Homeमहाराष्ट्रCM Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज बीड दौऱ्यावर, धनंजय मुंडे राहणार...

CM Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज बीड दौऱ्यावर, धनंजय मुंडे राहणार गैरहजर

Subscribe

बीड – पीकविमा घोटाळा, संतोष देशमुख हत्याकांड यामुळे बीड जिल्हा सध्या राज्यात चर्चेत आहे. त्यातच आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज बीड जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. आष्टी मतदारसंघात त्यांचा जाहीर कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित पवार देखील उपस्थित राहणार असल्याची चर्चा आहे. मात्र परळीचे आमदार आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे या कार्यक्रमाला गैरहजर राहणार असल्याची माहिती समोर आली आहे.

धनंजय मुंडे राहाणार गैरहजर 

महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर हिवाळी अधिवेशनापासून भाजपचे आमदार सुरेश धस हे धनंजय मुंडे यांच्याविरोधात आक्रमक झाले आहेत. त्यांनी हिवाळी अधिवेशनात पीकविमा घोटाळ्याचा आरोप केला होता. त्यानंतर संतोष देशमुख हत्याकांडातील मास्टरमाईंड वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असल्याचाही आरोप त्यांनी केला होता. या सर्व पार्श्वभूमीवर आज आष्टी येथे सुरेश धस यांचा वाढदिवस आणि आष्टी मतदारसंघातील विविध विकास कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला बीडचे पालकमंत्री अजित पवार, मंत्री पंकजा मुंडे, मंत्री धनंजय मुंडे यांनाही निमंत्रित करण्यात आले आहे. मात्र मंत्री धनंजय मुंडे या कार्यक्रमाला गैरहजर राहाणार आहेत.

 गैरहजेरीचे कारण काय?

आष्टी विधानसभा मतदारसंघातील विकास कामांच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमांसाठी धनंजय मुंडे यांना निमंत्रण देण्यात आले असल्यचे आमदार सुरेश धस यांनी सांगितले आहे. मात्र मंत्री मुंडे या कार्यक्रमाला धनंजय मुंडे उपस्थित राहाणार नसल्याीच माहिती समोर आली आहे. धनंजय मुंडे यांच्या डोळ्यांचे ऑपरेशन असल्यामुळे ते या ठिकाणी उपस्थित राहणार नाहीत, असे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

पालकमंत्री आणि पर्यावरण मंत्री येणार का?

महायुती सरकार स्थापन झाल्यापासून सुरेश धस चर्चेत आहेत. विधानसभा निवडणूक जिंकल्यानंतर पहिल्याच सभेत त्यांनी पंकजा मुंडे यांच्यावर थेट आरोप केले होते. पंकजा मुंडे यांनी आपला प्रचार केला नाही, उलट भाजप उमेदवाराविरोधातील प्रतिस्पर्धी उमेदवाराला ताकद देण्याचा प्रयत्न केला, असा आरोप सुरेश धस यांनी केला होता. दुसरीकडे त्यांनी धनंजय मुंडे यांच्याविरोधात रान पेटवले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार धनंजय मुंडे यांचा एवढा लाड का करतात, दादा याचा राजीनामा घ्या असे आवाहन त्यांनी संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ पुणे येथे आयोजित आक्रोश मोर्चात केले होते. त्यामुळे पंकजा मुंडे आणि अजित पवार आमदार धसांच्या निमंत्रणाला मान देऊन कार्यक्रमाला येणार का, हे पाहणेही महत्त्वाचे ठरणार आहे.

हेही वाचा : Pending Dues : राज्यातील विकासकामांना ब्रेक? उद्यापासून काम बंद आंदोलन, सरकारला कोणी दिला इशारा