महाराष्ट्रातल्या राजकीय एजंट्सकडून जीवाला धोका; वनरुपी क्लिनिकच्या संचालकांची मोदींकडे मदतीची मागणी

Dr. Rahul Ghule
महाराष्ट्रातल्या राजकीय एजंट्सकडून जीवाला धोका; वनरुपी क्लिनिकच्या संचालकांची मोदींकडे मदतीची मागणी

महाराष्ट्रातल्या राजकीय एजंट्सकडून जीवाला धोका असल्याचा दावा वन रुपी क्लिनिकचे संचालक डॉ. राहुल घुले यांनी केला आहे. याबाबत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मदत देखील मागितली आहे. डॉ. घुले यांनी ट्विट करत ही माहिती दिली. राजकीय एजंट्स कोण आहेत? त्यांच्यापासून घुले यांच्या जीवाला का धोका आहे? याची कारणं समोर आलेली नाहीत.

ठाण्यातील खासदार आहेत त्यांच्या निकटवर्तीयांनी धमकी दिली. ठाण्यामध्ये एक क्लिनिक सुरू केलं होतं. या क्लिनिकचं बिल काढण्याचं प्रकरण होतं. बिल काढण्यासाठी त्यांच्याकडे तब्बल ५० लाखांची मागणी केली होती. यासाठीच धमकावलं जात आहे, असा दावा डॉ. घुले यांनी केला आहे. ही माहिती एबीपी माझाकडे घुले यांनी दिली. दरम्यान, यासंदर्भात त्यांनी अद्याप तक्रार दाखल केलेली नाही आहे.

डॉ. राहुल घुले यांनी ट्विट केलं आहे. यामध्ये त्यांनी “राज्यातील राजकीय एजंट्सकडून माझ्या जीवाला धोका आहे. पंतप्रधान मोदी माझी मदत करा. मी लवकरच नावं जाहीर करेन,” असं म्हटलं आहे. घुले यांच्या ट्विटवर ठाणे शहर पोलिसांनी कॉन्टॅक्ट नंबर पाठवण्याची विनंती केली असता घुले यांनी तुम्ही काहीच करणार नाही माहिती आहे मला, असं ट्विट केलं आहे. तसंच त्यांनी कायमचं दिल्लीला शिफ्ट होत असल्याचं देखील म्हटलं आहे.