विधान परिषदेत मतं फुटल्यानंतर नाना पटोले दिल्लीत, ज्येष्ठ नेत्यांवर कारवाई होण्याची शक्यता

Nana Patole

राज्यात विधान परिषदेत काँग्रेसचा पराभव झाल्यानंतर जवळपास ७ ते ८ मंत फुटल्यानंतर आणि राज्यात घडलेल्या सत्तांतरानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आज दिल्लीत पोहोचले आहेत. राज्यातील काँग्रेस नेतृत्वावर दिल्लीतील उच्चपदस्थ नेते नाराज असल्याची चर्चा रंगत आहे.

नाना पटोले यांनी प्रथमच विधानपरिषदेच्या निवडणुकीत सात ते आठ मतं फुटल्याची कबुली दिली आहे. तसेच हायकमांड याबाबत नक्की कारवाई करेल, असं देखील नाना पटोले म्हणाले. महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीमध्ये क्रॅास वोटिंग, फ्लोअर टेस्टमध्ये आमदारांची अनुपस्थिती तसेच औरंगाबाद नामांतरावरून पक्षाच्या हायकमांडने दिलेले आदेश न पाळल्यामुळे काँग्रेस पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी नाराज असल्याचं सांगितलं जात आहे.

विधानपरिषदेतील निवडणुकीमध्ये काँग्रेसची मतं फुटल्याची चर्चा होती. या निवडणुकीत उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला होता. त्यानंतर काँग्रेसमधील अंतर्गत वाद आता समोर आला. विधानपरिषदेत फुटलेल्या ७ आमदारांवर कारवाई करण्याची मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केली होती.

२० जूनला पार पडलेल्या विधान परिषद निवडणुकीत चंद्रकांत हंडोरे यांना केवळ २२ मते पडली. ७ जणांनी भाजपला मतदान केल्याने हंडोरे यांचा पराभव झाला. याची गंभीर दखल घ्या, अशी मागणी प्रभारी एच. के. पाटील यांच्याकडे करण्यात आली असल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.


हेही वाचा : शिवसेनेत उठाव करणं गरजेचं होतं, आमदार सदा सरवणकरांची खंत