मुंबई : “उद्योगपती गौतम अदानी यांनी कंत्राटे मिळवण्यासाठी 2 हजार कोटी रुपयांची लाच दिल्याच्या आरोपावरून अमेरिकेच्या कोर्टाने अटक वॉरंट काढले आहे. ही केंद्रातील सरकारसाठी लाजिरवाणी घटना आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मदतीने गौतम अदानींनी देश विदेशात मोठ्या प्रमाणात कंत्राटे मिळवून देशाला लुटले आहे. भ्रष्टाचाराचे आरोप करून कोणतीही चौकशी न करता मोदी सरकारने मुख्यमंत्र्यांना तुरुंगामध्ये टाकले पण अमेरिकेच्या तपास यंत्रणाच्या तपासात अंबानींने मोठ्या प्रमाणात लाच देऊन कंत्राटे मिळवल्याचे स्पष्ट झाल्यानंतरही भ्रष्ट अदानीला अटक का केली जात नाही?” असा सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला. (Nana Patole congress on Gautam Adani charged in US bribery scheme and Rahul Gandhi comment)
हेही वाचा : Delhi Assembly Election : महाराष्ट्रानंतर दिल्लीची बारी, विधानसभा निवडणुकीसाठी आपची पहिली यादी जाहीर
केंद्र सरकारने चौकशी करून गौतम अदानीला तुरुंगामध्ये टाकावे ही लोकसभेमधील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची मागणी रास्तच असल्याचे मत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केले आहे. ते पुढे म्हणाले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सहकार्याने आणि सरकारी यंत्रणांच्या मदतीने अदानी देशाला लुटत आहे. विमानतळ, बंदरे, उर्जा निर्मितीसह सर्वच क्षेत्रात अदानीची मक्तेदारी सुरू असून त्याला जबाबदार पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच आहेत. अदानीला देश विदेशातील कंत्राटे देण्यासाठी पंतप्रधान मोदीच मदत करत आहेत हे उघड आहे.” असा आरोप यावेळी त्यांनी केला.
“धारावी पुनर्वसन प्रकल्पाच्या नावाखाली स्थानिकांना बेघर करण्याचा डाव आखून लाखो कोटी रुपयांची मुंबईतील जमीन अदानीच्या घशात घातलेली आहे. मुंबईचे विमानतळही अदानीच दिले आहे. यापाठीमागे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भक्कम पाठिंबा आहे. विरोधी पक्षनेते या नात्याने राहुल गांधी यांनी अदानीवर कारवाई करण्याची केलेली मागणी रास्तच असून अमेरिका जर गौतम अदानीच्या भ्रष्टाचाराबद्दल अटक वॉरंट काढू शकते तर भारत सरकार का कारवाई करु शकत नाही. भारत सरकारने कारवाई करून देशाला लुटणाऱ्यांना जेलमध्ये टाकले पाहिजे,” असेही नाना पटोले म्हणाले.