माय महानगर विशेष : जाणून घ्या, ‘तिरंग्या’बद्दलची विस्तृत माहिती

भारतीय नागरिकांसाठी राष्ट्रध्वज अत्यंत महत्त्वाचा आहे. राष्ट्रध्वज हा भारतीयांसाठी अभिमानाची बाब आहे. भारतीय ध्वज खादी (महात्मा गांधींमुळे प्रसिद्ध झालेल्या व हाताने कातलेल्या) नावाच्या विशिष्ट प्रकारच्या कापडापासून बनवला जातो. स्टँडर्ड ब्युरो ऑफ इंडिया त्याच्या बांधकाम आणि डिझाईनसाठी जबाबदार आहे. तर, खादी विकास व ग्रामोद्योग आयोगाला त्याचे उत्पादन करण्याचा अधिकार आहे. 2009 मध्ये राष्ट्रीय ध्वजाची एकमेव उत्पादक कर्नाटक खादी ग्रामोद्योग संघटना होती. कोणत्याही खासगी नागरिकाने (कोणत्याही राष्ट्रीय दिवशी वगळता) राष्ट्रध्वज वापरण्यास सक्त मनाई होती. तर, 2002 मध्ये नवीन जिंदाल यांच्या विनंतीवरून भारत सरकारने (भारताचे केंद्रिय मंत्रिमंडळ) ध्वजाच्या मर्यादित वापराचा कायदा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने बदलला. ध्वजाच्या अतिरिक्त वापरासाठी 2005 मध्ये तो हा कायदा पुन्हा बदलण्यात आला. भारतीय ध्वज तीन रंगात असल्यामुळे त्याला तिरंगा म्हणतात. खादी फॅब्रिक, मध्यभागी वर्तूळ आणि तीन रंगांचा वापर करून भारतीय ध्वज क्षितिजाच्या समांतर तयार केला आहे. 22 जुलै 1947 रोजी ब्रिटिश राजवटीपासून भारतीय स्वातंत्र्याचा परिणाम म्हणून राष्ट्रध्वज स्वीकारण्यात आला. त्याची लांबी आणि रुंदी यांचे गुणोत्तर अनुक्रमे 2 : 3 आहे. स्वातंत्र्य आणि राष्ट्रवादाचे प्रतीक म्हणून भारतीय ध्वज तयार केला आणि स्वीकारला गेला. आगामी स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर या राष्ट्रीय ध्वजाचा इतिहास आणि निर्मितीचा घेतलेला हा मागोवा…

अशी मिळाली राष्ट्रध्वजाला मान्यता

भारताचा राष्ट्रध्वज हा भारतीय नागरिकांच्या आशा आणि आकांक्षाचे प्रतिनिधित्व करतो. भारतीय राष्ट्रध्वज राष्ट्राबद्दलच्या आपल्या अभिमानाचे प्रतीक आहे. भारतीय राष्ट्रध्वज (तिरंगा) स्वातंत्र्य मिळण्याच्या २४ दिवस आधी स्विकारला गेला. २४ मार्चला इंग्रजांनी भारत सोडून जाण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर भारताचा ध्वज कसा असावा हे ठरविण्यासाठी तातडीने एक समिती नेमली गेली. २२ जुलै १९४७ रोजी या ठरावाला मंजुरी देण्यात आली. कोणत्याही राष्ट्राचा ध्वज हा त्याचे सार्वभौमत्व, वेगळेपण, अस्तित्व आणि समृद्ध वारशाचा अभिमान दाखवणारे प्रतीक असते. भारताला स्वातंत्र्य मिळवण्यापूर्वी २२ जुलै १९४७ रोजी घटनासभेच्या बैठकीत तिरंग्याचा स्वीकार राष्ट्रीय ध्वज म्हणून करण्यात आला.

केशरी रंग

राष्ट्रध्वजाचा वरचा भाग केशरी आहे; जो त्यागाचे प्रतीक आहे. हा रंग देशाप्रती धैर्य आणि निःस्वार्थीपणा दर्शवतो. हिंदू, बौद्ध आणि जैन या धर्मांसाठी हा अतिशय सामान्य आणि धार्मिक महत्त्वाचा रंग आहे. भगवा रंग वेगवेगळ्या धर्मातील लोकांच्या अहंकारापासून मुक्तता आणि त्याग दर्शवतो आणि लोकांना एकत्र करतो. केशरी रंगाचे स्वतःचे महत्त्व आहे, जे आपल्या राजकीय नेतृत्वाला आठवण करून देते की, त्यांच्याप्रमाणेच आपणही काही वैयक्तिक लाभ दूर ठेवत संपूर्ण समर्पण वृत्तीने राष्ट्रहितासाठी कार्य केले पाहिजे.

पांढरा रंग

राष्ट्रध्वजाच्या मध्यवर्ती भागाची रचना पांढर्‍या रंगाने करण्यात आली आहे, जी राष्ट्राची शांतता, पवित्रता आणि प्रामाणिकपणा दर्शवते. भारतीय तत्त्वज्ञानानुसार पांढरा रंगदेखील शुद्धता आणि इमानदारी दर्शवतो. राष्ट्राला मार्गदर्शन करण्यासाठी ते सत्याच्या मार्गावर प्रकाश टाकते. हे भारतीय राजकीय नेत्यांना शांतता राखून मुख्य राष्ट्रीय उद्दीष्टय साध्य करण्याच्या दिशेने देशाचे नेतृत्व करण्याची आठवण करून देते.

हिरवा रंग

हिरवा हा तिरंग्याच्या तळाशी असलेला रंग आहे, जो विश्वास, उर्वरता, सुख, समृद्धी आणि प्रगती दर्शवतो. भारतीय तत्त्वज्ञानानुसार हिरवा हा उत्सव आणि दृढतेचा रंग आहे जो जीवन आणि आनंदाचे प्रतिनिधित्व करतो. संपूर्ण भारताच्या मातीतली हिरवाई दाखवते. हे भारतातील राजकीय नेत्यांना आठवण करून देते की, त्यांना भारताच्या मातीचे बाह्य आणि अंतर्गत शत्रूंपासून संरक्षण करायचे आहे.

अशोकचक्रातील २४ आरे काय दर्शवतात

12 आरे भगवान बुद्धांनी जी शिकवण दिली त्याचे प्रतिनिधीत्व करतात. तर, इतर 12 आरे हे त्यांच्या समतूल्य चिन्हांशी संबंधित आहेत जसे, अविध्या (म्हणजे ज्ञानाचा अभाव), सम्सकारा (म्हणजे आकार देणे), विजनाना (म्हणजे चेतना), नामरूप (म्हणजे नाव व स्वरूप), सदायातना (म्हणजे कान, डोळा, जीभ, नाक, शरीर आणि मन अशी सहा ज्ञानेंद्रिये), स्पर्श (म्हणजे संपर्क), वेदना, तृष्णा (म्हणजे तहान), उपदना (म्हणजे समज), भाव ( म्हणजे येणे), जाति (जन्म होणे), जरमर्ण (म्हणजे म्हातारपण) आणि मृत्यू.

 • अशोक चक्र आणि 24 आरे
  हिंदू धर्मानुसार पुराणांमध्ये 24 क्रमांकाचे खूप महत्त्व आहे. अशोक चक्र हे धर्म चक्र मानले जाते, ज्याला वेळ चक्रदेखील म्हणतात. अशोक चक्राच्या मध्यभागी 24 आरे आहेत जे दिवसाच्या 24 मौल्यवान तासांचे प्रतिनिधित्व करतात. हे हिंदू धर्मातील 24 धर्मऋषीदेखील प्रदर्शित करते ज्यांच्याकडे गायत्री मंत्र ची पूर्ण शक्ती आहे. हिमालयातील सर्व 24 धर्मऋषींना 24 अक्षरांच्या अविनाशी गायत्री मंत्राने प्रदर्शित केले जाते. (पहिल्या अक्षरात विश्वामित्र आणि शेवटच्या अक्षरात धर्मावर राज्य केलेल्या याज्ञवल्कांचे वर्णन आहे).
 • अशोक चक्राचा इतिहास
  अनेक वर्षांपूर्वी भगवान बुद्धांनी मोक्ष प्राप्त केला म्हणजेच गया येथे शिक्षण घेतले. मोक्षप्राप्तीनंतर ते वाराणसीतील सारनाथ येथे आले जेथे त्यांना त्यांचे पाच शिष्य (म्हणजे पंचवर्गीय भिक्खू) कौनदिन्या, अश्वजीत, भद्रक, महानाम आणि कश्यप भेटले. धर्मचक्र समजावून सांगितल्यानंतर आणि त्याचे वितरण केल्यानंतर बुद्धांनी त्या सर्वांना पहिला उपदेश दिला. हे राजा अशोकाने त्याच्या स्तंभाचे शिखर प्रदर्शित करण्यासाठी घेतले होते, जे नंतर भारतीय ध्वजाच्या मध्यभागी अशोक चक्र म्हणून या चाकाच्या उत्पत्तीचा आधार बनले. राष्ट्रध्वजाच्या मध्यभागी अशोक चक्राची उपस्थिती राष्ट्राशी मजबूत संबंध आणि बुद्धावरील विश्वास दर्शवते.
 • सर्वाधिक उंच राष्ट्रध्वज
  भारतातील पंजाब राज्यात अटारी येथे भारतीय सीमेच्या आत ३६० फूट (१०५ मीटर) उंचींचा भारतीय राष्ट्रध्वज आतापर्यंतचा (मार्च २०१७) सर्वाधिक उंचीचा भारतीय राष्ट्रध्वज आहे. हा राष्ट्रध्वज १२० फूट लांब आणि ८० फूट रुंद एवढ्या आकाराचा आहे. पुण्यातील कात्रज येथील नानासाहेब पेशवे जलाशयाच्या परिसरात पुणे महानगरपालिकेने उभारलेला २३७ फूट (७२ मीटर) उंचीचा भारतीय राष्ट्रध्वज महाराष्ट्र राज्यातील आतापर्यंतचा सर्वाधिक उंचीचा राष्ट्रध्वज आहे. कोल्हापूर येथील ध्वज ८२ मीटर उंचीचा आहे. पुण्यातील निगडी भक्ती-शक्ती उद्यानात २५ डिसेंबर २०१७ रोजी उभारलेला राष्ट्रध्वज १०७ मीटर उंचीचा आहे. या ध्वजाच्या कापडाची लांबी-रुंदी १२० गुणिले ९० फूट आहे.
 • देशात फक्त या संस्थेला राष्ट्रध्वज निर्मितीचा अधिकार
