“माझं नाव उदयसिंह उद्धव बाळासाहेब ठाकरे”, ठाकरे गटाच्या आमदाराने दिली नवी ओळख!

ठाकरे गटातील आमदार उदयसिंग राजपूतांनी केलेलं मोठं विधान सध्या फारच चर्चेत आलंय.

Udaysingh-Rajput-Name
ठाकरे गटातील आमदार उदयसिंग राजपूतांनी केलेलं मोठं विधान सध्या फारच चर्चेत आलंय.

केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांना बहाल केल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. एकनाथ शिंदे यांचा गटच अधिकृत शिवसेना पक्ष ठरल्याने राजकीय वर्तुळात विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. तर दुसरीकडे नाव आणि चिन्ह मिळाल्यावर शिंदे गटातील आमदार आता सक्रिय झाल्याचे पाहायला मिळाले आहे. ठाकरे गटातील आमदार अपात्र होणार का? याबाबत संभ्रम सुरू आहे. अशात ठाकरे गटातील आमदार उदयसिंग राजपूतांनी केलेलं मोठं विधान सध्या फारच चर्चेत आलंय.

कन्नड विधानसभा मतदारसंघाचे आमदार उदयसिंह राजपूत हे औरंगाबाद इथल्या एका जाहीर कार्यक्रमासाठी उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्यांनी स्वतःची ओळख करून दिलीय. यावेळी बोलताना आमदार उदयसिंग राजपूत म्हणाले, “मी ज्यांना निष्ठावंत समजत होते. ते नेते डुप्लिकेट निघाले. आज मी निष्ठावंत म्हणून समोर बसलो आहे, माझं नाव उदयसिंह चित्रासरदारसिंह राजपूत आहे. पण माझं राजकारणातील नाव उदयसिंह उद्धव बाळासाहेब ठाकरे असं आहे. त्यामुळे मी व्हीप संदर्भात उद्धव ठाकरे यांचाच आदेश पाळणार… बंडोखोरीच्या आधी मी आमदारांच्या रांगेत सगळ्यात मागे बसायचो. मला वाटायचं समोर बसलेले निष्ठावंत असतील. पण ते तर डुप्लिकेट निघाले. आज मी निष्ठावंत म्हणून समोर बसलो आहे.”

यापुढे बोलताना आमदार उदयसिंह म्हणाले की, “निष्ठावान हे काही कपाळावर लिहिलेलं नसतं. कारण पहिल्या दिवशी बाजुला बसलेले आमदार दुसऱ्या दिवशी गुवाहाटीत दिसले. सध्या उद्धव ठाकरेंची खूप क्रेझ वाढली आहे. त्यामुळे जो उठतो तो उद्धव ठाकरे यांना लक्ष्य करतो.”

अधिवेशनातील उपस्थितीबाबत लवकरच व्हीप जारी करणार आहे. शिंदे गटाकडून व्हिप मान्य केला नाही तर आमदार अपात्र होतील का? असा प्रश्न उद्धव ठाकरेंना विचारण्यात आला. यावर ठाकरे ,म्हणाले की आमदार अजिबात अपात्र होऊ शकत नाहीत. कारण दोन गटांना मान्यता मिळाली तेव्हा दोन गट आहेत हे मान्य करण्यात आले होते. तेव्हा त्यांना एक चिन्ह आम्हाला एक चिन्ह देण्यात आलं होतं.
मुळ नाव आणि चिन्ह त्यांनी देता कामा नये. खातरजमा केल्याशिवाय ते देऊ शकत नव्हते. आम्ही त्याला चॅलेंज केलं आहे. त्या गटाला निवडणूक आयोगाने नाव आणि चिन्ह दिलं आहे. आमच्या गटाचा आणि त्यांच्या गटाचा काही संबंध नाही असे ठाकरे यांनी स्पष्ट केलं.