Nagpur ZP Election 2021: १० मिनिटांत १० मतांनी नशीब बदललं; आधी पराभूत नंतर केलं विजयी घोषित

Congress candidate Sulochana Dhok wins in Nagpur Zilla Parishad

नागपूर जिल्हा परिषदेत काँग्रेसच्या एका महिला उमेदवाराचं नशिब १० मिनिटात १० मतांनी बदललं. नागपूरमधील दवलामोटीमध्ये गणात सुरुवातीला भाजपच्या ममता जैस्वाल यांना विजयी घोषित करण्यात आलं. त्यानंतर १० मिनिटात काँग्रेसच्या सुलोचना ढोक यांना १० मतांनी विजयी झाल्याचं घोषित करण्यात आलं.

राज्यातील जिल्हा परिषदाच्या आणि पंचायत समितीच्या पोटनिवडणुकांचा आज निकाल लागणार असून सकाळपासून मतमोजणी सुरु झाली आहे. यावेळी नागपूरमध्ये निकालात बदल झाल्याची घटना घडली. सुरुवातीला भाजपच्या ममता जैस्वाल यांना विजयी घोषित करण्यात आलं. त्यानंतर पुन्हा एकदा मतमोजणी झाली. मतमोजणी झाल्यानंतर काँग्रेसच्या सुलोचना ढोक यांना १० मतांनी विजयी झाल्याचं घोषित केलं. या निकालानंतर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला. तसंच, सुलोचना ढोक यांनी विजयी झाल्यानंतर प्रतिक्रिया दिली असून भाजपनं स्वत: विजयी असल्याचं जाहीर करुन जल्लोष करण्यास सुरुवात केल्याचं ढोक म्हणाले.

खासदार गावितांना धक्का

शिवसेनेचे खासदार राजेंद्र गावित यांचा मुलगा रोहित गावित यांचा दारुण पराभव झाला. याठिकाणी भाजपचे पंकज कोरे विजयी झाले असून गावित तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले आहेत.

वणई जिल्हा परिषद गटातून गावितांनी मुलगा रोहितला मैदानात उतरवले होते. त्यामुळे शिवसेनेत असंतोष होता. त्याकडे दुर्लक्ष केल्याचा परिणाम निकालातून दिसून आला. रोहित गावित तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. याठिकाणी भाजपचे पंकज कोरे विजयी झाले. रोहित गावित यांचा १३०० मतांनी पराभव झाला. काँग्रेसच्या वर्षा वायेडा याना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली.