आधी काहीतर खा, मगच भेटेन; उपाशीपोटी वाट पाहणाऱ्या चिमुकल्याचा राज ठाकरेंनी पूर्ण केला हट्ट

राज ठाकरेंनी दिलेल्या निरोपानुसार मुलाने नाश्ता केला आणि अकरा वाजून पाच मिनिटांनी जेव्हा राज ठाकरे हॉटेलमधून रवी भवनला जाण्यासाठी निघाले तेव्हा त्यांनी चिमुकल्याची भेट घेतली. तसंच, अद्वैतने आणलेल्या डायरीवर त्यांनी सही सुद्धा केली.

raj thackeray meet to adwait patki

नागपूर – उपाशी पोटी वाट पाहत बसणाऱ्या एका चिमुकल्याचा हट्ट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी पूर्ण केला. मात्र, त्याचा हट्ट पूर्ण करण्याआधी राज ठाकरे यांनी त्याला नाश्ता करण्याची गळ घातली. आणि मगच त्या चिमुकल्याची भेट घेतली.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून विदर्भ दौऱ्यावर आहेत. त्यांची भेट घेण्यासाठी दहा वर्षांचा अद्वैत पत्की (Adwait Patki) नावाचा मुलगा आपल्या आजीसोबत वाट पाहत उभा होता. सकाळपासून ते उपाशी पोटी राज ठाकरेंच्या भेटीसाठी आला होता. राज ठाकरे हॉटेलमध्ये दाखल होताच कोपऱ्यात उभा असलेला चिमुकला मनसे कार्यकर्त्यांना दिसला. या कार्यकर्त्यांनी त्यांना रवी भवन येथे येऊन राज ठाकरे यांची भेट घेण्याचा सल्ला दिला. मात्र, त्या चिमुकल्याला राज ठाकरे यांना तत्काळ भेटायचं होतं. त्यामुळे तो मुलगा आणि त्याची आजी तिथून हलल्या नाहीत. अखेर ही गोष्ट राज ठाकरेंपर्यंत जाऊन पोहोचली. त्यांनी त्याला भेटायला बोलावलं. पण तू आधी नाश्ता कर, काहीतरी खा. त्यानंतरच मी तुला भेटणार आणि माझं ऑटोग्राफ देणार, असं राज ठाकरे यांनी निरोप पाठवला.

हेही वाचा -राज ठाकरे आजपासून 22 सप्टेंबरपर्यंत विदर्भ दौऱ्यावर; वेगवेगळ्या जिल्ह्यांना देणार भेट

राज ठाकरेंनी दिलेल्या निरोपानुसार मुलाने नाश्ता केला आणि अकरा वाजून पाच मिनिटांनी जेव्हा राज ठाकरे हॉटेलमधून रवी भवनला जाण्यासाठी निघाले तेव्हा राज ठाकरे यांनी चिमुकल्याची भेट घेतली. तसंच, अद्वैतने आणलेल्या डायरीवर त्यांनी सही सुद्धा केली.

हेही वाचा – शिंदे सरकारचा दुसरा मंत्रिमंडळ विस्तार लवकरच; ‘या’ तारखेचा मुहूर्त?

राज ठाकरे विदर्भ दौऱ्यावर

राज ठाकरे आजपासून २२ सप्टेंबरपर्यंत विदर्भ दौऱ्यावर आहेत. आज ते नागपुरात दाखल झाले असून आगामी महापालिका निवडणुकांमध्ये विदर्भात मनसेची ताकद वाढवण्यासाठी त्यांनी दौऱ्याचं नियोजन केलं आहे. 019 च्या निवडणुकांनंतर राज ठाकरे पहिल्यांदाच नागपूरात आल्याने मनसैनिकांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे. मनसैनिकांनी ढोल ताशांच्या गजरात नागपूर रेल्वे स्थानकावर राज ठाकरेंचे स्वागत केले.

या दौऱ्यादरम्यान राज ठाकरे विदर्भातील वेगवेगळ्या जिल्ह्यांना भेट देणार आहेत. यावेळी मनसे पदाधिकाऱ्यांच्या विभागवार बैठका घेणार आहेत. यानंतर उद्या म्हणजे 19 सप्टेंबर रोजी त्यांची नागपूरात पत्रकार परिषद होणार आहे. त्याच दिवशी ते चंद्रपूरसाठी रवाना होणार आहेत. चंद्रपूर, अमरावती, बुलढाणा, वर्धा असा दौरा करत ते पुन्हा अमरावतीत येणार आहे. यानंतर अमरावतीमध्ये पुन्हा राज ठाकरे पत्रकार परिषद घेणार आहे. त्यामुळे राज ठाकरे नेमकं काय बोलतात आणि त्यांच्या दौऱ्याचा मनसेला कितपत फायदा होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.