घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्र'नजर महानगर'ची : हवामान बदलाचा तडाखा

‘नजर महानगर’ची : हवामान बदलाचा तडाखा

Subscribe

हवामान बदलामुळे तपमानवाढ, बेमोसमी पाऊस, ढगफुटी आणि वादळांचे संकट जागतिक पातळीवर कायम असताना, स्थानिक पातळीवरही याची झळ बसू लागली आहे. कधी अंग भाजून काढणारे ऊन तर कधी अतिवृष्टी अशा लहरीपणामुळे नाशिक शहरासह जिल्ह्यातील कृषीक्षेत्राला गेल्या काही वर्षांपासून मोठा तडाखा बसतो आहे. विशेष म्हणजे तापमानवाढीमुळे उद्योगांनाही कारखान्यांमधील यंत्रणा आणि तापमान नियंत्रणासाठी सेंट्रलाईज एसीसारख्या मुलभूत बदलांची गरज भासू लागली आहे. वरवर जागतिक पातळीवर म्हणून पाहिल्या जाणार्‍या या समस्येला थोपविण्यासाठी सरकारी पातळीवरुन फारसे प्रयत्न होत नसल्याने हे संकट अधिकाधिक गंभीर बनू पाहत आहे. अशा या विषयाचा घेतलेला हा मागोवा...

भुपृष्ठावरील झाडांचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत असल्याने त्याचा हवामानावर परिणाम होत आहे. त्याला मायक्रो क्लायमेट असे म्हटले जाते. पावसाचे पाणी अगोदर झाडावर पडते. मग ते जमिनीवर पडते. त्यामुळे जमिनीची धूप थांबते. ज्या ठिकाणी झाडांचे प्रमाण अधिक आहे, तिथे हवा थंड असते. नाशिक याचे सर्वोत्तम उदाहरण आहे. रब्बीच्या पिकांना 20 ते 25 डिग्री सेल्सिअस तापमान आवश्यक असते. साधारणत: 30 ते 35 डिग्री सेल्सिअस पर्यंतचे तापमान सहन करू शकतात. त्यापुढे हा पारा चढला तर पिकांवर त्याचा परिणाम होतो. त्यामुळे खरिप आणि रब्बी हंगामातील तापमानाचा विचार करुन पिकपध्दत ठरवली जाते. नाशिक जिल्ह्यातील पिक पद्धतीमध्ये प्रचंड वैविध्यता दिसून येते. निफाड, दिंडोरी, पेठ, त्र्यंबकेश्वर, नाशिक या तालुक्यांमध्ये द्राक्षाचे उत्पादन घेतले जाते. तर सिन्नर, येवला, नांदगाव, मालेगाव, चांदवड या भागात सोयाबिन, मका, कापूसाचे प्रमाण अधिक आहे. इगतपुरी, पेठ, त्र्यंबकेश्वर, दिंडोरी या तालुक्यांमध्ये पावसाचे प्रमाण अधिक असलेल्या भागात भाताचे पिक घेतले जाते. पावसाळा उशिरा सुरु झाल्यानंतर ऑक्टोबर, नोव्हेंबरपर्यंत पाऊस पडत राहतो. परिणामी, साठवलेले पाणी मे, जूनपर्यंत कसे पुरवता येईल. यादृष्टीने विचार शेतकर्‍यांनी करायला हवा. मका, सोयाबीन हे उन्हाळ्यातही घेता येऊ शकतात. निसर्गाचा अभ्यास करुन शेतकर्‍यांनी पिक पद्धतीत बदल केला पाहिजे. थोडी बाजरी, हरभरा, गहु, मका, कांदे, भाजीपाला, मूग, मठ, तूर, भूईमूग याचाही विचार करावा. यातील एक किंवा दोन पिकांना भाव मिळणार नाही, पण उर्वरित सर्व पिकांना भाव मिळेल. उत्पादन घेतल्यानंतर शेतकर्‍यांना विकण्याची फार घाई झालेली असते. साठवण करण्याचा विचार त्यांनी केला पाहिजे. ‘लॉटरी’सारखी टोमॅटो, कांदा ही पिके सातत्याने करण्यापेक्षा शाश्वत भाव मिळवून देणारे कापूस, काळा चना यांसारख्या पिकांचा विचार शेतकर्‍यांनी केला पाहिजे.

हवामान शास्त्रज्ञ किरणकुमार जोहरे म्हणतात…

सूर्यावरील चुंबकीय वादळांमुळे पृथ्वीच्यावरील म्हणजे जमिनीपासून ९० किलोमीटर ते ४०० किलोमीटरचे आयनोस्फियर व जमिनीलगतच्या म्हणजे जमिनीपासून साधारणत: ८ ते १० किलोमीटरचे ट्रोपोस्फियरमध्ये खळबळ माजली आहे. परिणामी अस्थिर वातावरणात भोवरे म्हणजे अ‍ॅटमॉस्फिअरिक इडीज तयार होत आहेत.

- Advertisement -

देशातील ३६ पैकी ११ राज्यात आताच सरासरीपेक्षा ३७ ते ४० टक्के अधिक पाऊस झाला आहे. दिंडोरी तालुक्यात जुलैत सरासरीच्या पाच पट पाऊस झाला. यामागील कारण म्हणजे क्युमोलोनिंबस ढगांची निर्मिती. ढगफुटींचा वर्षाव हा केवळ महाराष्ट्रात होतो असे नाही, तर भारतासह जगभरातील विविध खंडात होत आहे. एका बाजूला सरासरीच्या दुपटीपासून १० पटीपर्यंत पावसाची ठिकाणे तर, दुसर्‍या बाजूला ५० डिग्री पार केलेली अंग भाजून काढणारी उष्णता. एकाच पृथ्वीवर दोन टोकाचे तापमान व हवामान बदलाची काळी बाजू दिसते आहे. याचा थेट परिणाम शेतीसह सर्वसामान्य माणसाला बसते आहे. ऑस्ट्रेलियासारख्या देशाचे सरकार तीन दिवसांत ७० टक्के पडलेल्या पावसाने म्हणजे ढगफुटींमध्ये वाहून गेले हे आजचे न्यू नॉर्मल वास्तव आहे. ‘जेट स्ट्रीम’मुळे निर्माण झालेल्या हीट वेव्हच्या तडाख्यामुळे पेटलाय. चीनसह भारतात ढगफुटींच्या वर्षावामागे सूर्यावरील चुंबकीय वादळे कारणीभूत आहेत, हे शास्त्रीय सत्य आहे.

भारतात गेल्यावर्षीच्या तुलनेत ३४ टक्क्यापेक्षा अधिक विजा चमकल्या व पडल्या, यालादेखील वातावरणात अस्थिरता निर्माण करणारा सूर्य कारणीभूत आहे, ही बाब कदाचित सर्वांना रुचणार नाही. मान्सून पॅटर्नबरोबरच जेट स्ट्रीमचा पॅटर्नदेखील बदलला आहे. याचमुळे युरोप भाजून निघतो आहे. सबट्रॉपिकल जेटमुळे युरोपमध्ये स्पेन, पोर्तुगाल, फ्रान्स, आयर्लंड, नेदरलंड, नॉर्वे, युनायटेड किंग्डम म्हणजे यूके इ. देशांत लाखो लोक होरपळत आहेत.

- Advertisement -

उष्णतेच्या लाटेमुळे युरोपात जंगलांना आगी लागल्या आहेत. सरकारने या देशातील लोकांना ‘रेड लेवल टेम्परेचर अलर्ट’ दिला आहे. या अलर्टचा अर्थ तापमान ४७ डिग्री सेल्सिअसपेक्षा अधिक वाढेल असा होतो. युरोपातील देशांमध्ये बहुतांशकरून बर्फवृष्टी होऊन हाडे गोठवणारी थंडी असते. अशावेळी तापमान ४७ डिग्री सेल्सियसवर जाणे हे तेथील लोकांसाठी किती घातक असेल, याचा विचार न केलेला बरा. या उष्णतेमुळे अनेकांना जीव गमवावा लागला, शिवाय जंगलांना लागलेल्या आगीत मोठ्या संख्येने पशुपक्ष्यांचे बळी गेले. परिणामी या समस्येला तोंड देण्याचे आव्हान सरकारसमोर आहे. विशेष म्हणजे 2003, 2006, 2018, 2019, 2021 व 2022 या वर्षामध्ये युरोपमध्ये
आत्ताच का भाजून निघतोय युरोप?

२१ जून २०२२ रोजी सूर्य पृथ्वीच्या साडेतेवीस अंशावरील विषुववृत्ताच्या उत्तरेकडील कर्कवृत्तावर पोहोचला होता. परिणामी या ठिकाणी उष्णता वाढली. पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते यामुळे या उष्ण वार्‍याने अधिकच गती मिळाली आहे. पृथ्वीच्या उष्ण कटिबंध प्रदेश व साडेतेवीस अंशापासूनवरच्या दिशेला असलेला समशीतोष्ण कटिबंध या दोघांमध्ये वाहणारे कमी बाष्प असलेले कोरडे तसेच गरम वेगवान वारे (सबट्रॉपिकल जेट स्ट्रीम) होय. या वार्‍यांचा पॅटर्नदेखील बदलला आहे आणि ते वरच्या दिशेला सरकल्याने त्याच्या झालेल्या परिणामामुळे यूरोपात जंगलाना अंगी लागत आहेत. वातावरणातील अस्थिरतेने धुळीची वादळे बनत आहेत आणि नेहमी थंड प्रदेशात वावरणारे गोर्‍या कातडीचे आणि आशिया तसेच आफ्रिका खंडातील लोकांच्या उष्णतेची सवय नसणारे लोक होरपळून गतप्राण होत आहेत, अशी युरोपातील आपत्तीची स्थिती शास्त्रीय विश्लेषणातून लक्षात येते. यात सूर्यावरील चुंबकीय वादळांनी अधिक भर घातली व पृथ्वीवर नैसर्गिक तांडव सुरू झाले आहे.

पावसाचे दिवस झाले कमी

दरवर्षी 7 जूनपासून पावसाला सुरुवात होते. मे महिन्यात वळीवाच्या सरी कोसळतात. त्यामुळे हवेतील आर्द्रता वाढते आणि तापमान कमी होते. अर्थात, पिकांसाठी नैसर्गिक वातावरण तयार व्हायचे मग पेरणी केली जायची. पावसाचे दिवस जूनमध्ये 8 ते 10 दिवस, जुलैमध्ये 8 ते 10 दिवस असे होते. त्यामुळे निसर्गावर आधारित शेती केली जात होती. आता पावसाचे दिवस कमी झाले. पण प्रमाण जास्त आहे. म्हणजे जुलै महिन्याची सुरुवात झाली तेव्हा पाऊस पडलेला नव्हता आता जुलै महिन्याच्या शेवटी अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झालेले दिसून येते. जिल्ह्यात मका, कापूस, सोयाबीनसह इतर सर्व पिकांमध्ये पाणी साचले आहे. 8 ते 10 दिवस सूर्यप्रकाश नाही. त्यामुळे वापसा झाला नाही आणि पिकांची मुळं सडली. 15 दिवस मुळे बंद झाल्यानंतर त्याचा परिणाम उत्पादनावर होतो.

इतरांचे अनुकरण टाळणे हिताचे

कृषी विभागातील कर्मचारी असतील किंवा कृषी विद्यापीठातील संशोधक यांनी आजवर शेतकर्‍यांसाठी केलेल्या कार्याचा शेतीला काही प्रमाणात फायदा झाला. काही ठिकाणी तोटाही झाला. पण या सर्वांना शेतकर्‍यांची मानसिकता बदलण्यात फारसे यश आलेले दिसत नाही. शेतीकडे बघण्याचा नकारात्मक दृष्टिकोनातून सर्वात अगोदर बदलायला हवा. हायड्रोलिक इंजिनीअरिंग हा शेती क्षेत्रात नवीन प्रकार उदयास आला आहे. आपल्या शेतीचा आपण अभ्यास करू शकतो. त्या पद्धतीने शिवाराचा विचार करुन जे पिक इतरांनी लावलेले नसेल त्याचे उत्पादन घ्या. पिकवलेला माल लगेच बाजारात विक्रीसाठी न घेवून जाता, साठवणूक करण्याचा विचार करा. भाव मिळाल्यानंतर माल विका. कांदा चाळीच्या माध्यमातून कांदा उत्पादक शेतकर्‍यांना हा दिलासा मिळाला आहे. त्याचपद्धतीने इतर पिकांच्या बाबतीत होऊ शकते, याविषयी खात्री बाळगा.

स्वानुभवातून शाश्वत शेती शक्य

निसर्गाच्या लहरीपणावर कुणाचेही नियंत्रण नाही, हे अगदी स्पष्ट झाले आहे. अशा परिस्थितीत आपल्या शेजारच्या शेतकर्‍याने काय पेरले आहे, याचा विचार करुन त्याच्याशी स्पर्धा करण्यापेक्षा आपल्या शेतीत आपण काय पिकवू शकतो, याचा विचार प्रत्येक शेतकर्‍याने केला पाहिजे. केवळ दुसर्‍यांच्या सांगण्यावरुन किंवा त्याच्या द्वेषापोटी आपण आपल्या शेतीचे ‘मातेरे’ करण्यात काहीच अर्थ नाही. कृषी विद्यापीठ किंवा शास्त्रज्ञ यांच्यापेक्षा शेतकरी हा स्वानुभावतून शाश्वत उत्पन्न देणारी शेती निश्चितपणे करु शकतो. ‘माझं शेत हीच प्रयोगशाळा अन् विद्यापीठ’ म्हणून त्यांनी शेतीतून पाच वर्षांचे सरासरी उत्पन्न घेण्याचे नियोजन करण्याची आवश्यकता आहे. प्रत्येक वर्षी शेतकरी नैसर्गिक संकटांचा सामना करतो. त्याला संघर्ष नवीन नाही. पण संकट आले म्हणून खरा शेतकरी कधीच धीर सोडत नाही, हेदेखील वास्तव आहे. वारंवार येणार्‍या नैसर्गिक संकटांचा सामना कसा करावा, हवामान आणि शेतीपिकांवर होणार्‍या परिणांना विचार व्हायलाच हवा.

असा लागला ’जेट स्ट्रीम’चा शोध !

’जेट स्ट्रीम’च्या शोधाचे श्रेय ब्रिटिश हवामानशास्त्रज्ञ जेम्स ग्लेशर यांना जाते. १८६० च्या दशकात वातावरणात सोडलेल्या बलूनद्वारे प्रयोग करताना अचानक वेगाने बलून गायब होत होते. त्याचा अभ्यास केला असता त्यांना १२० किलोमीटर प्रतितासापर्यंत वेगाने वाहणारे वारे म्हणजे जेट स्ट्रेटचा शोध लागला. त्यानंतर ५० वर्षांनंतर म्हणजे १९१० मध्ये जपानी हवामानशास्त्रज्ञ वासाबुरो ओईशी यांनी जेट प्रवाहाच्या अस्तित्वाचा स्पष्ट पुरावा देत पुन्हा शोध लावला.
गंमत म्हणजे तोपर्यंत वातावरणाचा अभ्यास करण्यात नेहमी अग्रेसर असणार्‍या अमेरिकन लोकांना याची पुसटशीदेखील कल्पना नव्हती, हे विशेष.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -