Thursday, June 8, 2023
27 C
Mumbai
घर क्राइम मंत्रिपदाचे आमिष दाखवून आमदारांना गंडा घालणाऱ्या भामट्याला अटक, नागपूर पोलिसांची कारवाई

मंत्रिपदाचे आमिष दाखवून आमदारांना गंडा घालणाऱ्या भामट्याला अटक, नागपूर पोलिसांची कारवाई

Subscribe

उर्वरित मंत्रिमंडळाचा विस्तार नेमका कधी होणार याचे वेध सर्वच मंत्र्यांना लागले आहे. पण नवीन मंत्रिमंडळात आपला नंबर लागावा यासाठी सर्वच आमदार प्रयत्न देखील करत आहेत. पण याच गोष्टीचा गैरफायदा घेत एका भामट्याने आमदारांना गंडा घालण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे.

शिंदे-फडणवीस यांचे सरकार राज्यात आल्यापासून फक्त एकदाच मंत्रिपदाचा विस्तार झाला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासहित 18 चं मंत्री केवळ राज्याचा कारभार पाहात आहेत. त्यामुळे उर्वरित मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार आणि तेव्हा कोणत्या आमदारांची मंत्रीपदावर नेमणूक करण्यात येणार याबाबतची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. सुप्रीम कोर्टाने राज्यातील सत्तासंघर्षाच्याबाबत दिलेल्या निकालामध्ये शिंदे-फडणवीस सरकार बचावले आहे. त्यामुळे आता उर्वरित मंत्रिमंडळाचा विस्तार नेमका कधी होणार याचे वेध सर्वच मंत्र्यांना लागले आहे. पण नवीन मंत्रिमंडळात आपला नंबर लागावा यासाठी सर्वच आमदार प्रयत्न देखील करत आहेत. पण याच गोष्टीचा गैरफायदा घेत एका भामट्याने आमदारांना गंडा घालण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. नागपूर मध्यचे भाजप आमदार विकास कुंभारे यांनी नागपूर पोलिसांना केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली. नीरज सिंह राठोड असे या आरोपीचे नाव असल्याचे सांगण्यात आले आहे. (Nagpur Police arrests a person who cheated MLAs by luring them for ministership)

हेही वाचा – आधी शिवसेना कुणाची हे ठरवणार; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची माहिती

- Advertisement -

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नीरज सिंह राठोड या आरोपीने गेल्या काही दिवसांपासून भाजप आमदारांशी फोनवरून संपर्क साधण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याने आपण राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या जवळचे असून मी आपल्याला मंत्रिपद मिळवून देतो, असे सांगण्यास सुरूवात केली. यावेळी या भामट्याने आमदारांना मंत्रिपदाचे आमीष दाखवत त्यांच्याकडून मोठी रक्कम वसूल करण्याचा सुद्धा प्रयत्न केला.

याचदरम्यान, या आरोपीने नागपूर मध्यचे भाजप आमदार विकास कुंभारे यांच्याशी संपर्क साधला. 07 मे ला आरोपीने विकास कुंभारे यांना मॅसेज केला होता. पण सदर व्यक्तीचा कुंभारे यांना संशय आल्याने त्यांनी त्याची माहिती मिळवण्यास सुरूवात केली. त्यानंतर अशी कोणतीही व्यक्ती जे. पी. नड्डा यांच्या जवळची नसून किंवा संपर्कात ही नसल्याची माहिती विकास कुंभारे यांनी मिळाली. त्यानंतर कुंभारे यांनी लगेच याबाबतची माहिती पोलिसांना दिली.

- Advertisement -

नागपूर पोलिसांनीही तत्परतेने कार्यवाही करत या भामट्याला गुजरातमधील मोरबीमधून काल मंगळवारी (ता. 16 मे) रात्री उशिरा ताब्यात घेतले. आरोपी नीरज सिंह राठोड याने गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रातील काही भाजप आमदारांना संपर्क साधून तो भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या जवळचा असल्याचे सांगितले आहे. तसेच महाराष्ट्रातील मंत्रिमंडळात महत्त्वाच्या विभागाची जबाबदारी मिळवून देतो, असे सांगून त्याने आमदारांकडून कोट्यवधी रुपयांची मागणीही केली असल्याचे तपासातून उघड झाले आहे. धक्कादायक बाब म्हणजे महाराष्ट्रातील पाच आमदारांनी मंत्रिपदाच्या लालसेपोटी या भामट्याला पैसे दिल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, पोलिसांकडून या माहितीबाबत दुजोरा देण्यात आलेला नाही.

नीरज सिंह राठोड विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर या भामट्याने फक्त महाराष्ट्रातील नाही तर गोवा आणि नागालँडमधील काही भाजप आमदारांनाही अशाच पद्धतीची बतावणी करून त्यांची फसवणूक केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे भाजप नेत्यांच्या फसवणुकीचे हे प्रकरण आंतरराज्य स्वरूपाचं झालं आहे.

- Advertisment -