घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्र'नजर महानगर'ची : नायलॉन मांजा विक्रेत्यांचा जाच, नागरिकांना फास

‘नजर महानगर’ची : नायलॉन मांजा विक्रेत्यांचा जाच, नागरिकांना फास

Subscribe

आपलं महानगर चमू l नाशिक

नायलॉन मांजामुळे काही वर्षांपासून शेकडो नाशिककरांसह प्राणी, पक्षीही जखमी झाल्याच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडल्या आहेत. त्यात काहींचा मृत्यूही झाल्याची उदाहरणे आहेत. अशा जीवघेण्या नायलॉन मांजावर बंदी घालण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्यानुसार घातक मांजाची निर्मिती, साठवणूक, विक्री आणि वापर करता येणार नाही. पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिवांनी महापालिका, नगर परिषद, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, जिल्हाधिकारी, न्यायदंडाधिकारी, पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षकांना यासंदर्भात कारवाईचे आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांनीही नायलॉन मांजा विक्रेत्यांवर कठोर कारवाई सुरू केली असून, एका दिवसात २० विक्रेत्यांना चक्क तडीपार केले आहे. पोलिसांच्या या कारवाईवरुन घातक मांजा किती जीवघेणा आहे, याचे गांभीर्य लक्षात येते. असे असले तरीदेखील नाशिकसह येवला, सिन्नर व ग्रामीण भागात नायलॉन मांजाची सर्रास विक्री सुरू आहे. या विक्रेत्यांच्याही मुसक्या आवळणे गरजेचे आहे. संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर जीवघेण्या नायलॉन मांजाचा घेतलेला हा धांडोळा..

- Advertisement -
माणसापेक्षाही नायलॉन बळकट

जीवघेण्या नायलॉन मांजामुळे मनुष्य आणि पक्ष्यांच्या जीवाला धोका निर्माण होत असल्याचे वारंवार पुढे येऊनही त्यावर आजवर ठोस उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. हा मांजा तयार करण्याची प्रक्रिया अभ्यासल्यास त्याची जीवघेणी तीव्रता लक्षात येते. हा मांजा तुटत नाही. त्यामुळे दुचाकीस्वाराच्या गळ्यात अडकल्यास त्याला ओढून घेण्याचीही क्षमता नायलॉन मांजात असते. म्हणजेच माणसापेक्षाही तो अधिक बळकट असतो. तर, पॉलिप्रॉपिलीन पदार्थाचा वापर करून तयार केलेल्या मांजाचा विजतारांना स्पर्श झाल्यास पतंग उडविणार्‍याला धक्का लागू शकतो. डिंक किंवा चिकटणारे कोणतेही पदार्थ आणि काचेच्या पावडरचे मिश्रण मांजासाठी केले जाते. त्यात मैदा टाकून मिश्रण अधिक घट्ट केले जाते. नायलॉन दोर्‍यावर या मिश्रणाचा थर लावून त्याला वरून काचेचा चुराही लावला जातो. त्यामुळे दोरा आणखी खरबरीत होतो. काही ठिकाणी वज्रम नावाचा रासायनिक पदार्थही मिश्रणात टाकला जातो. त्यात अ‍ॅल्युमिनियम ऑक्साइड आणि झिरकोनिया अ‍ॅल्युमिनासारखी खरबरीत रसायने असतात. अशा प्रकारच्या रासायनिक पदार्थांचा प्रयोग तामिळनाडूमध्ये सर्रास केला जातो. यातून दोर्‍याची धार आणखी वाढते, पण आता पॉलिप्रॉपिलीनपासून बनवलेला चायनीज मांजा आला आहे. तो अधिक धोकादायक आहे. पारदर्शक असल्यास तो दिसतही नाही. अ‍ॅल्युमिनियम ऑक्साइड व झिरकोनियासारखे पदार्थ दोर्‍याला इन्सुलेट करतात. म्हणजे त्यातून वीज प्रवाहित होण्याची शक्यता कमी होते, पण पॉलिप्रॉपिलीन हा पदार्थ अत्यंत घातक आहे. हा दोरा विजेच्या तारेला लागला तर पतंग उडविणार्‍याला विजेचा धक्का लागू शकतो.

१८ जून २०१६ ला निघाले बंदीचे आदेश

पर्यावरण विभागानेही यासंदर्भात अधिसूचना जारी करून पतंग उडविण्यासाठी नायलॉन मांजासारख्या धोकादायक बाबींची विक्री आणि साठवणूक करण्याची परवानगी देण्यात येऊ नये, नागरिकांनी नायलॉन मांजाचा वापर टाळावा, यासाठी जनजागृती करण्याची, सूचना अधिसूचनेद्वारे देण्यात आली आहे. परंतु, महसूल अधिकारी अधिसूचनेचा विपर्यास करून व्यापारी प्रतिष्ठानांवर छापे टाकून त्यांच्याविरुद्ध पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करीत असल्याचा दावा काही पतंग व्यापार्‍यांनी केला होता. संबंधित व्यापार्‍यांनी दाखल केलेल्या याचिकेला पेटा या स्वयंसेवी संस्थेने आणि एका सामाजिक कार्यकर्त्याने विरोध केला. त्यावेळी उच्च न्यायालयाने व्यापार्‍यांची मागणी फेटाळून लावली होती. तसेच, केवळ संक्रांतीच्या काळात नायलॉन मांजाची निर्मिती, साठवणूक आणि विक्रीला बंदी घालण्यापेक्षा नायलॉन मांजाला कायमस्वरूपी बंदी घालण्यासंदर्भात राज्य सरकारने धोरण ठरवावे, असे निर्देशदेखील सरकारला दिले होते. त्यानंतर राज्य सरकारने १८ जून २०१६ रोजी नायलॉन मांजाची साठवणूक, विक्री आणि वापराला बंदी घालण्याचा निर्णय घेतला. असे असतानाही प्रत्यक्षात मात्र नियमभंग सुरूच असल्याचे चित्र आहे.

