घरताज्या घडामोडीडॅशिंग अधिकारी, नागपूर मनपा आयुक्त तुकाराम मुंढेंची पुन्हा बदली

डॅशिंग अधिकारी, नागपूर मनपा आयुक्त तुकाराम मुंढेंची पुन्हा बदली

Subscribe

नागपूर महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची बदली करण्यात आली आहे. तर नागपूरचे आयुक्त म्हणून राधाकृष्णन बी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंढे यांची मुंबईत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या सदस्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तुकाराम मुंढेंना कालच कोरोनाची लागण झाल्यामुळे ते घरीच क्वारंटाइन आहेत.

तुकाराम मुंढे हे त्यांच्या वादांमुळे नेहमीच चर्चेत असतात. काही महिन्यांपूर्वीच तुकाराम मुंढेंची भाजपची सत्ता असलेल्या महापालिकेत आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, नेहमीप्रमाणे त्यांचे स्थानिक पदाधिकाऱ्यांशी जुळले नाही, त्यामुळेच सहा महिन्यांपूर्वीच त्यांच्यावर नागपूर सोडण्याची वेळ आली आहे. तुकाराम मुंढे यांची मुंबईत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर नागपूरचे आयुक्त म्हणून राधाकृष्णन बी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

- Advertisement -

नवी मुंबईनंतर नागपूर पालिकेचे आयुक्त म्हणून तुकाराम मुंढे यांची कारकिर्द वादळी ठरली होती. कडक शिस्तीच्या आणि स्वभावाच्या मुंढेंनी नागपुरातील राजकारण्यांनाही न जुमानता त्यांची कार्यपद्धती सुरू ठेवल्याने त्यांच्याविरोधात राजकारण्यांमध्ये प्रचंड रोष होता. नागपूर स्मार्ट सिटीच्या व्यवस्थापकीय संचालकपदाचा कार्यभार स्वीकारण्यावरुन नागपूरचे महापौर संदिप जोशी यांनी मुंढे यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला होता. शिवाय, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही मुंढेंची तक्रार थेट केंद्रीय नगरविकास विभागाकडे केली होती. दरम्यान, गेल्याच महिन्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंढे यांची बाजू घेतली होती. तरीही त्यांची बदली करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

राज्य सरकारने इतर काही अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. कैलास जाधव यांची नाशिकच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. एस. एस. पाटील यांची सिडकोचे ज्वॉइंट एमडी, डॉ. एन. बी. गीते यांची एमएसईडीचे संचालक, अविनाश दुखणे यांची वाहतूक आयुक्त, एस. एम. चन्ने यांची एमएसआरटीसीवर, रामास्वामी यांची राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालकपदी बदली करण्यात आली आहे. ए. बी. मिसाळ यांची बदली विभागीय आयुक्त, कोकण विभाग येथे करण्यात आली आहे. तर लोकेश चंद्र यांची नियुक्ती प्रधान सचिव, जलसंपदा विभाग येथे करण्यात आली आहे. अंशु सिन्हा यांची बदली सचिव, कौशल्य विकास व उद्योजकता विभाग येथे करण्यात आली आहे. दिपा मुधोळ यांची नियुक्ती प्रकल्प व्यवस्थापक, जलस्वराज्य प्रकल्प, नवी मुंबई येथे करण्यात आली असून एस. एम. देशपांडे यांची नियुक्ती प्रधान सचिव (प्र. सु. व र. व. का.) या पदावर केली आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -