घरमहाराष्ट्रनागपूरचंही झालं 'हिंदमाता', विधानभवन परिसरात गुडघाभर पाणी, बत्ती गुल!

नागपूरचंही झालं ‘हिंदमाता’, विधानभवन परिसरात गुडघाभर पाणी, बत्ती गुल!

Subscribe

नागपूरमध्ये शुक्रवारी सकाळपासूनच पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे शहरातलं जनजीवन एकीकडे विस्कळीत झालेलं असतानाच विधानभवन परिसरातही तब्बल गुडघाभर पाणी साचल्यामुळे गोंधळ निर्माण झाला आहे. त्यातच पावसामुळे लाईटही गेल्यामुळे वर अंधार आणि खाली पाणी अशी अजब स्थिती नागपूर विधानभवन परिसरात पाहायला मिळत आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हट्टापायी पावसाळी अधिवेशन मुंबईहून नागपूरला नेलं खरं, पण पहिल्याच पावसात अधिवेशनाला फटका बसला आहे. नागपूरमध्ये शुक्रवारी सकाळपासूनच दमदार पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे शहराच्या विविध भागात जसं पाणी साचलं, तसंच ते विधानभवन परिसरातही साचलं. मात्र, पावसाळी अधिवेशन अद्याप नागपुरात कधीच झालेलं नसल्यामुळे जास्त पाऊस झाला तर पाण्याचा निचरा करण्याची कार्यक्षम व्यवस्था नागपूर विधानभवन परिसराकत उभी करण्यात आली नव्हती. परिणामी, विधानभवन परिसरात तब्बल गुडघाभर पाणी साचल्याचं दृष्य सकाळीच कामकाजासाठी दाखल झालेल्या कर्मचारी, अधिकारी आणि आमदार मंडळींना दिसलं. शिवाय तुफान पावसामुळे विधानभवन परिसरातच्या एका भागाची बत्तीच गुल झाल्यामुळे विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे.

पाण्यातून वाट काढणारे कर्मचारी

मुंबईमध्ये साचणारं पाणी हे मुंबईकरांच्याही आणि नेतेमंडळींच्याही सवयीचं झालं आहे. शिवाय मुंबईमध्ये पाण्याचा निचरा होणारी यंत्रणा नागपूरच्या तुलनेत तशी सक्षम असल्यामुळे किमान विधानभवन परिसरात पाणी साचून कामकाज बंद होण्याची वेळ ओढवत नाही. नागपुरात मात्र तशी कार्यक्षम यंत्रणा नसल्यामुळे सकाळीच गुडघाभर पाण्यातून विधानभवनाचे कर्मचारी कार्यालयात प्रवेश करताना दिसत होते. तसेच, साचलेलं पाणी त्वरीत काढण्याचा प्रयत्न करतानाही काही कर्मचारी दिसून आले.

- Advertisement -
Water Logging in Nagpur Vidhan Bhavan
नागपूर विधानभवन परिसरात साचलेले पाणी

मुख्यमंत्र्यांचा हट्ट भोवला?

दरम्यान, या सगळ्या प्रकारामुळे विरोधकांनी मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप सरकारवर टीका केली आहे. ‘आम्ही आधीच सांगितलं होतं नागपुरात अधिवेशन घेऊ नका. मात्र ते न ऐकता हट्टानं अधिवेशन इथे आणल्यामुळे हा सगळा मनस्ताप होत आहे’, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिली आहे. शिवाय, ‘जास्त पाऊस झाल्यास त्याचा फटका बसू शकतो, असा सचिवांनी दिलेला अहवालही सरकारनं गांभीर्याने घेतला नाही’ असा दावाही त्यांनी केला.

आम्ही सरकारला याआधीच अधिवेशन नागपुरात घेऊ नका असं सांगितलं होतं. पण त्यांंनी ऐकलं नाही. शिवाय, सचिवांनीही तसा अहवाल दिला होता. पण तो अहवाल अद्याप समोर आलेला नाही.

धनंजय मुंडे, विरोधी पक्षनेते, विधानसभा

 

- Advertisement -

बत्ती गुल!

एकीकडे वरून कोसळणाऱ्या पावसामुळे विधानभवन परिसरात गुडघाभर पाणी साचलेलं असतानाच दुसरीकडे विधान भवनाच्या एका भागातली लाईटही गेली. त्यामुळे सकाळी सकाळीच विधानभवनात अंधार पसरला होता. मात्र, विरोधकानी ठरवल्याप्रमाणे सरकारच्या धोरणांचा निषेध सुरू केला. पण अंधारात निषेध करणार कसा? त्यामुळे थेट टॉर्चच्या प्रकाशात काँग्रेस, राष्ट्रवादीच्या आमदारांनी घोषणाबाजी सुरू केली.

सीएमओ वगळता सारं काही अंधारात!

एकीकडे विधान भवनाबाहेर विरोधकांनी टॉर्च लावून घोषणाबाजी सुरू केलेली असतानाच दुसरीकडे आतमध्ये पूर्णपणे अंधाराचं साम्राज्य असल्याचं समोर येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विधानभवनात मुख्यमंत्र्यांचे कार्यालय वगळता इतर सर्व मंत्री आणि विरोधी पक्षनेत्यांचं कार्यालय अंधारात आहेत.

कामकाज तहकूब

दरम्यान, वरून कोसळणारा पाऊस, विधानभवनात साचलेलं पाणी आणि गुल झालेली बत्ती या पार्श्वभूमीवर विधानसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. आता शनिवार आणि रविवार असल्यामुळे थेट सोमवारीच कामकाज होईल.

Pravin Wadnerehttps://www.mymahanagar.com/author/pravin/
समाजाशी बांधिलकी, बदल घडवण्याची प्रामाणिक इच्छा, त्यासाठी प्रयत्न करण्याची तयारी आणि त्याच तयारीचा एक भाग म्हणून माध्यमांमध्ये प्रवेश. लेखनाची आवड, त्यासाठी वाचनाची निवड. सोबतीला फोटोग्राफीचा छंद, जगण्यासाठी अजून काय पाहिजे?
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -