Pm modi security breach : माझ्याविरोधात तक्रारी करा, पण भाजपविरोधात बोलणारच- नाना पटोले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱ्यातील त्रुटीबाबत भाजपकडून काही गोष्टी ठरवून करण्यात येत आहेत. शेतकरी आंदोलनामुळे गेलेली पत सुधारण्यासाठी भाजपने ठरवून काही गोष्टी केल्या आहेत. पण त्याचवेळी नरेंद्र मोदी आणि भाजपने राजकीय फायद्यासाठी पंतप्रधान पदाची प्रतिष्ठा धुळीस मिळवली आहे. भाजपकडून पंतप्रधानांच्या सुरक्षेच्या मुद्द्याला जाणीवपूर्वक राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. तसेच कॉंग्रेसला या प्रकरणात बदनाम करतानाच संपूर्ण घटनेला एक इव्हेंट केले जात आहे. भाजपकडून माझ्याविरोधात तक्रारी दाखल करण्याची भाषा केली जात आहे. या तक्रारीच्या वक्तव्यालाही नाना पटोले यांनी पत्रकार परिषद घेत उत्तर दिले.

मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेबाबत बोललो म्हणून भाजपकडून माझ्याविरोधात तक्रारी दाखल करण्यात येणार आहेत. लोकशाहीत त्यांना तक्रार करण्याचा अधिकार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर भाजपकडून जे राजकारण सुरू झाले आहे. त्याविरोधात मी बोलतच राहणार आहे. कारण कॉंग्रेसला बदनाम करण्याचा प्रकार या संपूर्ण प्रकरणात करण्यात येत आहे. पंतप्रधान हे देशाचे आहेत. त्यांची सुरक्षा अत्यंत महत्वाची आहे. त्यांच्या सुरक्षेशी कोणतीही तडजोड होता कामा नये. या संपूर्ण प्रकरणात पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी सविस्तर गोष्टींचा खुलासा केला आहे. पण भाजपकडून या प्रकरणाला राजकीय रंग देतानाच कॉंग्रेसला बदनाम करण्याचे काम करण्यात येत आहे.

पंतप्रधानांची सुरक्षा ही एसपीजीकडे असते तसेच अनेक महत्वाच्या केंद्रीय यंत्रणा त्यात सहभागी असतात म्हणून भाजपाने थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या घरासमोरच आंदोलन करून त्यांना जाब विचारावा. आम्ही कालच या संदर्भात अमित शहा यांनी खुलासा करावा, अशी मागणी केली आहे, परंतु केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व गृहमंत्रालय हे गप्पच आहेत.


नाना पटोलेंविरोधात गावोगाव तक्रारी दाखल करा, चंद्रकांत पाटलांचे कार्यकर्त्यांना आवाहन