मोदींच्या गाडीवरील कथित दगडफेकीचा राणेंकडून निषेध, आता पटोले म्हणतात…

''पंतप्रधान काल पंजाबच्या दौऱ्यावर होते, ते विकासाच्या कार्यक्रमाला जात होते. 42 हजार कोटींच्या योजनांचं उद्घाटन करायला जात होते. भूमिपूजनही करायला जात होते. त्यावेळी ते हेलिकॉप्टरने जाणार होते, वातावरण खराब झाल्यानं बायरोड गेले. रस्त्यावर त्यांना थांबवण्यात आलं. समोरून जी दगडफेक आणि हल्ला झाला त्या घटनेचा मी निषेध करतो, अशा घाणेरड्या घटना, षडयंत्र काँग्रेसच करू शकते'', असंही नारायण राणे म्हणालेत. त्यालाच आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी प्रत्युत्तर दिलंय.

मुंबईः पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पंजाब दौऱ्यात झालेल्या चुकीचा मुद्दा थेट सर्वोच्च न्यायालयात जाऊन पोहोचलाय. या मुद्द्यावरून भाजप चांगली आक्रमक झालीय, तर काँग्रेसनं आंदोलनातील शेतकरी हे भाजपचे कार्यकर्ते असल्याचं म्हटलंय. त्यामुळे हा वाद चांगलाच चिघळलाय. विशेष म्हणजे सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणेंनीही या घटनेचा निषेध गेलाय. पण बोलता बोलता त्यांनी मोदींच्या गाडीवर कथित दगडफेक झाल्याचा उल्लेख केलाय. त्यावरूनच आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी पलटवार केलाय.

”पंतप्रधान काल पंजाबच्या दौऱ्यावर होते, ते विकासाच्या कार्यक्रमाला जात होते. 42 हजार कोटींच्या योजनांचं उद्घाटन करायला जात होते. भूमिपूजनही करायला जात होते. त्यावेळी ते हेलिकॉप्टरने जाणार होते, वातावरण खराब झाल्यानं बायरोड गेले. रस्त्यावर त्यांना थांबवण्यात आलं. समोरून जी दगडफेक आणि हल्ला झाला त्या घटनेचा मी निषेध करतो, अशा घाणेरड्या घटना, षडयंत्र काँग्रेसच करू शकते”, असंही नारायण राणे म्हणालेत. त्यालाच आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी प्रत्युत्तर दिलंय.

काही नेते सांगतात की तिथे दगडफेक झाली. मला असं वाटतं माणसांचं वय झालं की त्याला कमी दिसतं. पण काही लोकांना वय जास्त झाल्यानंतर जास्त दिसत असेल तर मला माहिती नाही. ही घटना घडवून घेतली गेलेली आहे. हे ठरवून केलं गेलेलं आहे, असं म्हणत नाना पटोलेंनी नारायण राणेंवर टीकास्त्र सोडलंय.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यात नेमके काय घडले?

5 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी पंजाबमध्ये भाजपच्या निवडणूक प्रचारासाठी जात होते. मोदी भटिंडाला पोहोचले होते. येथून ते हेलिकॉप्टरमधून हुसैनीवालामधील राष्ट्रीय शहीद स्मारक येथे जाणार होते. परंतु हवामान चांगले नसल्यामुळे मोदींनी 20 मिनिटे वाट पाहिली. परंतु हवामानात कोणतीही सुधारणा न झाल्यानं मोदींनी रस्ते मार्गाने जाण्याचा निर्णय घेतला. 2 तास या ठिकाणी जाण्यासाठी लागणार होते. पंजाब डीजीपीकडून सुरक्षा व्यवस्थेची खातरजमा केल्यानंतर मोदी रस्ते मार्गाने पुढे निघाले. राष्ट्रीय शहीद स्मारकाहून 30 किमी अगोदर मोदींचा ताफा जेव्हा उड्डाणपुलावर पोहोचला, तेव्हा काही आंदोलकांनी मोदींचा ताफा अडवला. फिरोजपूरमध्ये काही शेतकरी आंदोलकांमुळे मोदींना रॅली रद्द करावी लागली. त्यामुळे 15 ते 20 मिनिटे मोदी उड्डाणपुलावर अडकले. ही पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेमध्ये मोठी चूक असल्याचे म्हटले जाते.