Sunday, March 16, 2025
27 C
Mumbai
Homeमहाराष्ट्रNana Patole : माणिकराव कोकाटेंना सत्तेचा माज, शेतकऱ्यांबाबत केलेल्या विधानावरून नाना पटोले संतापले

Nana Patole : माणिकराव कोकाटेंना सत्तेचा माज, शेतकऱ्यांबाबत केलेल्या विधानावरून नाना पटोले संतापले

Subscribe

‘भिकारीसुध्दा एक रूपया घेत नाही, आम्ही एक रूपयात शेतकर्‍यांना पीक विमा देतो’ असे वादग्रस्त वक्तव्य राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केले आहे. त्यांनी केलेल्या या वक्तव्याचा तीव्र निषेध करण्यात येत आहे. त्यांच्या या विधानावर काँग्रेस नेते नाना पटोले यांनी संताप व्यक्त केला आहे.

मुंबई : भारतीय जनता पक्ष युतीचे सरकार हे शेतकरी विरोधी आहे हे वारंवार उघड झाले आहे. शेतकऱ्याला अतिरेकी, नक्षलवादी, आंदोलनजीवी म्हणून त्यांचा अपमान करण्यात आलेला आहे. आता राज्यातील कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनीच शेतकऱ्यांना भिकारी म्हणत अकलेचे तारे तोडले आहेत. कोकाटे यांचे शेतकऱ्यांबद्दलचे विधान हे त्यांना सत्तेचा माज आल्याचे दर्शवते. शेतकरी भिकारी नाही तर शेतकऱ्यांसह सर्वसामान्य जनतेला जीएसटीच्या माध्यमातून लुटणारे भाजपा युती सरकारच भिकारी आहे, असा हल्लाबोल नाना पटोले यांनी केला आहे. (Nana Patole expressed his anger over Manikrao Kokate statement regarding farmers)

‘भिकारीसुध्दा एक रूपया घेत नाही, आम्ही एक रूपयात शेतकर्‍यांना पीक विमा देतो’ असे वादग्रस्त वक्तव्य राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केले आहे. त्यांनी केलेल्या या वक्तव्याचा तीव्र निषेध करण्यात येत आहे. त्यांच्या या विधानावर काँग्रेस नेते नाना पटोले यांनी संताप व्यक्त करत म्हटले की, शेतकरी जगाचा पोशिंदा आहे त्याचा अपमान करणे ही विकृती आहे. भाजपा युती सरकार हे शेतकरी विरोध असून फक्त धनदांडग्यांसाठी काम करत आहे. सरकार एक रुपयात पीक विमा देते म्हणजे शेतकऱ्यांवर उपकार करत नाही आणि हे पैसे माणिकराव कोकाटे त्यांच्या खिशातून देत नाहीत. सरकार शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव देत नाही, कर्जमाफी देत नाही. निवडणुकीच्या काळात शेतकऱ्यांना भरमसाठ आश्वासने देऊन भाजपा युतीने मतांची भिक मागितली, असा टोला पटोलेंनी लगावला.

हेही वाचा… Ladki Bahin Yojana : आठवड्याभरात लाडक्या बहिणींना मिळणार आठवा हप्ता, अजित पवारांची माहिती

तर, शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणाऱ्या कृषी साहित्यावर 18 टक्के जीएसटी लावून सरकार शेतकऱ्यांकडूनच भिक घेते आणि वरून शेतकऱ्यांनाच भिकारी म्हणते. शेतकऱ्यांच्या नावावर विविध योजनांमध्ये कृषी मंत्रालय कशी मलई खाते याचा पर्दापाश नुकताच आम्ही केला आहे. पीक विमा योजनेतही भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाले आहे. शेतकऱ्यांचा अपमान करणाऱ्या कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांची जाहीर माफी मागावी, तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कृषी मंत्र्यांची हकालपट्टी करावी, असे म्हणत नाना पटोलेंनी मंत्री नाना पटोलेंवर निशाणा साधला.