चासाठी विशेष रणनीती ठरविण्यासाठी सोमवारी पालिका मुख्यालयात शिवसेनेच्या कार्यालयात शिवसेनेचे नेते, माजी नगरसेवक आदींची बैठक पार पडली.

या बैठकीला प्रारंभी सेना नेते आमदार अनिल परब, सचिन अहिर, अजय चौधरी, मिलिंद नार्वेकर, माजी महापौर किशोरी पेडणेकर, विश्वनाथ महाडेश्वर, माजी सभागृह नेत्या विशाखा राऊत आदी मोजके नेते, माजी नगरसेवक व राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.

- Advertisement -

हेही वाचा – वादावर मी पडदा टाकत आहे, सर्वांनी तो थांबवावा, चंद्रकात पाटलांचे आवाहन

राज्यात काही महिन्यांपूर्वी शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी आपल्या समर्थक आमदारांसह बंडखोरी करून भाजपसोबत बस्तान बांधले. त्यामुळे बहुमत गेल्याने तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारला सत्तेवरून पायउतार व्हावे लागले होते. त्यानंतर भाजपचे देवेंद्र फडणवीस व शिवसेना बाळासाहेब ठाकरे गटाचे एकनाथ शिंदे यांनी सरकार स्थापन केले. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री झाले. मात्र हे सरकार सत्तेवर आल्यापासून राज्यपाल कोश्यारीपासून मंत्री, नेते आदींकडून महापुरुषांबाबत अवमानजनक वक्तव्ये करणे, शेतकऱ्यांच्या समस्या मार्गी न लागणे, महिलांवरील वाढते अत्याचार, महागाई, सीमावाद आदी प्रश्नी महाविकास आघाडीतर्फे येत्या १७ डिसेंबर रोजी महामोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चासाठी अंदाजे किमान ३ लाख अथवा त्यापेक्षाही जास्त लोक रस्त्यावर उतरण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

- Advertisement -

मात्र या मोर्चाची घोषणा महाविकास आघाडीचे नेते उद्धव ठाकरे, अजित पवार, बाळासाहेब थोरात आदी नेत्यांनी केल्यापासून मोर्चाच्या पूर्व तयारीसाठी व मोर्चा यशस्वी करण्यासाठी आघाडीचे नेते, पदाधिकारी आदी मंडळी चांगलीच कामाला लागली आहे.

हेही वाचा – छत्रपती शिवाजी महाराज कुणबी समाजाचे; नाना पटोले यांच्या वक्तव्याने नवा वाद

भायखळा येथील राणी बाग येथून महामोर्चाला सुरुवात होणार असल्याने रविवारीही महाविकास आघाडीचे नेते आमदार सुनील प्रभू, अनिल परब, मिलिंद नार्वेकर, सचिन अहिर, काँग्रेसचे नसीम खान, राष्ट्रवादीचे हेमंत टकले, समाजवादीचे आमदार रईस शेख आदींनी पूर्व तयारींच्या दृष्टीने एक बैठक घेतली होती.

मोर्चात महिला, युवा मोठ्या संख्येने उतरतील – किशोरी पेडणेकर

मुंबई महापालिका मुख्यालयातील शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या पक्ष कार्यालयात शिवसेनेच्या माजी नगरसेवक, काही विभाग प्रमुख, महिला पदाधिकारी, शिवसेनेचे नेते यांची मोर्चाची पूर्व तयारी व मोर्चा यशस्वी करण्यासाठी काही रणनीती आखण्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण बैठक सोमवारी संध्याकाळच्या सुमारास पार पडली. या बैठकीबाबत माहिती देताना, माजी महापौर व शिवसेनेच्या प्रवक्त्या किशोरी पेडणेकर यांनी महाविकास आघाडीच्या १७ डिसेंबर रोजी आयोजित केलेल्या महामोर्चात शिवसेनेकडून किमान एक लाख महिला, युवा, पदाधिकारी, आदी उतरतील, असा दावा केला. तसेच, मोर्चा निघण्याच्या एक आठवडा अगोदरपासूनच महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्ते आदिना सूचना देण्यात येत आहेत, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

खोटे बोल पण रेटून बोल; चित्रा वाघ यांना प्रत्युत्तर

राज्यात निर्भया पथकाची वाहने महाविकास आघाडी सरकारच्या काळात अगोदरच वापरण्यात आली होती, असा दावा भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी केल्याचे सांगताच माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी, ‘खोटे बोल पण रेटून बोल’, अशी प्रतिक्रिया देत चित्रा वाघ यांना प्रत्युत्तर दिले. तसेच, हे त्यांचे विचित्र वागणे आहे. निर्भया पथकाची वाहने कुठे कुठे कशी वापरली जात आहेत, त्याचे स्पॉट कुठे आहेत, याची माहिती आम्ही अगोदरच दिलेली आहे. वास्तविक, निर्भया पथकाची वाहने ही महिलांच्या सुरक्षिततेसाठी देण्यात आलेली असून त्यांनी आरोप – प्रत्यारोप करीत राहण्यापेक्षा वस्तुस्थिती जाणून घ्यावी, अशी सूचनाही किशोरी पेडणेकर यांनी यावेळी केली. त्याचप्रमाणे, गेल्या ऑगस्ट महिन्यात सदर निर्भया पथकांची वाहने रस्त्यावर दिसत होती. त्यानंतर ती वाहने गायब झाली, अशा लोकांच्या तक्रारी आहेत. त्यामुळे हे सर्व विचित्र चालले आहे, असेही त्यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -