Sunday, March 16, 2025
27 C
Mumbai
Homeमहाराष्ट्रNana Patole : कापूस साठवणूक पिशव्या खरेदीत 41 कोटींचा भ्रष्टाचार - नाना पटोले

Nana Patole : कापूस साठवणूक पिशव्या खरेदीत 41 कोटींचा भ्रष्टाचार – नाना पटोले

Subscribe

– प्रेमानंद बच्छाव

मुंबई : महाराष्ट्र राज्य यंत्रमाग मंडळाच्या माध्यमातून कापूस साठवणूक पिशव्या खरेदीसाठीच्या निविदा वेगळ्या शीर्षकाखाली काढून 77 कोटी रुपयांची खिरापत वाटून 41 कोटी 59 लाख रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गुरुवारी केला. यंत्रमाग महामंडळाचे महाव्यवस्थापकीय संचालक तथा वस्त्रोद्योग विभागाचे उपसचिव श्रीकृष्ण पवार आणि तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी संगनमत करून 577 रुपयांची पिशवी 1 हजार 250 रुपयांना खरेदी करून हा भ्रष्टाचार केल्याचा दावा पटोले यांनी केला. या घोटाळ्याची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. (Nana Patole congress allegations on dhananjay munde and shrikrishna pawar committed corruption)

हेही वाचा : Sion Hospital : हृदयविकार रूग्णांना दिलासा, सायन रुग्णालयात चाचणीसाठीचा प्रतीक्षा कालावधी होणार कमी 

कृषी खात्यातील साहित्य खरेदी गैरव्यवहाराच्या आरोपांचा सामना करणारे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर पटोले यांनी गुरुवारी नवा आरोप करून खळबळ उडवून दिली. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने भ्रष्टाचाराचे अनेक विक्रम मोडीत काढले आहेत. शेतकऱ्यांच्या नावावर कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळाच्या माध्यमातून हा भ्रष्टाचार करण्यात आला असून एकाच परिवारातील चार वेगवेगळ्या कंपन्यांना बेकायदेशीररित्या निविदा काढून हे काम देण्यात आले. यंत्रमाग महामंडळाचे अधिकारी श्रीकृष्ण पवार यांनी त्यांच्या मर्जीतील एका पुरवठादाराला माहिती देऊन त्यांच्या संगनमताने सर्व प्रक्रिया राबवून गैरव्यवहार केला आहे. ही खरेदी प्रक्रिया लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असताना निवडणूक आयोगाची परवानगी न घेताच करण्यात आली. या कामासाठी ज्या चार कंपन्यांची निवड करण्यात आली, त्यातील तीन कंपन्या ओसवाल या एकाच परिवारातील आहेत, तर चौथी कंपनी ही ओसवाल यांच्या सनदी लेखापालाची आहे, असे पटोले यांनी सांगितले.

यंत्रमाग महामंडळाने कापूस साठवणूक पिशव्या खरेदीसाठी प्रति पिशवी 1 हजार 250 रुपयांचा दर मंजूर करण्यात आला. आयसीएआर नागपूर यांना याच पिशव्या 577 रुपये या दराप्रमाणे पुरवठा करण्यात आल्या आहेत . म्हणजे प्रति पिशवी 673 रुपये जास्त दराने खरेदी करून एकूण 41 कोटी 59 लाख 35 हजार 536 रुपयांचा भ्रष्टाचार करण्यात आला आहे. राज्य यंत्रमाग महामंडळाने आयुक्तालयाकडून कापूस साठवणूक बॅग उत्पादनासाठी कच्चा माल खरेदी करण्यासाठी निधी अग्रीम स्वरुपात 77.25 कोटी रुपये महामंडळास अदा करुन घेतला. महामंडळ कापूस साठवणूक पिशवी उत्पादकाकडून विकत घेऊन पुरवठा करणार होते. यात कच्चा मालाच्या खरेदीचा प्रश्नच येत नसताना कच्चा माल पुरवठा करण्यासाठी या शीर्षकाखाली हा व्यवहार करण्यात आल्याचे नाना पटोले म्हणाले.

तत्कालीन शिंदे सरकारच्या काळात धनंजय मुंडे यांनी कृषी साहित्य खरेदी आणि पुरवठ्याच्या डीबीटी योजनेत नियमबाह्य बदल करून मोठा गैरव्यवहार केला. यासंदर्भात आवाज उठवूनही सरकारने काहीच कारवाई केली नाही. मुंडे यांनी ही सर्व खरेदी तत्कालीन अर्थमंत्री तसेच मुख्यमंत्री यांच्या परवानगीने आणि मान्यतेने झाल्याचे स्पष्ट केले आहे. या घोटाळ्यात हे सर्वच सहभागी असल्याने मुंडेंवर कारवाई करत नाहीत का? असा सवालही पटोले यांनी केला आहे. महायुतीच्या भ्रष्टाचाराविरोधात आम्ही विधिमंडळात आवाज उठवणार असून सरकारने कारवाई केली नाही, तर रस्त्यावरची लढाई लढू आणि भ्रष्टाचाऱ्यांवर कारवाई करायला सरकारला भाग पाडू, असा इशाराही पटोले यांनी दिला.