  संपूर्ण भारतात फक्त एका ठिकाणी अधिकृतपणे तिरंग्याची निर्मिती केली जाते. कर्नाटकातील हुबळी शहरातील बेंगेरी येथे कर्नाटक खादी ग्रामोद्योग संयुक्त संघ देशातील सर्व तिरंग्याची निर्मिती करते. खादी आणि ग्रामाद्योग आयोगाद्वारे कर्नाटक खादी ग्रामोद्योग संयुक्त संघाला तिरंग्याची निर्मिती करण्याची अधिकृत परवानगी दिली आहे.
 • कर्नाटक खादी ग्रामोद्योग संयुक्त संघाची स्थापना
  नोव्हेंबर १९५७ मध्ये झाली होती. १९८२ पासून त्याने खादीची निर्मिती केली. २००५-०६ साली ब्युरो ऑफ इंडियन स्ट्रँर्ड्सकडून त्याला सर्टिफिकेशन मिळाल. त्यानंतर कर्नाटक खादी ग्रामोद्योग संयुक्त संघाने राष्ट्रध्वज निर्मिती सुरू केली. आजही देशात अधिकृतपणे राष्ट्रध्वजाचा वापर जिथे होतो, त्याचा पुरवठा कर्नाटक खादी ग्रामोद्योग संयुक्त संघाकडून केला जातो. परदेशी दूतावास आणि उच्चायोगातदेखील येथूनच ध्वज दिला जातो. सर्वसामान्य लोकदेखील कर्नाटक खादी ग्रामोद्योग संयुक्त संघाकडून तिरंगा विकत घेऊ शकतात.
 • ध्वज वापरासाठी ठरवलेले आकार
  विविध संस्थांसाठी विविध आकाराचे ध्वज तयार केले जातात. सर्वात छोटा आकार ६:४ इंच इतका आहे. जो बैठका किंवा कॉन्फरन्स टेबलावर ठेवता येतो. अतिमहत्वाच्या व्यक्तींच्या वाहनांंसाठी याचा आकार ९:६ इंच असतो. तर राष्ट्रपतींच्या विमानासाठी आणि रेल्वेसाठी १८:१२ इंच आकार असतो. इमारतीवर लावण्यासाठी ५.५:३ फूट तर, शहीद जवानांच्या पार्थिवासाठीच्या तिरंग्याचा आकार ६.४ फूट असतो. संसद भवन आणि अन्य सरकारी इमारतीसाठी ९:६ फूट, लाल किल्ला आणि राष्ट्रपती भवनसाठी १२:८ फूट तर, अन्य मोठ्या सरकारी इमारतींसाठी तिरंग्याचा आकार २१:१४ फूट इतका असतो.
 • १८ वेळा तपासली जाते गुणवत्ता
  कर्नाटक खादी ग्रामोद्योग संयुक्त संघाकडून निर्मिती होणार्‍या तिरंग्याची गुणवत्ता बीआयएसकडून तपासली जाते. गुणवत्ता जराही कमी असेल तर ध्वज नाकारला जातो. एकूण निर्मिती करण्यात आलेल्या ध्वजांपैकी १० टक्के ध्वज नाकारले जातात. प्रत्येक ध्वज १९ वेळा तपासला जातो. ध्वजाच्या रंगात कोणत्याही प्रकारची तडजोड केली जात नाही. तसेच, त्याची लांबी रुंदी आणि अशोक चक्राची छपाई दोन्ही बाजूला सारखी लागते. फ्लॅग कोड ऑफ इंडिया २००२ नुसार जे नियम आहेत ते पाळावे लागतात. जर यात काहीही चूक झाली तर गंभीर गुन्हा मानला जातो. यासाठी दंड किंवा जेल अथवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.

