नागपूर : विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन (Winter Session) सध्या नागपुरात (Nagpur) सुरु आहे. आज दुसऱ्या दिवशी नागपुरात युवक काँग्रेसचा (Youth Congress) मोठा मोर्चा विधान भवनावर धडकणार होता. बेरोजगारीच्या मुद्द्यावरुन सर्व कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. कार्यकर्त्यांकडून सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलीसही सतर्क होते. पोलिसांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी ठिय्या आंदोलनावर सुरू केले. यानंतर पोलिसांनी त्यांना चक्क उचलून नेले. पोलिसांनी नाना पटोले यांच्यासह 40 हून अधिक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. यावेळी नाना पटोले यांनी माध्यमांशी बोलताना आरोप केला की, सरकार महाभरतीच्या नावाने ऑनलाईन पद्धतीने तरुणांना लुटत आहे. (More than 40 Congress workers including Nana Patole were detained by the police Online Mahabharti)
हेही वाचा – Anil Parab vs Dada Bhuse : रस्ते अपघातांमध्ये महाराष्ट्राचा वरचा नंबर; अनिल परब यांचा शिंदे गटावर निशाणा
अटक होण्यापूर्वी माध्यमांशी बोलताना नाना पटोले यांनी आरोप केले की, सध्याचे सरकार तरुणांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे, त्यांना बरबाद करण्याचं काम करत आहे. देवेंद्र फडणवीस यांचं सरकार असतानाही महाभरतीच्या नावाने ऑनलाईन पद्धतीने तरुणांना फक्त लुटलं, नोकऱ्या दिल्या नाहीत. महाराष्ट्रात लाखो पदं खाली आहेत. कंत्राटी भरतीच्या नावाने हे तरुणांचे आयुष्य बदनाम करत आहेत. म्हणून युवक काँग्रेसच्या माध्यमातून तरुण-तरुणींचा मोर्चा विधान भवनाच्या निघाला आहे, असं नाना पटोले म्हणाले होते.
सध्याचं सरकार चीटफंडवालं आहे
सरकारला उत्तर द्यावं लागेल, आम्ही सगळे जेलभरु करू, पण या सरकारशी दोन हात केल्याशिवाय युवक काँग्रेस आता शांत बसणार नाही, असा हल्लाबोल नाना पटोले यांनी केला. त्यांनी असेही म्हटले की, बेरोजगारी, महागाई, शेतकऱ्यांचे प्रश्न महत्त्वाचे आहेत. परंतु सध्याचं सरकार तरुणांचं आयुष्य बरबाद करायला निघालं आहे. पोलीस दलासह सर्व विभागात मोठ्या प्रमाणावर पद खाली आहेत, मात्र सरकार ऑनलाइन महाभरतीच्या नावाने तरुणांना लुटत आहे. हे चीटफंडवालं सरकार आहे. या सरकारने पिढी बरबाद करण्याचं काम केलं आहे, असा आरोप नाना पटोले यांनी केला.
सरकारच्या छाताडावर बसून तरुणांना न्याय देऊ
नाना पटोले म्हणाले की, महाराष्ट्रात 25 लाख पदं खाली पडली आहे, परंतु सरकार ही पदं भरायला तयार नाही. त्यामुळे तरुणांचा उद्रेक होताना दिसत आहे. त्यामुळे आम्ही आजच्या मोर्चातून शिकलेल्या तरुणांना न्याय देण्यासाठी बॅरिकेट्स काय सरकारच्या भिंती तोडू आणि सरकारच्या छाताडावर बसून तरुणांना न्याय मिळवून देऊ, असा इशारा नाना पटोले यांनी या मोर्चावेळी माध्यमांशी बोलताना दिला.