घरताज्या घडामोडीलसींसाठी श्रीमंतांना पंचतारांकित सुविधा तर गरिबांना रांग हे मोदींचे धोरण - नाना...

लसींसाठी श्रीमंतांना पंचतारांकित सुविधा तर गरिबांना रांग हे मोदींचे धोरण – नाना पटोले

Subscribe

प्रत्येक विभागात काँग्रेसच्या वरिष्ठ नेते व मंत्री यांनी पत्रकार परिषद घेऊन मोदी सरकारच्या कारभाराची केली पोलखोल

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २०१४ च्या निवडणुकीत जनतेला खोटी स्वप्ने दाखवून सत्ता मिळवली पण सात वर्षात मोदी सरकार सर्व पातळ्यांवर अपयशी ठरले आहे. कोरोनाची परिस्थिती हाताळण्यातही मोदी सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. पहिल्या लाटेत नमस्ते ट्रम्पच्या आयोजनात व्यस्त राहिले आणि परिस्थिती अंगलट येताच तबलीगीच्या नावावर कोरोनाचे खापर फोडून धार्मिक रंग देण्याचा उद्योग केला तर दुसऱ्या लाटेतही कोरोनाचे रुग्ण व मृत्यू वाढत असताना मोदी सरकार विधानसभेच्या प्रचारात दंग होते. मोदींनी आपल्या मनमानी कारभाराने १३० कोटी जनतेला कोरोनाच्या खाईत लोटले, त्यांना सत्तेवर राहण्याचा नैतिक अधिकार राहिलेला नसून मोदींनी राजीनामा द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

मोदी सरकारच्या सात वर्षांच्या काराभाराचा निषेध करण्यासाठी काँग्रेसने आज जिल्हा-तालुका स्तरावर काळ्या फिती लावून निदर्शने केली तसेच मोदी सरकारचा निषेध केला. मुंबईत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आ. भाई जगताप, प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष चंद्रकांत हंडोरे, नसीम खान, मुंबई काँग्रेसचे कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा, प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते डॉ. संजय लाखे पाटील, मुंबई काँग्रेसचे सरचिटणीस संदेश कोंडविलकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

- Advertisement -

पत्रकारांशी बोलताना पटोले म्हणाले की, मोदी सरकार हे सर्व पातळ्यांवर अपयशी ठरले आहे. महागाई प्रचंड वाढल्याने लोकांना जगणे कठीण झाले आहे. पेट्रोल, डिझेल, एलपीजी गॅस, खाद्यतेल सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. बेरोजगारी प्रचंड वाढली आहे. अर्थव्यवस्था रसातळाला गेली आहे. कोरोना महामारीत तर मोदी सरकारने अत्यंत बेजबाबदारपणा केला. लाखो लोक ऑक्सीजन, औषधांअभावी मरण पावले. जानेवारी २०२१ मध्येच लसीचे नियोजन केले असते तर आज लसीसाठी लोकांना रांगा लावाव्या लागल्या नसत्या पण १३० कोटी जनतेचा विचार करुन त्या प्रमाणात लसींची मागणीच केली नाही. नंतर पाकिस्तानसारख्या देशाला मोफत लस वाटली आणि देशातील जनतेला वाऱ्यावर सोडले. खासदार राहुलजी गांधी म्हणाले होते की, मोदी सरकार हे सुटबुटवाल्यांचे सरकार आहे. आता तर हे फक्त पैसेवाल्यांचे पंचतारांकित सरकार आहे हे सिद्ध झाले आहे. कोरोना लसीसाठी श्रीमंतांना पंचतारांकित ट्रीटमेंट दिली जात आहे आणि दुसरीकडे गरीबांना मात्र लसीसाठी रांगेत ताटकळत उभे रहावे लागत आहे. सामान्य जनतेला रांगेत उभे करणे हेच मोदींचे धोरण आहे.

सहा महिन्यापासून शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहे पण मोदींना त्यांच्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही. शेतकरी, कामगार, कष्टकरी जनतेला देशोधडीला लावले. स्वातंत्र्यानंतर देश उभा करण्यासाठी पंडित जवाहरलाल नेहरु यांच्यापासून डॉ. मनमोहनसिंह यांच्यापर्यंत ७० वर्षात देशाच्या प्रगतीसाठी, विकासासाठी अपार मेहनत घेऊन देश उभा केला पण मोदींना आपल्या मुठभर उद्योगपती मित्रांसाठी रेल्वे, विमानतळ, बंदरे, बीएसएनएल, एलआयसी, पेट्रोलियम कंपन्या, बँका हे सर्व विकायला काढली. देश अधोगतीकडे घेऊन जाणाऱ्या मोदी सरकारचा काँग्रेसने आज काळा दिवस पाळून निषेध केला.

- Advertisement -

मोदी सरकारचं विरोधकांचा आवाज दपडपण्याचे काम

यावेळी बोलताना मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप म्हणाले की, मोदी सरकारच्या नाकर्तेपणामुळे आज जनतेला लसीसाठी तडफडावे लागत आहे. याआधी देवी, गोवर, पोलिओसारख्या १३ लसी आल्या त्या काँग्रेसने मोफत दिल्या त्यावेळी असा सावळा गोंधळ उडू दिला नाही. ७० वर्षात काय केले असा विचारणाऱ्यांचे पाप गंगा नदीवर वाहत आहे हे जनेतेने पाहिले. मोदी सरकार विरोधकांचा आवाज दपडपण्याचे काम करत हे परंतु घटनेने आम्हाला प्रश्न विचारणाचा अधिकार दिला आहे. आम्ही प्रश्न विचारत राहू, लोकांच्या प्रश्नासाठी पुन्हा रस्त्यावर उतरू. मोदी सरकारचे देशाचे कसे वाटोळे केले हे जनतेसमोर उघड करण्याचे काम आम्ही केले.

राज्यभर काँग्रेसने काळा दिवस पाळून मोदी सरकारचा निषेध केला. तसेच प्रत्येक विभागात काँग्रेसच्या वरिष्ठ नेते व मंत्री यांनी पत्रकार परिषद घेऊन मोदी सरकारच्या कारभाराची पोलखोल केली. पुणे येथे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, नाशिकमध्ये विधिमंडळ पक्षनेते तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, औरंगाबाद येथे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, नागपूरमध्ये ऊर्जा मंत्री नितीन राऊत, अमरावती येथे मंत्री विजय वडेट्टीवार, लातूरमध्ये वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, कोल्हापूरमध्ये गृहराज्यमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन मोदी सरकारच्या काळ्या कारभाराची पोलखोल केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -