सत्तेसाठी ढोंग आणि सोंग करणारे नरेंद्र मोदी हे ‘ढोंगीजीवी’ – नाना पटोले

Nana Patole has demanded that Governor Koshyari should convene a special session immediately

‘पंडित नेहरूपासून डॉ. मनमोहनसिंह यांच्या सरकारनी देशात मोठे प्रकल्प उभे केले. संस्था उभा केल्या. विकासाची गंगा आणली. परंतु, काँग्रेस सरकारने उभे केलेले एअर इंडिया, भेल, विमा कंपन्या, रेल्वे हे सर्व मोदींनी आता विकायला काढले आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, कोकण रेल्वेही विकायला काढली आहे. देश विकण्यासाठी मोदींना जनतेने सत्ता दिलेली नव्हती. आता मोदी सरकारला यापुढे महाराष्ट्रातील एकही सरकारी मालमत्ता विकू देणार नाही’, असा इशारा नवनियुक्त काँग्रेस प्रांताध्यक्ष नाना पटोले यांनी दिला. ‘मागील सहा वर्षात मोदी सरकारने मनमानीपद्धतीने कारभार चालवलेला आहे. शेतकरी अडचणीत आहे. आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर अत्याचार केला जात आहे. पण, नरेंद्र मोदी यांना त्याचे दुःख नाही. म्हणून या अन्यायी, अत्याचारी मोदी, भाजपा, आरएसएस सरकारला हुसकावून लावण्याचे काम करायचे आहे. नरेंद्र मोदी यांनी आंदोलक शेतकऱ्यांचा आंदोलनजीवी म्हणून अपमान केला. त्याचा समाचार घेत सत्तेसाठी ढोंग करणारे, सोंग करणारे मोदी हे ढोंगीजीवी आहेत’, असा टोला लगावला आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रसचे नवनियुक्त अध्यक्ष नाना पटोले यांचा पदग्रहण सोहळा मुंबईच्या ऐतिहासिक ऑगस्ट क्रांती मैदानात पार पडला त्यावेळी पाटील बोलत होते. यावेळी नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, नवनियुक्त कार्याध्यक्ष शिवाजीराव मोघे, नसीम खान, चंद्रकांत हंडोरे, बसवराज पाटील, आमदार प्रणिती शिंदे, आमदार कुणाल पाटील यांनी महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या भव्य कार्यक्रमात पदभार स्वीकारला.

‘मोदी सरकार चले जाव’चा नारा

‘नाना पटोले यांची नेत्यांवरची निष्ठा, शेतकऱ्यांसाठी लढणारा नेता’, अशी प्रतिमा आहे. सोनिया गांधी, राहुल गांधी यांनी त्यांच्यावर मोठा विश्वास दाखवलेला असून ते या विश्वासला खरे उतरतील. केंद्रात जनविरोधी, राष्ट्रविरोधी, शेतकरी विरोधी मोदी सरकार असून सहा वर्षात देशातील राजकीय, सामाजिक घडी विस्कटलेली आहे. मोदींच्या राज्यात शेतकऱ्यांवर अत्याचार होत असून भांडवलदारांसाठी काम केले जात आहे. या सरकारला खूर्चीवर राहण्याचा नैतिक अधिकार नाही, असे सांगून महाराष्ट्र देशाला दिशा दाखवणारे राज्य आहे. या राज्याने इतिहास घडलेला आहे. याच तेजपाल हॉलने देशात क्रांतीकारी इतिहास घडवला आहे. आज पुन्हा मोदी चले जाव चा नारा देऊन महाराष्ट्र पुन्हा इतिहास घडवेल’, असा विश्वास महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांनी व्यक्त केला.

राज्यात काँग्रेसला सोनियाचे दिवस येतील

‘नाना पटोले हे धडाडीचे नेते आहेत. काँग्रेसला नानांच्या रुपाने चांगले नेतृत्व लाभले आहे. त्यांनी एकदा ठरवले की ते तडीस नेणारच, असा त्यांचा स्वभाव आहे. आताही त्यांनी राज्यात काँग्रेसला एक नंबरचा पक्ष करण्याचा निर्धार केला आहे. यात त्यांना यश येईल. लोकांपर्यंत पोहचून, गावोगावी जाऊन काँग्रेसला पुन्हा एकदा सोनियाचे दिवस आणू’, असा विश्वास व्यक्त करून थोरात यांनी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचे आभार मानले.

अशोक चव्हाण म्हणाले की, ‘नाना पटोले हे धडाडीचे नेते असून लोकाभिमुख पद्धतीने त्यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत काँग्रेस पक्षाला मोठे यश येवो, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या. केंद्रात व महाराष्ट्रात काँग्रेसला भाजपाविरोधात लढायचे आहे. शेतकरी, सामान्य माणूस, यांच्याबाजूने काँग्रेसची ताकद उभी करायची आहे’.

ज्या ऐतिहासीक गोकुळदास तेजपाल सभागृहात काँग्रेसची स्थापना झाली होती त्याच गोकुळदास तेजपाल हॉलमध्ये आज राज्यातील काँग्रेस नेत्यांची बैठक महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीत हुकुमशाही पद्धतीने वागणाऱ्या आणि काळे कायदे आणून शेतकऱ्यांना उद्धवस्त करणारे ‘मोदी सरकार चले जाव’ असा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.


हेही वाचा – ९४ वे भारतीय मराठी साहित्य संमेलन: अखेर समन्वयकपदी समीर भुजबळ