कसे बदल झाले झेंड्यात 

 • 1906 साली स्विकारलेला तिरंगी ध्वज भारताचा पहिला झेंडा मानला जातो. 7 ऑगस्ट 1906 ला तत्कालीन कोलकात्याच्या पारसी बागान स्क्वेअरमध्ये हा ध्जव फडकावला गेला. लाल, पिवळा आणि हिरवा असे तीन रंगाचे तीन पट्टे, मध्यभागी वंदे मातरम् हे शब्द आणि लाल पटट्यावर चंद्र-सूर्य तर, हिरव्या पट्ट्यावर 8 कमळ असा हा ध्वज होता.
 • भारताचा दुसरा ध्वज मादाम भिकाजी कामा यांनी जर्मनीच्या स्टुटगार्टमध्ये 1907 साली झालेल्या आंतरराष्ट्रीय समाजवादी परिषदेत फडकावला होता. मादाम कामा या भारताबाहेर राहून भारतातील ब्रिटीश राजवटीविरोधात काम करणार्‍या कार्यकर्त्यांपैकी एक होत्या. 1936 साली त्या भारतात परत आल्या तेव्हा त्यांनी हा ध्वज भारतात परत आणला. या ध्वजाच्या वरचा पट्टा हिरवा, मधला पट्टा पिवळा तर खालचा पट्टा केशरी होता. केशरी पट्ट्यावर चंद्र व सूर्य होते तर, हिरव्या पट्टयावर 8 तारे होते. जे भारताच्या तेव्हाच्या आठ प्रांतांचे प्रतीक मानले जात. पहिल्या ध्वजाप्रमाणेच मधल्या पट्ट्यावरही ’वंदे मातरम’ ही अक्षरे होती.
 • 1917 साली लोकमान्य टिळक आणि डॉ. अ‍ॅनी बेझंट यांनी सुरू केलेली होमरुल चळवळ वेग घेत होती. याच चळवळीदरम्यान या दोन नेत्यांनी भारताचा तिसरा झेंडा फडकावला. या ध्वजावरचे रंग आणि पट्टे काहीसे बदललेले होते. या झेंड्यावर पाच लाल आणि चार हिरवे पट्टे एका आड एक या पद्धतीने होते. यापूर्वीच्या झेंड्यांप्रमाणे यावर कमळे नव्हती. उलट यावर 7 तारे होते. हे सात तारे आकाशात दिसणार्‍या सप्तर्षींच्या आकृतीप्रमाणेच झेंड्यावरही काढले होते. 1918 साली लोकमान्य टिळकांनी होमरूलच्या काही स्वयंसेवकांबरोबर हा झेंडा हाती घेतलेला फोटोत पाहायला मिळतो.
 • 1885 साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली होती आणि 1920 सालापर्यंत आधी टिळक आणि नंतर महात्मा गांधींच्या नेतृत्वात भारताच्या स्वातंत्र्याची मागणी जोर धरत होती. 1921 साली आंध्र प्रदेशातील बेझवाडा म्हणजे सध्याच्या विजयवाडामध्ये काँग्रेसचे अधिवेशन झालं. पिंगली व्यंकय्या या काँग्रेस कार्यकर्त्याने एक ध्वज तयार करून तो महात्मा गांधींना दाखवला. पिंगली व्यंकय्या हे आफ्रिकेत ब्रिटिश लष्करात होते. तेव्हा त्यांची आणि गांधींची भेट झाली होती. पिंगली व्यंकय्या यांनी तयार केलेल्या झेंड्यात लाल आणि हिरवे असे दोनच रंगांचे पट्टे होते. हिंदू आणि मुस्लीम या दोन धर्मांचे ते प्रतीक होते. गांधीजींनी इतर सर्व धर्मांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी यात पांढर्‍या रंगाचा पट्टा समाविष्ट करायला सांगितला आणि देशाची प्रगती दाखवण्यासाठी चरख्याचे चिन्हही या झेंड्यात घेतले गेले. 1923 साली मे महिन्यात नागपूरमध्ये ब्रिटिश सत्तेविरोधात शांततामय मोर्चे निघाले. यावेळी हजारो मोर्चेकरी हा झेंडा घेऊन चालत होते. यावेळी शेकडो निदर्शकांना अटक झाली होती.
 • एव्हाना भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचे नेतृत्व पूर्णपणे काँग्रेसकडे आलेले होते. 1929 साली काँग्रेसच्या लाहोर अधिवेशनात ’पूर्ण स्वराज’चा ठराव संमत झाला होता. 1931 साली आज आपण पाहत असलेल्या झेंड्यात असलेली रंगांची रचना अस्तित्वात आली. काँग्रेस पक्षाने केशरी, पांढरा आणि हिरवे पट्टे असलेला आणि त्यावर मध्यभागी चरखा असलेला झेंडा एक ठराव संमत करून स्वीकारला. हाच काँग्रेस पक्षाचाही झेंडा होता. आतापर्यंत झेंड्यातील रंगांकडे विविध धर्मांचे आणि गटांचे प्रतीक म्हणून पाहिले जात होते. पण या ठरावाने या रंगांचा धर्मांशी असलेला अर्थ काढून टाकला.

ध्वज फडकवताना या गोष्टी विचारात घ्याव्यात

 • ध्वज फडकावताना तो फाटलेला, मळलेला किंवा चुरगाळलेला नसावा. तो व्यवस्थित ठिकाणी फडकवावा
 • भारताचा राष्ट्रध्वज ज्या उंचीवर फडकावला आहे त्याच्या बरोबरीच्या लांबीवर किंवा त्यापेक्षा उंचीवर कोणताही इतर ध्वज फडकावू नये
 • कोणत्याही प्रकारच्या सजावटीसाठी ध्वजाचा वापर करू नये
 • ध्वज फडकावताना नारंगी रंग वर राहील याची दक्षता घ्यावी
 • ध्वजस्तंभावर किंवा ध्वजाच्या वर, फुलं, पानं, फुलांचे हार ठेवू नयेत
 • ध्वजावर काहीही लिहू नये. कोणतीही वस्तू झाकण्यासाठी त्याचा वापर करू नये
 • ध्वजारोहणासाठी ध्वज तयार करताना त्यात फुलं ठेवता येतील
 • राष्ट्रध्वज फरशीवर पडलेला नसावा, तसेच पाण्यावर तरंगलेला नसावा
 • कोणत्याही प्रकारच्या वेशभूषेवर, ध्वजाचा वापर करू नये. तसेच तो कमरेच्या खाली गुंडाळू नये. रुमाल, सोफ्याचे कव्हर, नॅपकिन, अंतरवस्त्र यासाठी कापड म्हणून त्याचा वापर करू नये
 • ध्वज जेव्हा फडकावतो तेव्हा तो ध्वजस्तंभाच्या उजव्या बाजूला असावा