Homeमहाराष्ट्रNana Patole : मुंडेच नव्हे तर मंत्रिमंडळातील 65 टक्के मंत्र्यांवर गुन्हे, नाना...

Nana Patole : मुंडेच नव्हे तर मंत्रिमंडळातील 65 टक्के मंत्र्यांवर गुन्हे, नाना पटोलेंचा दावा

Subscribe

नागपूर : बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराडवर कारवाई सुरू असताना दुसरीकडे मुंडेंवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. अशामध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. “मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर दररोज गंभीर स्वरुपाचे आरोप होत आहेत. पण राज्याच्या मंत्रिमंडळात फक्त धनंजय मुंडे किंवा संजय राठोडच नव्हे तर तब्बल 65 टक्के मंत्र्यांवर विविध प्रकारचे गुन्हे आहेत. भाजप स्वःताला पार्टी विथ डिफरन्स मानते तर त्यांनी या सर्व दागी, गुन्हे दाखल असलेल्या कलंकीत मंत्र्यांना मंत्रिमंडळामधून काढून टाकावे,” अशी मागणी यावेळी त्यांनी केली आहे. (Nana Patole Congress criticized Mahayuti government and beed crime)

हेही वाचा : Accident News : महाकुंभावरून परतणाऱ्या आठ भाविकांचा भीषण अपघातात मृत्यू, अनेकजण जखमी 

नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, “बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख आणि परभणीत सोमनाथ सुर्यवंशी या तरुणाचा पोलीस मारहाणीत मृत्यू झाला. या दोन्ही प्रकरणातील गुन्हेगारांना अशी शिक्षा झाली पाहिजे की राज्यात पुन्हा अशा घटना होणार नाहीत. पण सरकार यावर ठाम भूमिका घेताना दिसत नाही. महाराष्ट्रातील भाजप युती सरकार गुन्हेगारांचे सरकार आहे, अनेक मंत्र्यांवर गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आत्मपरिक्षण करावे आणि राज्याची प्रतिमा मलीन करणाऱ्या मंत्र्यांना बाहेरचा रस्ता दाखवावा,” असे ते म्हणाले.

“राज्यामध्ये भाजप युतीचे सरकार तुपाशी आणि जनता मात्र उपाशी अशी परिस्थिती आहे. शेतमालाला भाव नसल्याने शेतकरी हवालदिल आहे, सोयाबिन, धान, कांदा, कापूस कोणत्याच शेतमालाला भाव नसल्याने शेतकरी उद्ध्वस्थ झाला आहे. दररोज शेतकरी आत्महत्या होत आहेत. शेतकऱ्यांचे वीज बिल माफ केल्याची घोषणा भाजपा युती सरकारने केली पण शेतकऱ्यांना वीज बिले पाठवली जात आहेत. वीजेचे दर वाढवले आहेत, एसटीचे तिकिटदर वाढवले आहेत. महाराष्ट्रातून 24 लाख विद्यार्थ्यांनी नोकऱ्यांसाठी अर्ज केले आहेत. त्यांना नोकऱ्या मिळत नाहीत, महागाई वाढत आहे पण सरकार मात्र त्याकडे लक्ष देत नाही. काँग्रेस पक्ष जनतेला भेडसावणारे प्रश्न घेऊन सरकारला जाब विचारेल,” असे ते म्हणाले.

कुंभमेळ्यातील भाविकांच्या मृत्यूंना जबाबदार कोण?

“प्रयागराज येथे महाकुंभ मेळा भरला आहे. हा लोकांच्या श्रद्धेचा, भावनेचा आणि आस्थेचा विषय आहे. पण भाजप सरकारने महाकुंभ मेळ्याचाही इव्हेंट केला आहे. व्हिआयपी कल्चर आणून मोदी-योगी यांचे मोठे बॅनर्स लावले आहेत. या कुंभमेळ्यात चेंगराचेंगरीची घटना होऊन अनेक भाविकांचा मृत्यू झाला पण भाजप सरकार कोरोनासारखाच आताही मृतांचा आकडा लपवत असून माहिती बाहेर येऊ दिली जात नाही. शंकराचार्यांनी मुख्यमंत्री योगी यांचा राजीनामा मागितला आहे. एवढी मोठी दुर्घटना घडली पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तसेच सरसंघचालक यावर का बोलत नाहीत? सरसंघचालक मोहन भागवत यांनी मोदी-योगी यांचा राजीनामा का मागितला नाही?” असा सवाल नाना पटोले यांनी विचारला.