- Advertisement -
‘पेटा’ने केला न्यायालयीन लढा पुढे

पक्षी आणि मानवाला असलेला होणारा धोका लक्षात घेत शासनाने राज्यात त्याच्या विक्रीला बंदी घातली. राज्य सरकारने ही अधिसूचना पर्यावरण (संरक्षण) कायदा १९८६ नुसार जारी केली. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात मांजावर बंदी घालण्यासाठी ‘पेटा’ या संस्थेने याचिका दाखल केली होती. तत्पूर्वी ‘पेटा’ने सरकारच्या प्राणी कल्याण मंडळाला आवाहन करून मांजावर बंदी घालण्याची मागणी केली होती. न्यायालयाने पेटाच्या बाजूने निर्णय दिला. त्याअनुषंगाने केंद्रिय पर्यावरण, वन आणि वातावरण बदल विभागाला पत्र पाठवून याबाबत पाऊले उचलण्याची मागणी पेटा संस्थेने केली. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आपल्या आदेशात म्हटले आहे की, नागरिकांनी नायलॉन मांजा वापरू नये. नायलॉनचा मांजा वापरल्यास संबंधित विक्रेत्यांवर कडक कारवाई करावी.

मालेगाव, भिवंडीत कारखाने

मालेगाव व भिवंडी येथील छोट्या कारखान्यांतून नायलॉन मांजाची निर्मिती मोठ्या प्रमाणावर होते. साध्या मांजात सूताला धार येण्यासाठी काचेची भुकटी आणि साबुदाण्याची खळ वापरली जाते. परंतु, नायलॉन मांजा बनवताना प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर केला जातो. २० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या, साधारणपणे मटण वा दारूच्या दुकानात दिल्या जाणार्‍या काळ्या, निळ्या रंगातल्या या पिशव्या असतात. मांजा तयार करणारे त्या भंगारवाल्यांकडून मोठ्या प्रमाणात विकत घेऊन विरघळवतात अन् त्यापासून दोरा बनवतात. तो तुटत नसल्याने पतंग बनवणार्‍यांना तोच हवा असतो. हा मांजा कुजत नसल्याने त्यापासून पर्यावरणाला मोठी हानी पोहोचते.

चायनीज मांजाचा धोका

पतंग काटण्यासाठी मांजाला काचेच्या चुर्‍याचे कोटिंग लावल्याने तो धारदार होतो. हा मांजा झाड, वायरींवर अडकून राहिला, तरी काही दिवसांनी तो गळून जातो किंवा त्याची धारही बोथट होते; पण चायनीज मांजा मूळचा नायलॉनने बनविलेला असल्याने पक्षी वर्षभर त्यापासून जखमी होतच राहतात. हा मांजा धाग्याच्या मांजापेक्षा टिकाऊ असल्याने त्याचे दुष्परिणाम दीर्घकाळ दिसून येतात.

यावर व्हावा अधिक विचार 
  • नायलॉन मांजा विक्रेत्यांवर यापुढील काळात गुन्हे दाखल करण्यावर भर द्यावा
  • नायलॉन मांजावरील बंदी काही दिवसांऐवजी कायमस्वरुपी असावी
  • फटाके विक्रेत्यांप्रमाणेच मांजा विक्रेत्यांनादेखील विक्रीसाठी परवानगी घेणे अनिवार्य करावे
  • नायलॉनचा मांजा आढळल्यास दुकानाचे लायसन्स रद्द करावे
  • केवळ नायलॉन मांजा विकणार्‍यांवर कारवाई न करता त्याचा वापर करणार्‍यांवरही कारवाई केली जावी
  • शाळा, महाविद्यालयांमध्ये नायलॉन वापराविरोधात शपथ देण्यात यावी

मांजामुळे पशू, प्राणी व मानवी जिवाला धोका निर्माण होवून जीवघेणे अपघात होतात. त्यामुळे नाशिक शहरात नायलॉन मांजा विक्री व वापरण्यास मनाई केली आहे. नायलॉन मांजा विक्री करणार्‍यांवर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. त्यानुसार पोलिसांनी शहरात नायलॉन मांजाची विक्री करणार्‍यांविरुद्ध मोहीम सुरू केली आहे. पतंग उडविण्यासाठी बंदी असलेल्या नायलॉन मांजाचा वापर करू नये. : अंकुश शिंदे, पोलीस आयुक्त, नाशिक

कायदा काय म्हणतो..?

नायलॉनमांजा खरेदी-विक्रीस न्यायालयाने मनाई केली असल्याने अशी कृती करणार्‍यांवर भारतीय दंडविधान कायद्याच्या कलम ४४ नुसार कारवाई होते. संबंधितांवर गुन्हा दाखल करून अटक केली जाते.

मांजा वापरणार्‍यांवरही कारवाई

नायलॉन मांजाची विक्री करणे जसे कायदेशीरदृष्ट्या गुन्हा ठरणार आहे, त्याचप्रमाणे मांजाची खरेदी करणेही बेकायदेशीर कृत्य ठरणार आहे. त्यामुळे नायलॉन मांजाची खरेदीच करायची नाही, अशी भूमिका यंदा पतंगप्रेमींना घ्यावी लागणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -