नागपूर : देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्याने एकनाथ शिंदे हे नाराज आहेत. अजितदादा पवार यांचीही मुख्यमंत्री होण्याची इच्छा यंदाही अपूर्ण राहिली आहे. यातच काँग्रेसचे नेते, नाना पटोले यांनी, एकनाथ शिंदे आणि अजितदादांनी आमच्याकडे यावे, दोघांना आलटून-पालटून मुख्यमंत्री करू, अशी ऑफर दिली आहे. नाना पटोलेंच्या ऑफरची एकच चर्चा रंगली आहे.
भाजप एकनाथ शिंदे अन् अजितदादांना जगू देत नाही
नाना पटोले म्हणाले, “अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांनी परिस्थिती खूप वाईट आहे. पक्ष टिकेल की नाही, याची भीती दोन्ही नेत्यांच्या मनात आहे. भाजप त्यांना जगू देत नाही. भाजपची ती सवयच आहे. देशात ज्यांच्यासोबत युती केली, त्यांना संपवण्याचे काम भाजपने केले आहे. एकनाथ शिंदे यांच्या सगळ्या योजना भाजपने बंद केल्या आहेत. त्यामुळे अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे यांनी सावध रहावे. आम्ही दोन्ही नेत्यांसोबत आहोत.”
अजितदादा अन् शिंदेंना मुख्यमंत्रिपदाची आस
“आम्ही राष्ट्रीय पक्ष आहोत. अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे यांना आमच्याकडे बोलवणार आहोत. त्यांना पाठिंबा देऊ. अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांच्यात मुख्यमंत्रिपदाची आस लागली आहे. भाजपच्या अधिपत्याखाली दोन्ही नेते मुख्यमंत्री होऊ शकत नाहीत. त्यामुळे अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांना आलटून-पालटून मुख्यमंत्री बनवून टाकू,” असे नाना पटोले यांनी म्हटले.
ईडीचा चाबूक सगळ्यांच्या अंगावर पडणार, त्यामुळे धाडस करत नाहीत – बच्चू कडू
पण, नाना पटोलेंची ऑफर हास्यास्पद आहे, असं प्रहार पक्षाचे सर्वेसर्वा बच्चू कडू यांनी म्हटले आहे. “नाना पटोलेंची ऑफर हास्यास्पद आहे. काँग्रेसच स्थित आहे की नाही? हे समजत नाही. रवींद्र धंगेकर आताच शिंदे गटात गेले आहेत. परंतु, काँग्रेस कुठे आहे हे शोधले पाहिजे. जोपर्यंत केंद्रात भाजपचे सरकार आहे, तोपर्यंत नेते कुठेही जाणार नाहीत. तेथील ईडीचे फटके याची सगळ्यांना भीती आहे. केंद्राच्या माध्यमातून ईडीचा चाबूक सगळ्यांच्या अंगावर पडणार आहे. त्यामुळे हे धाडस कुणीच करणार नाही,” असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे.
हेही वाचा : आधी वन विभागाने बुलडोझर फिरवला, मग होळी दिवशीच अज्ञातांनी खोक्याचे घर पेटवले, महिलांना मारहाण अन्…