नियमाच्या पलीकडे गेल्यावर गुन्हे दाखल होणारच, नाना पटोलेंची खोचक टीका

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर भडकावू भाषण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औरंगाबाद पोलिसांनी यावर मोठी कारवाई केली आहे. राज ठाकरे यांच्यावर भडकावू भाषण, वैयक्तिक टीका टीप्पणी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नियमाच्या पलीकडे जो कोणीही जाणार त्याच्यावर गुन्हे दाखल होणारच, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज ठाकरेंवर केली आहे.

नाना पटोलेंनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, कोणाबाबत टीका करायची नाही. त्या पद्धतीचे जे काही नियम तयार करून दिले आहेत. त्यापद्धतीचे नियम तयार करून देण्यात आले आहेत. त्यामुळे त्या नियमाच्या पलीकडे जो कोणीही जाणार त्याच्यावर गुन्हे दाखल होणारच होते. मात्र, त्यांनी हे गुन्हे मोडल्यामुळे त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, असं नाना पटोले म्हणाले.

राज ठाकरेंना अटक करण्याची तयारी सुरू आहे, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता नाना पटोले म्हणाले की, प्रशासनाचं हे काम आहे. जो कोणीही चुकीचं काम करेल त्याच्यावर कारवाई करण्याचं काम प्रशासन करेल, असं नाना पटोले म्हणाले.

भोंग्यावरून राजकारण तापलंय की, खरं तर महाराष्ट्रमध्ये वातावरण गढुळ करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टी आणि केंद्र सरकारच्या वतीने सुरू करण्यात आलेला आहे. त्यामुळे आजपासूनच नाही तर गेल्या दोन-अडीच वर्षापासून हा सर्व प्रयोग सुरू आहे. महाराष्ट्राची बदनामी हा भाजपचा एकमेव उद्देश झालेला आहे. अशा प्रकारचं चित्र सध्या आपण पाहतोय. त्यामुळे महाराष्ट्रात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की, नवीन उद्योग यायला तयार नाहीयेत. अनेक उद्योग बाहेर चालले आहेत, नाना पटोले म्हणाले.

महाराष्ट्राचे अनेक उद्योजक देश सोडूनच दुसऱ्या देशामध्ये चालले आहेत, अशी परिस्थिती आज आपल्या महाराष्ट्रात निर्माण झालेली आहे. त्यामुळे बेरोजगारीचा प्रश्न आणि तरूणांच्या बेरोजगारीचा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यामुळे ही सर्व राजकीय गढुळता आणि एक अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न सातत्याने सुरू आहे. तो थांबवला गेला पाहीजे. ही भूमिका काँग्रेसच्या वतीने आम्ही कालही मांडलेली आहे, पटोले म्हणाले.


हेही वाचा : आम्हाला कितीही थांबवण्याचा प्रयत्न केलात तरी..,मनसे जिल्हाध्यक्ष सुमीत खांबेकरांचा इशारा