मुंबई : महाविकास आघाडीची जागा वाटपांबाबतची आणि लोकसभेच्या रणनितीची महत्त्वाची बैठक काल (ता. 30 जानेवारी) पार पडली. मुंबईतील ट्रायडेंड हॉटेलमध्ये ही बैठक झाली. परंतु, या बैठकीत वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडीमध्ये नाराजीमय नाट्य पाहायला मिळाले. मात्र, ही बैठक चांगली झाली असून या बैठकीत जागावाटपांवर सकारात्मक चर्चा झाली असल्याची माहिती मविआचे नेते आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिली. परंतु, मविआत अद्यापही लोकसभेच्या आठ जागांचा तिढा सुटला नसल्याची माहिती समोर आली आहे. लोकसभेच्या 40 जागा कोण लढवणार हे मविआत निश्चित झाले आहे. पण लोकसभेच्या आठ जागा अशा आहेत, ज्या जागांवर ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये धुसफूस सुरू आहे. (MVA seat sharing: In MVA, there is still confusion on 8 seats)
हेही वाचा… Maratha Vs OBC : रस्त्यावरील लढा आता न्यायालयात; अधिसूचनेविरोधात ‘ओबीसी’ हायकोर्टात!
राज्यात लोकसभेच्या 48 जागा आहेत. या 48 जागांपैकी 40 जागांचा तिढा सुटला आहे. पण नागपूरमधील रामटेक, हिंगोली, वर्धा, भिवंडी, जालना, शिर्डी आणि मुंबईतील दोन जागांबाबत अद्यापही कोणताच मार्ग निघालेला नाही. काँग्रेसने मुंबईतील दक्षिण मध्य लोकसभा आणि उत्तर पश्चिम लोकसभेवर आपला दावा सांगितला आहे. परंतु, 2019 च्या लोकसभेत या दोन्ही लोकसभेवर शिवसेनेचा उमेदवार विजयी होऊन आला होता. या दोन्ही जागांवर विजयी झालेले खासदार हे शिवसेना शिंदे गटात असले तरी हे दोन्ही लोकसभा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखले जातात.
महाविकास आघाडीत ज्या आठ लोकसभेच्या जागांवरून धुसफूस सुरू आहे, त्या आठ जागांपैकी पाच जागांवर शिवसेना शिंदे गटाचे खासदार असून तीन जागांवर भाजपाची सत्ता आहे. त्यामुळे आगामी लोकसभेत महायुतीतही या जागांवरून धुसफूस होण्याची शक्यता आहे. मात्र, आता मविआत या जागांबाबत नेमका निर्णय होणार, हे पाहणेही तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे मुंबईतील दोन लोकसभेच्या जागांसाठी शिवसेना ठाकरे गटाकडून माघार घेण्यात येणार नाही, असे आधीच स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे आता जर 2 फेब्रुवारीला होणाऱ्या मविआच्या पुढील बैठकीत जागा वाटपाचा तिढा सुटला गेला नाही तर हा मुद्दा तिन्ही पक्षाच्या नेतृत्वासमोर मांडला जाण्याची शक्यता आहे.
मविआत आधीच आठ जागा वाटपाचा तिढा कायम आहे. त्यातही आता वंचित बहुजन आघाडीला मविआत अधिकृत स्थान देण्यात आल्याने त्यांनी किती आणि कोणत्या जागा देण्यात येणार? यावरून वाद होण्याची शक्यता आहे. तर, मिळालेल्या माहितीनुसार, मराठवाड्यातील 8 जागांपैकी सर्वाधिक जागा शिवसेना ठाकरे गटाला मिळणार आहेत. ठाकरे गटाला 4, काँग्रेसला 3 तर राष्ट्रवादी शरद पवार गटाला 1 जागा देण्याचा निर्णय अंतिम टप्प्यात आहे. मात्र हिंगोलीच्या जागेवर तिन्ही पक्षांचे दावे असल्याने मविआच्या पुढील बैठकीत याबाबत चर्चा होणार आहे.