नाना पटोलेंची काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे राष्ट्रवादीची तक्रार, आता अजितदादा म्हणतात…

आपल्या राज्यात जे महत्त्वाचे विषय आहेत, त्याला महत्त्व दिलं पाहिजे. सगळ्यांनीच एकमेकांबरोबर आरोप-प्रत्यारोप करणं महाराष्ट्राची ती परंपरा नसल्याचंही अजित पवार म्हणालेत.

Deputy Chief Minister Ajit Pawar criticized the UP government

मुंबईः महाविकास आघाडीमधील धुसफूस अखेर नाना पटोलेंनी काँग्रेस हायकमांडच्या कानावर घातलीय. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीसुद्धा या सर्व प्रकरणावर प्रतिक्रिया दिलीय. त्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधलाय.

नाना पटोलेंनी त्यांच्या नेत्यांना काय सांगावं हा त्यांचा अधिकार आहे. अर्थ विभागाचं निधी देण्याचं काम मी केलं आहे. आमच्याही पक्षात काही झालं तर त्याची तक्रार मुख्यमंत्री आणि पवार साहेबांकडे करतो. 24 पक्षाचं एनडीए सरकार होतं, यूपीए सरकार होतं, काँग्रेस आघाडीचं सरकारही होतं. त्यावेळीही भांड्याला भांडं लागायचं. एका कुटुंबात भांड्याला भांड लागतं, तर तीन पक्षाच्या कुटुंबात भांड्याला भांड लागणार आहे. तीन पक्षांचं सरकार नीट चालावं हाच आमचा प्रयत्न असल्याचंही अजित पवारांनी अधोरेखित केलंय.

आपल्या राज्यात जे महत्त्वाचे विषय आहेत, त्याला महत्त्व दिलं पाहिजे. सगळ्यांनीच एकमेकांबरोबर आरोप-प्रत्यारोप करणं महाराष्ट्राची ती परंपरा नसल्याचंही अजित पवार म्हणालेत. विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी काल घेतलेल्या सभेत शिवसेनेला लक्ष्य केलं, त्याबाबतची अजित पवारांनी विचारणा करण्यात आली. देवेंद्र फडणवीसांच्या मनात काय आहे ते मला माहीत नाही. उद्या तुम्हाला मी भाषण करायला सांगितलं. तुम्ही काही बोलला तर बाळासाहेबांनी विचारलं हाच विचार तुम्ही का मांडला. त्यावर मी काय उत्तर देऊ? मी अंतर्ज्ञानी नाहीये. महाराष्ट्राचा सुसंस्कृतपणा हरवत चालला आहे. चव्हाण साहेबांनी जो विचार दिला जो रस्ता दाखवला त्या मार्गावरून चाललं पाहिजे. त्यावरून आपण भरकटत चाललो आहे. ते बरोबर नाही. उद्या कोणी काही केलं तर काहींनी समंजस भूमिका घेतली पाहिजे. तुम्ही मला त्याबाबत विचारू नका. शेती पाऊस आणि विकासाच्या समस्यावर मला विचारा, असं अजित पवार यांनी अधोरेखित केलंय.

काय म्हणाले होते नाना पटोले?

तत्पूर्वी नाना पटोलेंनी काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे राष्ट्रवादीची तक्रार केली होती. गेल्या अडीच वर्षांत राष्ट्रवादीने फोडाफोडी करत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीत प्रवेश दिला. भिवंडीतही काँग्रेस पक्ष फोडला. भंडारा आणि गोंदियात राष्ट्रवादीने भाजपसोबत छुपी युती करत काँग्रेसला संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही नाना पटोलेंनी केलाय. राष्ट्रवादीचं अजूनही भाजपसोबत संधान आहे. सरकारमध्ये असूनही राष्ट्रवादीकडून काँग्रेसला अडचणीत आणलं जात असल्याचंही नाना पटोले म्हणालेत. राजस्थानच्या उदयपूरमध्ये काँग्रेसचं तीन दिवसांचं संकल्प शिबीर पार पडलं. यावेळी विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. नाना पटोलेही या शिबिराला उपस्थित होते. त्यावेळीच त्यांनी काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे राष्ट्रवादीची तक्रार केली आहे.